You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झिम्बाब्वे निवडणूक : 7 प्रश्न आणि 7 उत्तरं
रॉबर्ट मुगाबे यांच्या 37 वर्षांच्या सत्तेनंतर झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदा होत असलेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. विरोधी पक्षाने विजयाचा दावा करत सत्ताधारी पक्ष निकाल जाणीवपूर्वक जाहीर करत नाही, असा आरोप केला आहे.
या निवडणुकीतील महत्त्वाच्या घाडामोडी अशा :
1. किती झालं मतदान?
सोमवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 70 टक्के मतदान झालं. युरोपीयन युनियन तसंच अमेरिकेतील निरीक्षकांनी निवडणुकीची पाहणी केली.
संसदीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत.
2. कोण आहेत मैदानात?
मुगाबे बाजूला झाल्यानंतर सत्ताधारी Zanu-PF पक्षाचे नेते उपराष्ट्राध्यक्ष इमरसन मंगाग्वा (75) यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळाली.
या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं त्यांनाच रिंगणात उतरवलं. तर विरोधी पक्ष MDC युतीचे नेल्सन चामिसा मैदानात आहेत.
3. काय आहेत दावे?
विरोधी पक्ष MDCनं विजयाचा दावा केला आहे. "नेल्सन चामिसा विजयी झाले आहेत, पण सत्ताधारी पक्ष निवडणुकीच्या निकालात फेरफार करून मंगाग्वा यांना विजयी घोषित करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे निकाल जाहीर उशीर केला जात आहे," असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
विरोधी पक्षाचे नेते तेंदाई बिटी म्हणाले, "सत्ताधारी पक्ष जनमतात हस्तक्षेप करत आहे, त्यांनी झिम्बाब्वेला संकटात लोटू नये." विरोधी पक्षाने स्वतःच निवडणुकीचा निकाल जाहीर केला आहे.
तर सत्ताधारी पक्षाचे नेते आणि गृहमंत्री ऑबर्ट प्मोफू यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर करून संबधितांनी कायदेशीर कारवाईला आमंत्रण दिलं आहे, अशी टीका केली आहे.
रस्त्यावरची परिस्थिती वेगळी असून विरोधी पक्षाने जल्लोष सुरू केला आहे.
4. प्रशासनाचं मत काय?
झिम्बाब्वेच्या निवडणूक आयोगानं शनिवारपर्यंत निकाल जाहीर होतील, असा खुलासा केला आहे. निवडणूक आयुक्त प्रिसिला चिगुंबा यांनी ठरलेल्या वेळेत निकाल जाहीर होतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
निकालात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी 50 टक्के मतदान मिळावं लागतं. तसं झालं नाही तर 8 सप्टेंबरला पुन्हा मतदान होईल.
5. कोण आहेत इमरसन मंगाग्वा?
इमरसन मंगाग्वा यांची ओळख अत्यंत मुरब्बी आणि धुर्त राजकारणी अशी आहे. झिम्बाब्वेमध्ये त्यांना मगर म्हणून ओळखले जाते.
2008मध्ये विरोधकांवर झालेल्या हल्ल्यांचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांच्यावरही हल्ल्यांचे बरेच प्रयत्न झाले आहेत. या हल्ल्यांना त्यांनी मुगाबे यांच्या समर्थकांना जबाबदार धरलं होतं.
6. नेल्सन चामिसा कोण आहेत?
नेल्सन चामिसा यांचं वय 40 आहे. निवडून आले तर ते इथले सर्वांत तरूण राष्ट्राध्यक्ष होतील. 2007ला सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
ते 25व्या वर्षी खासदार तर 31व्या वर्षी मंत्री होते. देशाची उभारणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
7. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचं मत
युरोपीयन युनियनचे निरीक्षक इल्मार ब्रोक म्हणाले आताच काही निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. काही भागात मतदान अगदी चांगल्या प्रकारे झालं तर काही भागात गोंधळाची परिस्थिती होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)