You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित राज ठाकरे आणि मिताली यांच्या प्रेमाची गोष्ट आणि 'राज'कारण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मिताली बोरुडे आज विवाहबद्ध झाले. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील नावमंत या लग्नाना सोहळ्याता उपस्थिती होते. अमित आणि मिताली गेली अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत, विशेष म्हणजे मिताली आणि राज यांची मुलगी उर्वशी या दोन्ही जीवलग मैत्रिणी आहेत.
राज ठाकरे यांनी दोघांच्या लग्नाचं निमंत्रणपत्रिका स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव यांना दिली होती.
गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी कन्हैय्याकुमार आणि हार्दिक पटेल यांची भेट घेतली होती. आता अमित यांच्या विवाहाच्या निमित्ताने इतर नेत्यांशी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी घेतल्या होत्या. राज्यातील विविध क्षेत्रातील दिग्गजांचे राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या लग्नाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील लोक एकत्र आले होते.
फॅशन डिझायनर ते ठाकरे घराण्याची सून
मिताली ही ओबेसिटी सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची मुलगी आहे. अमित आणि मिताली यांचा 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता.
राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी आणि मिताली या दोघी मैत्रिणी असून त्यांना वांद्रे-खार येथे "द रॅक" नावाने कपड्यांचा ब्रँडही सुरू केला आहे. उर्वशी चांगली मैत्रिण असल्याने मिताली हीच राज ठाकरे यांच्या घरी येणं जाणं होतं. अमित आणि मिताली कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना ओळखतात. गेली 10 वर्षं ते एकमेकांचे मित्र आहेत, असं सांगितलं जातं. मध्यंतरी अमित ठाकरे आजारी होते, त्यावेळी मितालीने अमितला खंबीर साथ दिली होती, असं त्यांच्या जवळचे मित्र सांगतात.
मितालीने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून ती रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
अमित यांनी रुपारेल कॉलेजमधून पदवी घेतल्यावर वेलिंगकर कॉलेजमधून एमबीए केलं आहे. त्यांना फुटबॉल, सायकलिंग, किक बॉक्सिंग आणि व्यंगचित्रांची विशेष आवड असल्याचे त्याचे मित्र महेश ओवे सांगतात. "कॉलेज जीवनापासून या दोघांची ओळख होती आणि आता त्यांचा प्रेमविवाह होत आहे. मित्र म्हणून अमित अत्यंत मनमोकळे असतात, त्यांचा कोणताही बडेजाव नसतो. कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत सहजपणे ते मिसळतात," असं ओवे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले.
अमित ठाकरे यांचं व्यक्तिमत्व
गेल्या वर्षभरापासून अमित ठाकरे भेटी-बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत.
राज ठाकरे आणि मनसेच्या राजकीय भूमिकांचे समर्थक, 'दगलबाज राज'या पुस्तकाचे लेखक कीर्तीकुमार शिंदे सध्या अमित ठाकरे यांच्या कार्यक्रमांचे निरीक्षण करत आहेत.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "अमित यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि मनमिळावू आहे. समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणं आणि सार्वजनिक जीवनातील वावर आश्वासक आहे."
मनसेच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग
शिंदे सांगतात, "मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना अमित यांनी राजकारणात सक्रीय व्हावं असं वाटतं."
"पक्षाच्या विविध सामाजिक उपक्रमांना त्यांची उपस्थिती भविष्यातील राजकीय संकेत देतात," असं शिंदे यांचं निरीक्षण आहे.
विवाह आणि राजकारण वेगवेगळं
ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्या मते अमितच्या विवाहाच्या निमित्तानं राजकीय हालचाली करण्याचा राज ठाकरे यांचा कोणताही हेतू नसावा.
ते म्हणतात, "राज ठाकरे यांना सर्वच गोष्टी भव्यदिव्य केलेल्या आवडतात. तेच याबाबतीत असावं. पत्रिकेसाठी ते पहिल्यांदा सिद्धीविनायकाला गेले त्यानंतर रतन टाटा यांच्याकडे आणि मग उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. याचाच अर्थ कौटुंबिक सोहळा आणि राजकारण दोन्ही वेगळं ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे."
अमितच्या राजकारण प्रवेशाबाबत सांगताना संदीप आचार्य म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून अमित कार्यकर्त्यांच्या भेटी घेतच आहेत. शाखांमध्ये जाणं, ज्यांना राज ठाकरेंपर्यंत पोहोचणं शक्य नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेणं सुरूच आहे. फक्त समारंभ करून राजकीय प्रवेश करायचा की नाही हे राज ठाकरेच ठरवतील. अन्यथा आता अमित राजकारणात आहेच असं म्हणावं लागेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)