कर्नाटकात भाजपची पुन्हा जुळवाजुळव,काँग्रेसचे 5 आमदार गायब

कर्नाटकात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हं आहेत. 'काँग्रेसचे असंतुष्ट आमदार भाजपमध्ये जाणार का?' हाच सवाल उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसचे 5 आमदार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. असं सांगितलं जात आहे की ते पक्षावर नाराज आहेत. त्यातच भाजपनं त्यांच्या सर्व म्हणजेच 104 आमदारांना दिल्लीत पाचारण केल्यानं राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

काँग्रेसचे पाच आमदार मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षावर नाराज आहेत. काँग्रेसच्या वाट्याची 8 मंत्रिपदं काही दिवसांपूर्वी भरण्यात आली. त्यात स्थान न मिळाल्यानं 3 आमदार नाराज आहेत. तर 2 जणांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानं ते नाराज आहेत. नाराजांमध्ये बेळगावच्या रमेश जारकीहोळी यांचाही समावेश आहे.

वगळलेल्या 2 मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती म्हणून त्यांना वगळण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे या सर्व नाराज आमदारांच्या आपण संपर्कात असून आपल्या सरकारला कुठलाही धोका नसल्याचं, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या कर्नाटक प्रभारी यशोमती ठाकुर यांनी बीबीसीशी बोलताना, "कर्नाटकातलं काँग्रेस सरकार स्थिर आहे. भाजप अनेकदा असे प्रयत्न करत असतो त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत नाही," अशी प्रतिक्रिया दिली.

"नाराज आमदार गेल्या काही दिवसांपासून पक्षाला ब्लॅकमेल करत आहेत, त्यांच्याबरोबर 5 पेक्षा जास्त आमदार जाऊ शकत नाहीत हे यातून स्पष्ट होत आहे. हे काही पहिल्यांदा घडत नाही आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

भाजप आमदार दिल्लीत

तिकडे भाजपच्या 104 आमदारांनी मात्र दिल्लीत तळ ठोकला आहे. आणि पुढचे 2 दिवस ते तिथंच राहतील, या माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या वक्तव्यानं राज्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत.

कुमारस्वामी यांनी सरकार वाचवण्यासाठी घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्लीत केला आहे.

पण, खरंतर 2019च्या तयाराची चर्चा करण्यासाठी अमित शहांनी भाजपच्या सर्व आमदारांना दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा आहे. अमित शहा यांना ठरलेल्या कार्यक्रमानुसार बेंगळुरूला जाणं शक्य झालं नाही त्यामुळे सर्व आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

अमित शहा सध्या खूप व्यग्र आहेत, त्यामुळे ते लगेचच सर्व आमदारांशी संवाद साधू शकत नाहीत. त्यामुळे आमदारांना थांबवण्यात आलं आहे, असं एका भाजप नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

कर्नाटकात 2018मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 224 पैकी भाजपला 104 काँग्रेसा 80 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)