महाराष्ट्रात शिक्षणाची स्थिती सुधारली, पण मध्यमिक शाळांमध्ये अजूनही बदल नाही

Annual Status of Education Report (ASER) नावाने प्रथम या स्वयंसेवी संस्थेतर्फे शिक्षणाच्या स्थितीबाबत दरवर्षी सर्वेक्षण करण्यात येतं. या सर्वेक्षणात देशातील शिक्षणाच्या स्थितीबाबत काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती तुलनेने बरी असली तरी महाराष्ट्रातले विद्यार्थी अजूनही गणितात कच्चे असल्याचं समोर आलं आहे. या सर्वेक्षणात आठवीतील 60.7% विद्यार्थ्यांना भागाकारही येत नाही. त्याचप्रमणे दुसऱ्या वर्गातील 11.8 टक्के मुलं साधं अक्षरही वाचू शकत नाहीत.

हे सर्वेक्षण महाराष्ट्राच्या 33 जिल्ह्यांत, 990 खेड्यात आणि 19,765 घरात करण्यात आलं. या सर्वेक्षणात 14 सामाजिक संघटना आणि 21 महाविद्यालयांचा समावेश होता.

प्राथमिक शाळेतील मुलं वाचन आणि गणितात पुढे

वाचण्याची क्षमता आणि गणितीय कौशल्या तपासणं हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषदेतल्या शाळांमधले 44.6% विद्यार्थी दुसऱ्या वर्गाच्या दर्जाचं वाचन करू शकतात. पण खासगी शाळांमध्ये हे प्रमाण 33.6% आहे.

जिल्हा परिषदेतील शाळेतल्या मुलांची प्रगती खासगी शाळेतल्या मुलांपेक्षा जास्त चांगली आहे, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळांमधल्या विद्याथ्यांची स्थिती देशातल्या इतर भागांपेक्षा सुधारली असली तरी माध्यमिक शाळांची स्थिती फारशी सुधारली नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे.

आठवीतल्या 19.8% विद्यार्थी दुसऱ्या वर्गाची पुस्तकंही निट वाचू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1/5 मुलं उच्च शिक्षणासाठी तयार नाहीत.

जिल्हा परिषदेत शाळांमधली पाचव्या वर्गातली 66 टक्के मुलं दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमातल्या गोष्टी वाचू शकतात. हेच प्रमाण 2014 मध्ये 51.7 इतकं होतं.

राष्ट्रीय पातळीचा विचार केल्यास एक अक्षर किंवा त्यापेक्षा जास्त वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 46.8 टक्के आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण 66.2% आहे. 15 ते 16 वयोगटातील 5.1 टक्के मुली शाळेत जात नाहीत. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण 13.5 टक्के आहे.

शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. 2008 मध्ये 98.5% टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला होता. आता हेच प्रमाण 99.2 झालं आहे.

कारणं काय?

सरावाचा अभाव हे या स्थितीमागचं महत्त्वाचं कारण असल्याचं शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. भागाकाराच्या संकल्पनेची चौथीत ओळख होते. त्यानंतर त्याचा सराव होत नाही. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. जे गणिताबाबत तेच वाचनाबाबतही खरं असल्याचं कुलकर्णी यांचं मत आहे.

इतर देशाच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती सुधारली आहे, असं म्हणणं म्हणजे स्वत:चं खोटं समाधान करण्यासारखं आहे असंही हेरंब कुलकर्णी यांना वाटते. या सर्वेक्षणाच्या पद्धतीतही अनेक त्रुटी असल्याचंही ते नमूद करतात.

इतर सुविधांचं काय?

यामध्ये इतर सुविधांबाबतही सर्वेक्षण करण्यात आलं आहे. 2018 मध्ये 94.7 टक्के शाळांमध्ये अन्न देण्यात येतं. 70.9 टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर 70.1% शाळांत प्रसाधनगृहं आहेत.

63.9% शाळेत मुलींसाठी वेगळं आणि वापरण्यायोग्य प्रसाधनगृह आहेत. 91.8% शाळांमध्ये वीजेची सुविधा आहे. तसंच 87.0% शाळांमध्ये खेळाचं मैदान आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)