भारतीय सैनिकांच्या बर्फातील व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

भारतीय सैन्य किती कठीण परिस्थितीत सीमेवर देशाचं रक्षण करतं, हे दाखवणारे अनेक फोटो, दृश्यं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ट्विटर आणि इन्स्टाग्रामसह फेसबुकवर असे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

ही दृश्यं खरी आहेत, असं समजून अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि भाजप खासदार किरण खेर यांनीही सोशल मीडियावर ही छायाचित्रं शेअर केली आहेत.

अर्थातच यात कुणालाही शंका नाहीए, की भारतीय सैन्य सीमेवर अतिशय कठीण स्थितीत देशाचं रक्षण करत आहे. जगातलं सर्वात कठीण युद्धस्थळ असलेल्या सियाचिन हिमशिखरावरही भारतीय सैन्य तैनात आहे.

13 हजार ते 22 हजार फूट उंचीवर असलेल्या हिमशिखरावर हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे अनेकदा सैनिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

पण आपण ज्या फोटोंबद्दल बोलतोय, ती काही भारतीय सैनिकांची नाहीएत. बीबीसीच्या पडताळणीत हे स्पष्ट झालंय की परदेशातील सैनिकांचे फोटो भारतीय सैनिकांचे म्हणून दाखवले जातायत. आणि ते सोशल मीडियावर शेअरही होतायत.

या फोटोंसह जो मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे, तो पाहून असं वाटतंय की जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर मिळवण्यासाठी चुकीची माहिती दिली जात आहे.

दावा काय आहे?

  • या तरुणी कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीएत. पाकिस्तानच्या बॉर्डरवर तैनात असलेल्या या शूरवीर भारतीय तरुणींसाठी 'जय हिंद' लिहिताना अजिबात मागंपुढे पाहू नका.

हातात ऑटोमॅटिक रायफल घेतलेल्या दोन महिलांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

या फोटोत डाव्या बाजूला उभ्या असलेल्या महिला सैनिकाच्या छातीवर भारतीय तिरंग्याशी मिळताजुळता एक झेंडाही दिसतोय.

बांग्ला भाषेतलं फेसबुक पेज @IndianArmysuppporter वरही हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यावरुन आणखी तीन हजार लोकांनी हा फोटो शेअर केला आहे.

सत्य काय आहे बघा :

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो पेशमर्गा फोर्समधील महिला फायटर्सचा आहे.

कुर्दिश सेनेनं कट्टरवादी आयसिसशी लढण्यासाठी या महिला फायटर्सना ट्रेन केलं आहे.

आमच्या पडताळणीत असंही समोर आलंय, की अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या शूर महिलांवर लेख आणि बातम्या केल्या आहेत. आणि फोटोत दिसणारा झेंडा हा कुर्दिस्तानचा आहे.

दावा क्रमांक 2 :

  • आपले जवान -5 डिग्री तापमानात आपलं कर्तव्य पार पाडतायत, त्यामुळे आपण आरामात झोपू शकतो. ते आपल्या देशाचं रक्षण करणारे खरे हिरो आहेत. जय हिंद, जय भारत

समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या या कथित सैनिकाचा फोटोही सोशल मीडियावर प्रचंड शेअर होत आहे.

फोटोतल्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा बर्फानं झाकलेला आहे. 'भारतीय योद्धा' नावाच्या फेसबुक पेजशिवाय इतर अनेक ट्वीटर हँडल्सवर हा फोटो शेकडो वेळा शेअर करण्यात आला आहे.

सत्य काय आहे?

हा भारतीय जवान नसून अमेरिकन सर्फर आणि जलतरणपटू डेन (Dan Schetter) चा फोटो आहे.

ज्या व्हीडिओला एडिट करुन हा फोटो वेगळा करण्यात आला आहे, तो व्हीडिओ 29 डिसेंबर 2017ला संगीतकार आणि लेखक जॅरी मिल्सने आपल्या वैयक्तिक यू ट्यूब पेजवर शेअर केला होता.

हा व्हीडिओ पोस्ट करताना जॅरीने लिहिलं होतं की, "हा आहे सुप्रसिद्ध सर्फर डेन. जो अतिशय कठीण परिस्थितीतही मिशिगनमधील सुपिरियर नावाच्या तलावात सर्फिंग करतो. ज्यावेळी मी हा व्हीडिओ शूट केला, त्यावेळी तापमान -30 डिग्री होतं. हा व्हीडिओ बनवताना माझा हात सुन्न झाला होता, आणि डेनची अवस्था तर तुम्ही व्हीडिओत पाहू शकत आहात"

जॅरी मिल्सचा हा व्हीडिओ यू ट्यूबवर आतापर्यंत जवळपास 1 लाख वेळा पाहिला गेलाय.

पण भारतीय सैनिकांचा फोटो दाखवून अशा प्रकारे सोशल मीडियावर शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीए. आणि अशा फोटोजना अनेकदा लोकांनीही खरं मानलंय.

2016-17 मध्ये व्हायरल झालेला असाच एक फोटो:

दावा काय आहे पाहा:

  • भारताच्या खऱ्या हिरोंना मनापासून सलाम
  • सियाचीनच्या हिमशिखरावर -50 डिग्री तापमानात भारतीय जवान काम करतायत.

हा फोटो भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरन खेर यांनीही ट्वीट केला आहे. बॉलिवूड अक्ट्रेस श्रद्धा कपूरनेही हा फोटो 17 डिसेंबर 2017 ला ट्वीट केला होता.

हा फोटो 2014 ला युक्रेनमध्येही व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करताना लिहिलं होतं की, "-20 डिग्री तापमानात हातात हत्यारं घेऊन तैनात असलेले हे शूरवीर जवान आहेत युक्रेनचे"

लोकांनी हा फोटो आणि दावा दोन्ही खरं मानलं. कारण युक्रेनच्या पूर्व भागात वर्षातून एकदा तापमान -20 च्या खाली जातं.

सत्य काय आहे?

हे दोन्ही फोटो रशियाच्या सैनिकांचे आहेत.

2013 मध्ये रशियाच्या स्पेशल फोर्सच्या ट्रेनिंगदरम्यान हा फोटो काढण्यात आला होता.

रशियाच्या काही अधिकृत वेबसाईटवर हा फोटो उपलब्ध आहे. आणि युक्रेनची फॅक्ट चेक वेबसाईट 'स्टोप फ़ेक'ने सुद्धा 2014 मध्ये हा फोटो रशियाचा असल्याचं सांगत एक मोठा लेखही लिहिला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)