कुंभमेळा : स्मृती इराणींनी घेतला शाही स्नानाचा लाभ, कुंभमेळ्यातले वेगवेगळे रंग

प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीच्या एक दिवसाआधी शाही स्नानाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही शाही स्नान केलं. या स्नानाचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कुंभमेळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, "मला आशा आहे की या प्रसंगी देश विदेशातील भक्तांना भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचे दर्शन होईल."

"मला आशा आहे की अधिकाधिक लोक या आयोजनाचा लाभ घेतील."

या प्रसंगी महानिर्वाणी आणि अटल आखाड्यातल्या साधूसंतांनी डुबकी घेतली. त्याशिवाय अनेक आखाड्यांशी निगडीत साधू संत एका मागोमाग एक संगमावर पोहोचले.

कुंभमेळ्यातील भाविकांवर हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी करण्यात आली.

हा कुंभमेळा 49 दिवस असून त्याचा समारोप 4 मार्चला होईल. त्यादरम्यान आठ मुख्य पर्वांना शाही स्नान होईल.

या कुंभमेळ्यात 12 कोटी लोक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात 10 लाख परदेशी नागरिकांचा समावेश असेल.

कुंभचे जिल्हाधिकारी विजय किरण आनंद यांच्यामते मेळ्याचा परिसर 45 चौरस किमीच्या परिसरात पसरला आहे. याआधी हा परिसर फक्त 20 किमी इतका होता.

शाही स्नानाला विविध आखाड्यांशी संबंधित साधु संत हे सोने-चांदीच्या पालख्या आणि हत्तीघोड्यांवर बसून संगमात स्नान करण्यासाठी येतात.

हे साधुसंत आपल्या शक्तीचं आणि वैभवाचं प्रदर्शन करतात. त्यातून ते शस्त्र आणि शास्त्रातील समन्वयाचा संदेश देतात.

भारतात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. या चार ठिकाणांपैकी प्रत्येक ठिकाणी बाराव्या वर्षी कुंभमेळा भरतो. प्रयागमध्ये दोन कुंभ पर्वांच्या अंतराने अर्धकुंभमेळ्याचंही आयोजन करण्यात येतं.

परंपरेनुसार सध्या अर्धकुंभ होणं अपेक्षित होतं, मात्र सरकारने त्याचं अर्धकुंभाचं नाव बदलून कुंभ आणि महाकुंभ असं केलं आहे.

कुंभमेळ्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र गेल्या काही दशकांत कुंभ मेळ्याचं रुप विस्तीर्ण झालं आहे. 2001 मध्ये आयोजित झालेला कुंभमेळा अलाहाबादचा पहिलाच अशा प्रकारचा मेगा मेळा होता.

यावेळच्या कुंभमेळ्याच्या आयोजनाचं बजेट 28 अब्ज रुपये आहे. 49 दिवसांत ब्रिटन आणि स्पेनची जितकी लोकसंख्या आहे तितके लोक इथं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुंभमेळ्यात हिंदू भाविक गंगा, यमुना, आणि सरस्वती नदीच्या संगमावर एकत्र येतात. त्यातील सरस्वती नदी आता अदृश्य झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)