You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात झिम्बाब्वेत दगडफेक आणि दंगल
भारतात इंधन दरवाढीविरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं. फ्रान्समध्येही इंधनदरवाढीविरोधात झालेल्या आंदोलनात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला होता. याच घटनांची पुनरावृत्ती आता झिम्बाब्वेत होताना दिसत आहे.
झिम्बाब्वे सरकारने एका रात्रीत इंधनाचे दर दुपटीपेक्षा अधिक वाढवल्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला असून त्यात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
हरारे आणि बुलावायोमध्ये अनेक आंदोलक रस्त्यावर उतरले. शेकडो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बसचा मार्ग आणि रस्ता अडवण्यासाठी आंदोलकांनी टायर जाळले.
इंधनाचा बेसुमार वापर आणि बेकायदेशीर व्यापार यामुळे इंधनदरात वाढ केली असल्याचं राष्ट्राध्यक्ष इमरसन नंगावा यांनी सांगितलं आहे. सध्या झिम्बाब्वेचं प्रशासन देशाची आर्थिक घडी सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं सध्या महागाई वाढली असून रोजगाराची कमतरता आहे.
गृहमंत्री ओवेन निकुबे यांनी आंदोलकांच्या मृत्यूला दुजोरा दिला असला तरी नक्की आकडा किती आहे हे सांगितलं नाही.
त्यांनी हिंसाचारासाठी विरोधी पक्ष आणि काही राजकीय गटांना जबाबदार ठरवलं असून पुढील चौकशी सुरू असल्याचंही सांगितलं.
आफ्रिकेच्या दक्षिण भागात सध्या अमेरिकन डॉलरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तिथं चलनसदृश्य असलेल्या बाँड नोट्सचा दर हा डॉलरइतकाच असतो. मात्र हा दरही सध्या अतिशय कमी झाला आहे.
या बाँड नोट्सला बॉलर असं म्हणतात. सध्या या बॉलरला काहीही किंमत उरलेली नाही. परकीय चलनाचा अभाव हे त्यामागचं मुख्य कारण आहे.
झिम्बाब्वेमधल्या स्थानिक कंपन्या पुरेसं उत्पादन करत नाहीयेत किंवा तिथल्या वस्तू निर्यात करून परकीय चलन मिळवण्याचाही प्रयत्न करताना दिसत नाहीत. उलट आयातीचं प्रमाण वाढलं आहे आणि थकबाकी चुकवण्यासाठी त्यांना अनेक अडचणी येत आहेत.
इंधन दरवाढीमुळे व्यापारी संघटनांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे, हरारेमधील बहुतांश व्यापार थंडावला आहे.
राजधानीत आणि बुलावायो शहरात पोलिसांचं दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आलं आहे.
इंधनाची समस्या दुर होईल
शनिवारी देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात राष्ट्राध्यश्र नंगावा म्हणाले की इंधन दरवाढीमुळे सध्या सुरू असलेली समस्या दूर होईल. सध्या सुरू असलेल्या इंधन समस्येमुळे पेट्रोलपंपाच्या बाहेर रांगाच रांगा बघायला मिळत आहेत.
परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अशांततता पसरवणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर कारवाई करण्यात येईल, असंही नंगावा पुढे म्हणाले.
पेट्रोलचे दर 1.24 डॉलरवरून थेट 3.31 वर गेले आहेत. तर डिझेलचे दर 1.36 डॉलरपासून 3.11 डॉलरपर्यंत वाढलेत.
झिम्बाब्वे मधील मुख्य मजूर पक्ष झिम्बाब्वे काँग्रेस ऑफ ट्रेड युनियन्सने आरोप लावला की या सरकारला गरीबांप्रति कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाही. AFP ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राजधानी हरारेमध्ये अपवर्थ नावाच्या उपनगरात लोक बसेसचा मार्ग अडवत आहेत.
"ज्या गोष्टींमुळे लोकांना त्रास होतोय त्याबद्दल लोक आता आंदोलन करत आहेत," असं एका आंदोलकाने बीबीसीच्या शिंगाई न्योका यांना हरारेमध्ये सांगितलं.
राष्ट्राध्यक्ष कुठे आहेत?
सरकारकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत असंही या आंदोलकांना वाटतं. रविवारी राष्ट्राध्यक्ष रशिया आणि अनेक आशियाई देशांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांनी हा दौरा रद्द करून मायदेशी परतण्याची मागणी आंदोलक करत आहेत.
बुलावाओ शहरात आंदोलकांनी मिनी बसेसवर हल्ला चढवला आहे. त्यांनी बसेसचे टायर जाळले आणि रस्ता अडवला. काही शाळांनीही विद्यार्थ्यांना घरी पाठवल्याची बातमी AFP या वृत्तसंस्थेने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)