You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिया दत्त यांच्या लोकसभा निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचं खरं कारण काय?
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहून प्रिया दत्त यांनी आपला निर्णय कळवला आहे. त्यांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय, याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
"वैयक्तिक कारणांसाठी हा निर्णय घेत असल्याचं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. 'नर्गिस दत्त फाउंडेशन'च्या माध्यमातून माझं सामाजिक काम सुरूच राहील," असंही प्रिया दत्त यांनी एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे.
कोण आहेत प्रिया दत्त?
प्रिया दत्त या अभिनेत्री नर्गिस आणि दिवंगत अभिनेते तसंच माजी खासदार सुनील दत्त यांची कन्या आहेत. अभिनेता संजय दत्त आणि नम्रता ही त्यांची भावंडे आहेत.
मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातून त्यांनी समाजशास्त्रात पदवी संपादन केल्यावर न्यू यॉर्कमधील 'सेंटर ऑफ मीडिया आर्टस्' येथून त्यांनी टेलिव्हिजन प्रोडक्शनमध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली.
'नर्गिस दत्त मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट'च्या (NDMCT) त्या संस्थापकही आहेत. त्यांनी मुंबईस्थित उद्योजक ओवेन रोन्कोन यांच्याशी विवाह केला आहे. नम्रता आणि प्रिया यांनी 'मिस्टर अँड मिसेस दत्तः मेमॉयर्स ऑफ अवर पॅरेंटस' नावाने नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या आठवणींवर पुस्तक लिहिले आहे.
सुनील दत्त यांनी 1984, 1989, 1991, 1999, 2004 असं पाच वेळा मुंबई वायव्य मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 1996 आणि 1998 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मधुकर सरपोतदार विजयी झाले होते.
2005 मध्ये त्यांच्या निधनानंतर प्रिया दत्त यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या यशस्वी झाल्या. त्यानंतर 2009 साली प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांनी लोकसभेत दुसऱ्यांदा प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या महेश जेठमलानी यांचा पराभव केला होता.
मात्र 2014 साली भाजपाच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीमध्ये पूनम महाजन यांना 4,78,535 मते तर प्रिया दत्त यांना 2,91,764 मते मिळाली होती.
गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून मुक्त करण्यात आलं होतं.
मात्र काँग्रेस पक्षातील अंतर्गत दुफळीला कंटाळून प्रिया दत्त यांनी हा सोमवारी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
संजय निरुपम यांच्यासोबत मतभेद?
प्रिया दत्त यांची नाराजी ही गेल्या काही वर्षांपासूनची असल्याचं निरीक्षण पत्रकार पल्लवी घोष यांनी नोंदवलं. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचं अध्यक्षपद संजय निरुपम यांना दिल्यापासूनच प्रिया दत्त नाराज होत्या.
"गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रिया दत्त पक्षापासून अलिप्त झाल्यासारख्या वागत होत्या. मध्यंतरी त्यांनी राहुल गांधींच्या टीमवरही टीका केली होती. राहुल गांधी यांची टीम सर्वांना सोबत घेऊन जाणारी नसल्याचं प्रिया दत्त यांनी म्हटलं होतं. पक्षासोबतचे त्यांचे संबंध एवढे ताणले गेले होते, की राहुल गांधी मुंबईमध्ये आल्यानंतर प्रिया दत्त त्यांना भेटायचंही टाळायच्या," असं पल्लवी घोष यांनी सांगितलं.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात की, "प्रिया दत्त यांचे संजय निरूपम यांच्यासोबत सलोख्याचे संबंध नव्हतेच. त्याचबरोबर त्यांचा कृपाशंकर सिंह आणि नसीम खान यांच्याशीही वाद झाला होता.
"गेल्या वर्षभरापासून दत्त पक्षामध्ये सक्रिय नव्हत्या. पक्षाच्या मीटिंगला त्यांची उपस्थिती नसायच्या. राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर असताना, प्रिया दत्त त्यांना भेटायलाही जायच्या नाहीत. या सर्वाची परिणती ही प्रिया दत्त यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयात झाली आहे."
पक्षासोबतचे संबंध ताणलेले
काँग्रेस आणि प्रिया दत्त यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून आलेला दुरावा हेच त्यांच्या या निर्णयामागचं कारण आहे, असं मत पत्रकार किरण तारे यांनी व्यक्त केलं. "प्रिया दत्त यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दत्त यांच्याकडून हे पद काढून घेतलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रिया दत्त यांनी पक्षकार्यातून अंग काढून घेतलं होतं, हे कुठेतरी राहुल गांधींना खटकलं होतं. पद काढून घेतल्यानंतर प्रिया दत्त यांनीही 'माझ्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही,' अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं संबंध दोन्ही बाजूंनी ताणलेले होते," असं किरण तारेंनी म्हटलं.
प्रिया दत्त यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतला का, या प्रश्नावर बोलताना किरण तारे यांनी म्हणतात की, "गटबाजी ही काँग्रेससाठी नवीन नाही. संजय निरूपम यांच्यासोबत त्यांचे मतभेद होतेच. पण केवळ ही एकमेव गोष्ट त्यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाला कारणीभूत ठरली नाहीये."
प्रिया दत्त यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय तर जाहीर केला आहेच, पण प्रिया दत्त यांच्या मतदार संघातून निवडणूक कोण लढवणार हा आता काँग्रेसपुढे प्रश्न आहे, असंही किरण तारे यांनी सांगितलं. प्रिया दत्त यांच्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून कृपाशंकर सिंह किंवा नसीम खान हे निवडणूक लढवू शकतात, असा अंदाजही तारे यांनी वर्तवला.
'निर्णय राहुल गांधी घेतील'
दरम्यान, प्रिया दत्त यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात निवडणूक न लढविण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नसल्याचं मत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी व्यक्त केलं.
"त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे, त्यामध्ये नाराजीचा प्रश्न येतोच कोठे, असंही सावंत यांनी म्हटलं. प्रिया दत्त यांनी पाठवलेल्या पत्रावर आता पक्षाध्यक्षच निर्णय घेतील," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही प्रिया दत्त यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)