You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदींचं भाजप अधिवेशनात काँग्रेस आणि विरोधकांवर टीकास्त्र
नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या महाआघाडीवर निशाणा साधला.
काँग्रेसचा डाव होता की, "काहीही करुन मोदीना कटकारस्थानात अडकवायचं होतं, त्यांनी तर अमित भाईंना जेलमध्ये टाकलं. त्यांचा कायद्यावर विश्वास नाहीए. मात्र आमचा कायद्यावर विश्वास आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना माझी एका खटल्यात तब्बल 9 तास चौकशी झाली." असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
काल रामलीला मैदानावर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकताना मोदी सरकारच्या योजनांची जंत्रीच जनतेसमोर ठेवली.
तसंच विरोधी पक्ष आणि संभाव्या महाआघाडीवरही टीका केली.
आज नरेंद्र मोदी यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. सरकारच्या कामाची माहिती देतानाच त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काय म्हटलं नरेंद्र मोदी यांनी
- गेल्या चार वर्षात लोकांचं भल करणाऱ्या योजनांना आणि कायद्यांना काँग्रेसने विरोध केला आहे. देशाच्या मजबुतीविरोधात काँग्रेस उभी राहिली.
- त्यांना मजबूर सरकार हवं आहे, जेणेकरुन त्यांना सुरक्षेच्या संदर्भातील व्यवहारांमध्ये घोटाळा करता येईल, पैसे खाता येतील. पण आम्हाला मजबूत सरकार हवं आहे. ज्यामुळे जनतेला मोफत आरोग्य सेवा देता येतील.
- आम्ही 'एनिमा प्रॉपर्टी अक्ट' घेऊन आलो, ज्याला काँग्रेसनं गेली अनेक वर्ष विरोध केला होता. ओबीसींना आरक्षण दिलं, जे काँग्रेसला नको होतं.
- काँग्रेसला अयोध्या खटल्याचं समाधान नको आहे, त्यामुळेच ते आपल्या वकिलांच्या माध्यमातून अडथळे आणतायत. विकासातही पाय आडवा घालतायत.
- काँग्रेसने त्यांच्या काळात सरन्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. महाभियोग आणून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता.
- सगळे राजकीय पक्ष मिळून एका माणसाला पराभूत करण्यासाठी एकत्रित आलेत, हे पहिल्यांदाच घडत आहे.
- काँग्रेसने स्वच्छता अभियानाला विरोध केला, त्यांच्यामुळे देशातल्या नद्या बर्बाद झाल्या. त्यांनी जम्मू काश्मीर पंचायत निवडणुका, जीएसटी, मेक इन इंडियाचाही विरोध केला.
- काँग्रेस स्वत:ला देशापेक्षा, देशातील संस्थांपेक्षा उच्च समजते. ते कशाचीही परवा करत नाहीत. त्यांना कुणावरही विश्वास नाहीए. स्थिती अशी आहे की ते भारताच्या परराष्ट्र खात्यावर विश्वास न ठेवता दुसऱ्या देशातील परराष्ट्र खात्यावर विश्वास ठेवतात.
- काँग्रेसचा प्रयत्न होता की, कटकारस्थान करुन मोदींना अडकवून टाकायचं. त्यांनी तर अमित भाईंना जेलमध्ये टाकलं. त्यांचा कायद्यावर विश्वास नाहीए. मात्र आमचा कायद्यावर विश्वास आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना माझी एका खटल्यात तब्बल 9 तास चौकशी झाली.
- जे काँग्रेसच्या इच्छेप्रमाणे होत नाही, ते त्याचा विरोध करतात. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो. त्यामुळे ही लढाई सल्तनत आणि संविधान मानणाऱ्यांमध्ये आहे.
- ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा नोकर निवडता, सेवक निवडता, तसाच तुमचा प्रधानसेवक निवडा. असा नेता निवडा जो सगळ्यांना एकजूट ठेऊ शकेल. भरपूर काम करेल आणि इमानदार असेल.
- सगळे म्हणतात की मोदी आले तर आम्ही जिंकू. पण मोदी संघटनेतून तयार झाला आहे. संघटनेच्या संस्कारातून तावून-सुलाखून निघालो नसतो, तर गोड बोलण्याला आम्हीसुद्धा फसलो असतो. लाखो कार्यकर्त्यांच्या तपश्चर्येमुळे आपण इथे पोहोचलो आहोत.
- आपल्याला माहिती आहे की, पाऊस कितीही चांगला झाला, बी-बियाणं कितीही चांगलं असलं, तरी वेळेवर जर शेती केली नाही तर चांगलं उत्पन्न येणार नाही. जसं शेतकऱ्याला शेत नांगरावं लागतं, तसं आपल्यालाही निवडणुकीचा आखाडा नांगरावा लागेल. तरंच हे सगळं कामाला येईल. जिंकण्याचा मंत्र असला पाहिजे.. 'माझा बूथ सगळ्यात मजबूत'
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)