कर्नाटक : JDS-काँग्रेस सरकारचा 2 आमदारांनी पाठिंबा काढाला; काँग्रेसचे 12 आमदार फुटले?

कर्नाटकातल्या राजकीय नाट्याला आता वेग आला आहे. जेडीएस आणि काँग्रेस सरकारला पाठिंबा देणाऱ्या 2 अपक्ष आमदारांनी राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांना पत्र लिहून आपण सरकारचा पाठिंबा काढत असून भाजपला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी कळवलं आहे.

काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह इतर 3 आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत. ते पक्षावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसच्या वाट्याची 8 मंत्रिपदं काही दिवसांपूर्वी भरण्यात आली. त्यात स्थान न मिळाल्यानं हे आमदार नाराज आहेत.

"आमच्याकडे सध्या 1 डझन आमदार आहेत. सर्व एकाच ठिकाणी नाहीत. एकदा का आमच्याकडच्या आमदारांची संख्या 17 झाली की आम्ही त्यांना दिल्लीत पत्रकार परिषदेत सर्वांसमोर आणू," असं एका काँग्रेस आमदारानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं आहे.

दरम्यान भाजप आमच्या आमदारांना फोडण्यासाठी 50 कोटींची ऑफर देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे.

काही आमदारांना मंत्रिपदाची ऑफर आणि पोटनिवडणूक लढवण्यासाठी आणखी 30 कोटींची ऑफर दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तिकडे भाजपच्या 104 आमदारांनी मात्र गुडगावमध्ये तळ ठोकला आहे. आणि पुढचे 2 दिवस ते तिथंच राहतील, या माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितलं आहे.

तर भाजपचे 5 आमदार मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या संपर्कात असल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात आहे.

भाजपनं आधी त्यांच्या सर्व 104 आमदारांना दिल्लीत ठेवलं होतं. पण कुठलाही आमदार फूटू नये यासाठी त्यांना गुडगावमध्ये हलवण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)