You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटक निवडणूक 2018 : वेगळ्या धर्माची मागणी करणारे लिंगायत हिंदू आहेत का?
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, कर्नाटकहून
हा एक असा वाद आहे ज्यावरून कर्नाटकात रक्तपातसुद्धा झाला आहे.
पण विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस सरकारने लिंगायतांना वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
लिंगायत समुदायाचं म्हणणं आहे की, त्यांच्या पूजा-अर्चेच्या पद्धती हिंदूंपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे ते हिंदू नाहीत. ते निर्गुण शिवाची आराधना करतात. ते मंदिरात जात नाहीत आणि मूर्तिपूजाही करत नाहीत.
शिवमूर्तीची पूजा करणारे लिंगायत कोण?
लिंगायतांमधलाच एक पंथ वीरशैव म्हणून ओळखला जातो. ते मूर्तिपूजाही करतात आणि गळ्यात शिवलिंगही घालतात. या पंथाचे लोक हिंदू धर्मापासून अलग होण्याच्या भूमिकेचा विरोध करत आले आहेत.
वीरशैव पंथाची सुरुवात जगत्गुरू रेणुकाचार्य यांनी केली. आदी शंकराचार्यांप्रमाणेच त्यांनीही पाच पीठांची स्थापना केली. या पाचही पीठांमधला सगळ्यांत महत्त्वाचा मठ चिकमंगळूरचा रंभापूरी मठ आहे.
इतिहासकार संगमेश सवादातीमठ यांनी 13व्या शतकाते कन्नड कवी हरिहर यांच्या हवाल्याने सांगितलं की, वीरशैव हा पंथ खूप जुना आहे.
त्यांच्या मते, या पंथाचे संस्थापक रेणुकाचार्य यांचा जन्म आंध्र प्रदेशातल्या कोल्लिपक्का गावात सोमेश्वराच्या लिंगापासून झाला होता.
जगत्गुरू रेणुकाचार्यांबद्दल शिवयोगी शिवाचार्य यांनी केलेल्या लिखाणातून आणि वीरशैव पंथाच्या उपासना पद्धतीबद्दल काही संस्कृत दस्तऐवजांमधून अधिक माहिती मिळते.
ते गळ्यात शिवलिंग घालतात आणि शंकराच्या मूर्तीची पूजाही करतात. वीरशैव हा वैदिक धर्मांपैकी एक आहे. 12व्या शतकात बसवाचार्यांचा उदय झाला. ते रेणुकाचार्यांचे अनुयायी होते.
कर्म हीच पूजा
पण बसवाचार्यांनी सनातन धर्माला पर्याय म्हणून एक पंथ स्थापन केला ज्या पंथाने निर्गुण निराकार शिवाची संकल्पना स्विकारली.
बस्वाचार्य म्हणजे बसवण्णा किंवा बसवेश्वर यांनी जातीभेद आणि लिंगभेदाविरुद्ध कार्य केलं. त्यांनी 'कर्म हीच पूजा' ही शिकवण दिली.
जगत्गुरू शिवमूर्ती म्हणतात की बसवण्णांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जातीच्या लोकांनी लिंगायत धर्म स्विकारला. यात जात आणि काम यावरून कोणतेही मतभेद नव्हते.
ते म्हणतात, "निर्गुण शिवाची उपासना आणि कर्मकांडाविरुद्ध काम करणं हेच लिंगायतांचं कर्म आणि धर्म आहे."
वीरशैव पंथाचे अनुयायी जान्हवं धारण करतात. लिंगायत जान्हवं घालत नाहीत पण इष्ट शिवलिंग परिधान करतात आणि त्याची उपासना करतात.
वीरशैव आणि बसवेश्वरांच्या उपासकांमधला फरक
लिंगायतांच्या एका महत्त्वपूर्ण मठाचे अधिपती शिवमूर्ति मुरुगा शरानारू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की बसवेश्वरांनी वैदिक धर्मांना नाकारलं आणि एक वेगळा मार्ग अवलंबला.
वीरशैव पंथीयांची वेद आणि पुराणांवर श्रद्धा आहे तर लिंगायतांची बसवेश्वरांच्या 'शरणां'वर म्हणजे वचनांवर भिस्त आहे. ही वचनं संस्कृतात नाहीत तर कन्नडमध्ये आहेत.
काँग्रेस सरकारने लिंगायत वेगळा धर्म म्हणून मान्य करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राजकीय वर्तुळांत चांगलीच उलथापालथ झाली.
कारण लिंगायत मतांच्या जोरावर बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकमध्ये भाजप सरकार बनवण्यात यश मिळवलं होतं. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपला सत्ता गमवावी लागली होती.
लिंगायत 'धर्म' बनवण्यामागचं राजकारण
2011 च्या जनगणनेनुसार कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या 17% आहे, यात वीरशैव पंथीयांचाही समावेश आहे. वीरशैव पंथियांची लोकसंख्या 3 - 4% असावी असा अंदाज आहे.
या पंथाच्या सर्वांत महत्त्वपूर्ण अशा रंभापूरी मठाचे मठाधिपती जगत्गुरू वीर सोमेश्वराचार्य भग्वत्पदारू यांनी बीबीसीला सांगितलं की वीरशैव आणि लिंगायत शिवाचेच भक्त असल्याने एकच आहेत.
सरकारच्या प्रस्तावाबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "हे धर्मस्थळ आहे. इथे धर्माची चर्चा आणि प्रचार होतो. कोणत्याही राजकीय पक्षा चा किंवा नेत्याचा इथे प्रचार होत नाही. हे लोकांचं श्रद्धास्थान आहे."
लिंगायत समाज शिवाची उपासना करतो पण मग तो स्वतःला हिंदू का म्हणवत नाही, असा प्रश्न रंभापूरी मठाचे संयोजक रवी यांनी उपस्थित केला.
पण लिंगायत पीठाधिशांचे संयोजक एस एम जामदार म्हणतात की लिंगायत वीरशैव एकच आहेत हे द्वंद्व खूप काळापासून चालत आलं आहे. पण लिंगायत आणि वीरशैव वेगळे आहेत आणि त्यांच्या उपासना पद्धती हिंदूंपेक्षा वेगळ्या आहेत.
बंगळुरूच्या लिंगायत महाधिपतींच्या संमेलनात जेव्हा काँग्रेसच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळाल्यानंतर या वादाला नव्याने तोंड फुटलं.
कर्नाटक विधानसभेतल्या 224 जागांपैकी जवळपास 100 जागांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे.
आता लक्ष केंद्र सरकारच्या निर्णयाकडे
विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडून सगळी जबाबदारी केंद्रावर टाकली आहे.
भाजप आता काँग्रेसच्या या खेळीत अडकत चालला असल्याचं दिसतं आहे. हा प्रस्ताव फेटाळला तर लिंगायत समाज नाराज होईरल आणि स्विकारला तर काँग्रेस याचं श्रेय घ्यायला सरसावेल.
बुद्धिबळात शह दिल्याप्रमाणेत ही चाल आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)