मनमोहन सिंग म्हणतात, 'मी पत्रकार परिषदांना घाबरत नव्हतो' - #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो - मनमोहन सिं

मी पत्रकार परिषदांना घाबरत नव्हतो, असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या चेंजिंग इंडिया या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

"लोक मला सायलेंट पंतप्रधान म्हणायचे. पण मला वाटतं, पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान मी नव्हतो. मी मीडियाला नियमितपणे सामोरं जायचो आणि विदेश दौऱ्याहून आल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायचो.

मला अपघातानं झालेले पंतप्रधान असं म्हटलं जात आहे, पण मी अर्थमंत्रीसुद्धा अपघातानच झालो होतो," असंही सिंग यांनी म्हटलं आहे.

"देशाला मजबूत आणि स्वतंत्र अशा केंद्रीय बँकेची गरज आहे. जेणेकरून बँक आणि केंद्र सरकार यांना एकत्रितरित्या काम करता येईल," असंही सिंग यांनी म्हटलं आहे.

2. वाटलं नव्हतं संघाला असे दिवस येतील - मोहन भागवत

"आणीबाणीच्या काळात निवडणुकांमध्ये आम्ही सपाटून आपटत होतो. नंतर काम करण्यासाठी पुन्हा उभे राहत होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असे दिवस येतील, असं कुणी सांगितलं असतं तर विश्वासही ठेवला नसता," असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

पुणे येथे गीता धर्म मंडळाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

"भारतीय व्यक्तीनं जीवन कशा प्रकारे व्यतीत करावं, याचं निर्देशन भगवद्गीता करते. त्यामुळे गीतेचा अभ्यास आणि आचरण आवश्यक आहे. भगवद्गीता घराघरात पोहोचली तर भारत आताच्या शंभरपट सामर्थ्यासह विश्वगुरू म्हणून पुढे येईल," असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

3. मराठवाड्यात सातशेहून अधिक टँकर

आतापर्यंत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये टँकरने सातशेचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

विभागातील 568 गावे आणि 73 वाड्यांमधील 16 लाख 22 हजार नागरिकांची तहान 705 टँकरद्वारे भागविण्यात येत आहे.

यामध्ये औरंगाबादमध्ये 463, बीडमध्ये 139, जालनामध्ये 95, उस्मानाबादमध्ये 6 आणि नांदेडमध्ये 2 टँकर सुरू आहेत.

4. लिओनेल मेस्सीला पाचव्यांदा 'गोल्डन शू' पुरस्कार

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं पाचव्यांदा गोल्डन शू पुरस्कार पटकावला आहे. डेली मेलनं ही बातमी दिली आहे.

मेस्सीनं बार्सिलोनासाठी 68 सामन्यांत 34 गोल नोंदवले. लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह आणि टॉटेनहॅमच्या हॅरी केनला मागे टाकत मेसीनं हा पुरस्कार पटकावला आहे.

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं आतापर्यंत चार वेळा हा पुरस्कार जिंकला आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

5. 'व्हिलेज रॉकस्टार्स' ऑस्करमधून बाहेर

भारताकडून परदेशी भाषांतील चित्रपटांच्या श्रेणीत पाठवला गेलेला "व्हिलेज रॉकस्टार्स' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आसामी चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

परदेशी भाषांतील चित्रपटाच्या श्रेणीत निवडलेल्या 9 चित्रपटांची नावं अकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्टस अॅण्ड सायन्सनं नुकतीच जाहीर केली.

या यादीत रिमा दास यांनी दिग्दर्शित केलेल्या "व्हिलेज रॉकस्टार्स'ला स्थान मिळालं नाही.

91 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी परदेशी भाषांतील चित्रपट श्रेणीत वेगवेगळ्या देशांतून तब्बल 87 चित्रपट आले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)