You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'राहुल गांधी यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, पण...'
"पहिलं ध्येय आहे 2019मध्ये भाजपला रोखणं. त्यानंतर जर मित्रपक्षांची इच्छा असेल तर मी नक्कीच पंतप्रधान होईन," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना 'होऊ द्या चर्चा'मध्ये प्रश्न विचारला.
त्यावर आलेल्या या काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया -
रणजीत पाटील यांच्या मते, "जोपर्यंत काँग्रेसमधून घराणेशाही बाद होणार नाही, तोपर्यंत देशामध्ये काँग्रेसची सत्ता येणं अजिबात शक्य नाही. राहुल गांधीच्या कारकिर्दीत तर नाहीच नाही."
प्रसाद चव्हाण यांनी विचारलं आहे की, "फक्त मोदींना हटवण्यासाठी एकत्र आलेले खरंच देशाचं भलं करतील का आणि दुसऱ्यांच्या इच्छेपेक्षा त्यांची स्वतःची पंतप्रधान न बनण्याची इच्छा आहे का?"
सागर घाटे यांच्या मते,"सर्वप्रथम 2019मध्ये भाजपाला रोखणं हे मुख्य ध्येय आहे. काँग्रेस मित्रपक्षांना जागा कसे वाटणार आणि किती मित्र पक्षांना किती विश्वासात घेणार यावर गणित अवलंबून आहे. पण त्याही अगोदर जनतेचा कौल जाणून घेणं हे आद्य कर्तव्य असणार. कारण गांधी घराण्यावर, काँग्रेसवर प्रेम करणाऱ्यांच्या संख्या अफाट आहे हे आपण नाकारू शकत नाही."
"तरुण राहुल गांधीकडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. सध्यातरी मोदी साहेबाच्या तोडीस तोड पंतप्रधानाच्या शर्यतीत राहुल गांधीं शिवाय दुसरा तडफदार चेहरा नाही. काही अपवाद वगळले तर जनतेला आणि मित्रपक्षांना राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत याची जाणीव आहे. राहुल गांधी शिवाय पर्याय नाही. म्हणूनच राहुल गांधी यांनी अशी गुगली टाकून एका प्रकारे आपली भूमिकाच स्पष्ट केली म्हणल्यास वावगं ठरु नये."
प्रमोद बंडगर यांनी लिहिलंय की, "मित्रपक्षांची लाख इच्छा असेल पण देशातल्या लोकांची इच्छा असायला हवी, तरच पंतप्रधानपदी बसाल."
संदीप जोशी यांच्या मते, "राहुल यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, पण शरद पवार, मुलायमसिंह यादव, ममता बॅनर्जी हे नेते राहुल गांधी सोडून काँग्रेसचा दुसरा कोणताही उमेदवार पंतप्रधान म्हणून मान्य करतील."
भीमन्ना कोप्पर यांनी लिहिलंय की, "नरेंद्र मोदींनी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या जवळच्या मित्रांना मदत केली हे उघड आहे. काँग्रेसनं केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यात आणि खोटारडेपणा करण्यात ते पटाईत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे त्यांनी वाटोळं केलं आहे. पुढील 5 वर्षं अशा माणसाला सत्ता देणं धोक्याचं आहे. भाजपचे नितीन गडकरी किंवा काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे हे योग्य पर्याय आहेत."
या आणि अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया वाचकांनी या चर्चेत नोंदवल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)