You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंतप्रधान मोदी यांचा सोलापुरात विरोधकांवर हल्ला, जनतेला 'तीळगुळ घ्या, गोडगोड बोला'
विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सोलापुरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्थानिक तसंच राष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य केलं. यादरम्यान त्यांनी विरोधकांवर हल्लाही चढवला आणि जाता जाता उपस्थित जनतेला 'तीळगुळ घ्या, गोड गोड बोला,' अशा शुभेच्छाही दिल्या.
देहू-आळंदी पालखी मार्ग, घरकुलांची पायाभरणी, स्मार्ट सिटी, ड्रेनेज योजना अशा विविध विकासकामांचं भूमिपूजन मोदींनी आज केलं. यावेळी मोदींसोबत मंचावर महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते दळणवळण मंत्री नितीन गडकरी, हेही उपस्थित होते.
सोलापुरात मोदींचं स्वागत घोंगडी आणि पुणेरी पगडी भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
"पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणीला, सोलापूरचं दैवत सिद्धेश्वर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना मी साष्टांग नमस्कार करतो. तसंच इथं जमलेल्या प्रत्येकाला अभिवादन करतो," असं मोदी यावेळी आपलं भाषण सुरू करताना म्हणाले.
यावेळी मोदी काय काय म्हणाले?
- सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर या मार्गाला आम्ही मंजुरी दिली आहे. लवकरच हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल.
- आज राज्यसभेत (आर्थिकदृष्ट्या दुर्बळ सवर्णांना आरक्षणाच्या मुद्द्यावर) जनभावनेचा आदर करत सकारात्मक चर्चा करतील आणि कालसारखा सुखद निर्णय येईल, अशी अपेक्षा करतो.
- दलित-आदिवासी, OBC यांच्या वाट्यातील हिस्सा कुणालाच आम्ही देणार नाही. यासाठीच आम्ही 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आहे.
- सिटिझनशिप अमेंडमेंट बिल लोकसभेत पास झाल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्यांना तसंच भारताला हृदयाशी कवटाळणाऱ्यांना भारताच्या नागरिकतेचा रस्ता साफ झाला आहे.
- तरुणांच्या रोजगाराच्या संधीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याचं मी आश्वासन देतो.
- सोलापूरपासून उस्मानाबाद पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी झाला आहे. यासाठी 1,000 कोटी रुपये लावण्यात आले आहेत. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. ज्या प्रकल्पांचा शिलान्यास आम्ही करतो, त्यांचं उद्घाटनही आम्हीच करतो.
- येत्या काळात 'उडान' योजनेअंतर्गत सोलापूरातूनही विमान उड्डाण भरेल, याची तयारी करण्यात येत आहे.
- देशातल्या 100 शहरांना स्मार्ट करण्याची मोहीम सुरू आहेत. यामध्ये सोलापूरचाही समावेश आहे.
- देशातल्या काही लोकांना राजकारणाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. या लोकांमुळे शहरांची अवस्था बिघडली. हेच लोक आज स्मार्ट सिटी योजनेवर हसत आहेत.
- 2004 ते 2014 या 10 वर्षांत शहरांतील गरीब लोकांसाठी 13 लाख घरं बनवण्याचा कागदावर निर्णय झाला. यांतील फक्त 8 लाख घरं बांधण्यात आली. एवढ्या मोठ्या देशात एका वर्षात 80,000 घरं मोदी सरकारनं एकट्या सोलापूरात 30,000 घरांचं काम केलं. आमच्या सरकारनं 4 वर्षांत 70 लाख घरं बांधायला घेतली. यांतील 14 लाख घरं बांधून पूर्ण झालीत.
- मोदीला तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि भीतीही दाखवू शकत नाही. हा चौकीदार अजिबात झोपत नाही. जनतेच्या भल्यासाठी सदैव जागा असतो. चौकीदाराच्या या शक्तीचं कारण तुमचे आशीर्वाद आहेत. त्यांनी मला शिव्या दिल्या, ते खोटं बोलले तरी चौकीदार ही सफाई मोहीम थांबवणार नाही.
- पुढील आठवड्यात मला कल्पना आहे की या काळात सिद्ध रामेश्वरांची गड्डा यात्रा भरते. मकरसंक्रांत आणि या यात्रेनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तीळगुळ घ्या, गोड गोड बोला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
- सोलापूरमध्ये मोदी तीन वेळा आले. प्रत्येक वेळेला त्यांनी शहराला काही ना काही दिलं आहे. आज 1,000 कोटींचं काम मोदींच्या आशीर्वादानं इथं होत आहेत.
- सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी सरकारनं 450 कोटी दिले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचं रूपडं पालटत आहे.
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूरातल्या गरिबांसाठी 30,000 घरं तयार होत आहेत. य घरांसाठी अमृत योजनेतून सर्व काही पायाभूत सुविधा पुरवण्यात येईल.
- सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला मोदींनी मंजूरी दिली आहे. रस्त्याच्या जाळ्यामुळे वारकऱ्यांना वारीला जाताना कोणताही त्रास होणार नाही.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्यानं या दौऱ्यावर बहिष्कार घालण्यात येईल, असं धनगर समाजाच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं.
मोदी हे फसव्या घोषणा करतात, असा विरोधाचा सूर राष्ट्रवादीनं निदर्शनांद्वारे लावला आहे. दोन कोटी तरुणांना रोजगार, सोलापूरला टेक्स्टाईल हब करण्याचं आश्वासन, धनगर आणि मुस्लीम आरक्षण, अशा विविध मागण्यांवरून आंदोलन सुरू आहेत.
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये सभा घेताना फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली. 'दुष्काळ गंभीर, पण शिवसेना खंबीर' अशा शब्दात ठाकरे यांनी जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
"मी एक दुष्काळ आटवतो, तुम्हीही एक दुष्काळ आटवा," अशा शब्दांत शिवसेनेला मतं देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)