You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींमध्ये देशाच्या 'चौकीदारी'वरुन शाब्दिक युद्ध
"देशाचा चौकीदार कमाल आहे. तो सरळसरळ पैसे खातो आहे, आणि हे सिद्ध होणार आहे. यातून कुणीही वाचणार नाही. 2019 मधील लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या लक्षात येईल. नरेंद्र मोदी हे लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्याला उत्तर मिळेल." अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला संयुक्त अरब अमिरातीतून उत्तर दिलं.
ते दुबईतील भारतीयांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी सीबीआयमधील गोंधळ, नोटाबंदीनंतर देशातील अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम, उत्तर प्रदेशातील सपा-बसपाची युती, आंध्र प्रदेशचा विशेष दर्जा आणि शबरीमालावरही त्यांनी भाष्य केलं.
त्याआधी आज सकाळी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर शाब्दिक हल्ला केला होता. ते म्हणाले, "त्यांना मजबूर सरकार हवं आहे, जेणेकरुन त्यांना सुरक्षेच्या संदर्भातील व्यवहारांमध्ये घोटाळा करता येईल, पैसे खाता येतील. पण आम्हाला मजबूत सरकार हवं आहे. ज्यामुळे जनतेला मोफत आरोग्य सेवा देता येतील."
त्याला राहुल गांधींनी दुबईत उत्तर दिलं. ते म्हणाले, "ज्या कंपनीला कधीही विमानं बनवण्याचा अनुभव नाही, अशा कंपनीला मोदींनी रफालचं कंत्राट दिलं. त्यात भ्रष्टाचार झाला आहे. मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटी रुपयाची चोरी करण्यासाठी मदत केली. त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी ते सिद्ध होणार आहे. संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी या व्यवहारावर आक्षेप घेतला होता की नाही, याचं उत्तर मला सरकारकडून अजूनही मिळालेलं नाही."
आजच्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी देशातील सर्वोच्च यंत्रणा धोक्यात आणल्याचा आरोप केला होता. त्याचं उदाहरण देताना मोदी म्हणाले "काँग्रेस स्वत:ला देशापेक्षा, देशातील संस्थांपेक्षा उच्च समजते. ते कशाचीही परवा करत नाहीत. त्यांना कुणावरही विश्वास नाहीए. काँग्रेसने त्यांच्या काळात सरन्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. महाभियोग आणून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता."
त्यावर राहुल गांधी यांनी आमचं सरकार सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा आदर करणारं सरकार होतं असं म्हटलंय. पुढे त्यांनी सीबीआयमधील गोंधळावरही बोट ठेवलं. ते म्हणाले, "आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी सीबीआयच्या प्रमुखावर कारवाई केली. आलोक वर्मा यांना सुटीवर पाठवलं. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा पद बहाल केलं. मात्र त्यानंतरही मोदी सरकारने वर्मा यांना सीबीआय प्रमुखपदावरुन दूर केलं. हे चुकीचा संदेश देणारं आहे."
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशातील सपा आणि बसपाच्या युतीवरही भाष्य केलं. "उत्तर प्रदेशातील बसपा नेत्या मायावती आणि सपाचे अखिलेश यादव यांचा मी आदर करतो. त्यांना आपला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलं नाही. मात्र काँग्रेसबाबत चुकीची टिपण्णी केली. अर्थात आम्ही त्याला तशा भाषेत उत्तर देणार नाही. आम्ही प्रेमाने राजकारण करतो." असं राहुल गांधींनी म्हटलंय.
मात्र तुम्ही इतर कुठल्या पक्षांना सोबत घेणार की कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे एकटे लढणार या प्रश्नावर राहुल यांनी "आम्ही उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पूर्ण क्षमतेनं लढू" असं राहुल यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी आंध्र प्रदेशला नरेंद्र मोदी सरकारने विशेष दर्जा देण्याचं आश्वासन पूर्ण केलं नाही, तुमचं सरकार आलं तर तुम्ही काय करणार? या प्रश्नावर राहुल यांनी "आम्ही आंध्राला विशेष दर्जा देऊ. कारण ती सरकारची बांधिलकी होती. पंतप्रधानांनी दिलेला तो शब्द होता. जरी ते पंतप्रधान भाजपचे असले तरी त्या पदाचा मान म्हणून आम्ही ते वचन पूर्ण करू" असं त्यांनी स्पष्ट केलं.
शबरीमलाच्या मुद्द्ययावर राहुल यांनी अतिशय चाणाक्षपणे दोन्ही बाजूंच्या लोकांची मनं दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली. "श्रद्धा आणि विश्वासाचं रक्षण झालेच पाहिजे. मात्र दुसऱ्या बाजूचा आवाजही महत्वाचा आहे. हा प्रश्न अतिशय क्लिष्ट आहे. त्याचं उत्तर हो किंवा नाही, अशा शब्दात देता येणार नाही" असं राहुल म्हणाले.
आज नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत कार्यकर्त्यांना संबोधताना विजयाचा मंत्र दिला. "आपल्याला माहिती आहे की, पाऊस कितीही चांगला झाला, बी-बियाणं कितीही चांगलं असलं, तरी वेळेवर जर शेती केली नाही तर चांगलं उत्पन्न येणार नाही. जसं शेतकऱ्याला शेत नांगरावं लागतं, तसं आपल्यालाही निवडणुकीचा आखाडा नांगरावा लागेल. तरंच हे सगळं कामाला येईल. जिंकण्याचा मंत्र असला पाहिजे.. माझा बूथ सगळ्यात मजबूत" मोदी म्हणाले.
तर राहुल यांनी संयुक्त अरब अमिरातीतून परदेशात असलेल्या भारतीयांशी संवाद साधताना लोकांचं विचार स्वातंत्र्य आणि सर्वोच्च संस्थांचा सन्मान, शेतकरी आणि सामान्य माणसाचा जगण्याचा अधिकार हाच लोकांपर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे आता निवडणुका जशा जवळ येतील, तसा राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)