मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा 'सॉफ्ट हिंदुत्वा'चा अजेंडा?

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भगवी वस्त्रं धारण केलेल्या साधूंची गर्दी, मंत्रघोष आणि शंखनाद हे बघून हा कार्यक्रम भाजपचा असेल असा पाहणाऱ्याचा समज व्हावा. मात्र हा सोहळा काँग्रेसचा होता. पंधरा वर्षांनंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तेचा संपलेला वनवास काँग्रेसने साधुसंतांच्या आशीर्वादाने साजरा केला.

भोपाळच्या जंबुरी मैदानावर पार पडलेल्या भव्य सोहळ्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

विरोधकांच्या उपस्थितीमुळे महाआघाडीच्या शक्यतेला मिळालेली बळकटी हे या सोहळ्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. त्याचबरोबर या सोहळ्यापूर्वी मंचावर पहायला मिळालेल्या दृश्यांमुळे काँग्रेसचा सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा कायम राहील, अशी शक्यता निरीक्षकांनी व्यक्त केली.

कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला डझनभर साधू-संतांना आमंत्रण होते. शपथविधीपूर्वी हे साधुसंत व्यासपीठावर विराजमान झाले होते. साधुसंतांचा आशीर्वाद घेऊन शंखनादाच्या गजरात कमलनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आले. यापूर्वी जे चित्र भाजपच्या कार्यक्रमात दिसायचे ते आता काँग्रेसच्याही मंचावरही दिसू लागले आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

'काँग्रेस आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये मूलभूत फरक'

अर्थात काँग्रेसच्या व्यासपीठावर हिंदुत्वाची जी झलक पहायला मिळाली ती भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळी असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांनी व्यक्त केले. कमलनाथ यांच्या शपथविधीला केवळ हिंदू साधूच नाही तर चर्चचे मुख्य पाद्री, मौलाना, ग्रंथीदेखील उपस्थित असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

"मध्य प्रदेश हे धार्मिकदृष्ट्या परंपरावादी राज्य आहे. इथे हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे 'भारत माता की जय'सारख्या देशभक्तीपर घोषणा, प्रार्थना, शंखनाद तसेच व्यासपीठावर हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व मोठ्या संख्येने दिसणे स्वाभाविक आहे. शिवाय काँग्रेसने नेहमीच धर्मनिरपेक्षता टिकविण्यासाठी 'सुप्रीमसी ऑफ हिंदू फेथ' या धारणेचा पुरस्कार केला आहे," असं मत रशीद किडवाई यांनी व्यक्त केलं.

मतांच्या राजकारणात काँग्रेसही भाजपचाच मार्ग अवलंबत आहे का, या प्रश्नाचे उत्तर किडवाई यांनी नकारार्थी दिले. "डिसेंबर २००४ मध्ये पार पडलेला उमा भारतींचा शपथविधी सोहळा मला आठवतोय. या सोहळ्यालाही साधुसंतांची उपस्थिती होती. पण एकही मौलाना, पाद्री किंवा ग्रंथींना आमंत्रण नव्हते. काँग्रेसच्या हिंदुत्वाच्या धोरणामुळे मुस्लीम समुदायाच्या मनात कधीही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली नाही. हाच भाजप आणि काँग्रेसच्या हिंदुत्वामध्ये असलेला फरक आहे," असं रशीद किडवाईंनी म्हटले.

'काँग्रेसकडून व्होटबँकेचे राजकारण'

भाजपच्या नेत्या शायना NC यांनी मात्र काँग्रेस केवळ व्होटबँकेचे राजकारण करत असल्याचा आरोप केला: "ज्यांनी कायम लोकानुनयाचे राजकारण केले, त्यांना अचानकपणे हिंदुत्वाचा पुळका कसा आला? या गोष्टी लोकांनाही कळत असतात. मध्य प्रदेशमध्ये तर काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये फारसे अंतर नाही. अर्थात, आता काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यांनी भविष्यात केवळ व्होट बँकेवर नजर न ठेवता विकासाचे काम करावे. शिवराज सरकारने राबविलेल्या अनेक चांगल्या योजना पुढे न्याव्यात हीच आमची अपेक्षा आहे."

काँग्रेस आणि भाजप परस्परांच्या हिंदुत्वाला व्होटबँकेचे राजकारण म्हणत असले, तरी बऱ्याचदा निवडणुकांच्या रणधुमाळीत दोन्ही पक्षाच्या हिंदुत्वामधली ही सीमारेषा पुसट झालेली दिसते. त्यामुळेच गुजरात निवडणुकांच्या वेळी भाजपने राहुल गांधींचा धर्म कोणता, असं विचारल्यावर राहुलनी एक पाऊल पुढे जात आपण जानवेधारी ब्राह्मण असल्याचं सांगितलं. अनेक मंदिरांना भेटी देत पूजाअर्चा केल्या.

हिंदी हार्टलँडमधील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसने मंदिरांना भेटी दिल्या, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गौशाला सुरू करू, गोमूत्राचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेऊ, पडीक कुरणे ही गायरानांसाठी देऊ, गोहत्या प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करू अशी आश्वासनं मध्य प्रदेशसाठी जाहीर केलेल्या ११२ पानी 'वचनपत्रा'त दिली होती.

राम आणि नर्मदा या मुद्द्यांचाही वापर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात करून घेतला होता. वनवासात असताना श्रीराम जेथून गेले, त्या मार्गावरून 'रामपथ गमन' निर्माण केला जाईल आणि नर्मदेच्या तीरावर तीर्थक्षेत्रं विकसित करण्याचं आश्वासनही काँग्रेसने दिलं होतं.

काँग्रेसचा हा सगळा प्रवास हिंदुत्वाच्या वाटेवरून चालला असल्याचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना मान्य नाही. राजीव सातव म्हणतात, "कमलनाथ यांनी शपथविधीनंतर घेतलेला पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आहे. ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. सोहळ्याला कोणकोण होतं यावर चर्चा करणं निरर्थक आहे. आम्ही केवळ साधुसंत नाही, तर मौलवी, पाद्री यांनाही बोलावलं होतं. विरोधी पक्षाचे नेते होते. आणि शिवराज सिंह चौहान यांनाही आमंत्रण दिलं होतं. ही काँग्रेसची सर्वसमावेशक भूमिका आहे."

मध्य प्रदेशातलं हिंदू मतांचं महत्त्व

मध्य प्रदेशमधील ५.३९ कोटी मतदारांपैकी जवळपास ९० टक्के मतदार हिंदू आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुस्लीम मतदार आपल्यापासून दुरावणार नाहीत, याची कदाचित काँग्रेसला खात्री दिसते. मात्र त्याचवेळी बहुसंख्य हिंदू मतदारांना नाराज न करण्याची खबरदारी काँग्रेसकडून घेण्यात येत आहे, असं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही मध्यप्रदेश महत्त्वाचं आहे. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या २९ जागा आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला यांपैकी केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. केवळ मध्यप्रदेशच नाही तर राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ या हिंदी पट्टयातील राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत वाईट झाली होती.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत, तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये मिळून 65. या ठिकाणी संख्याबळ वाढवायचे असेल तर विकासासोबतच भावनिक मुद्द्यांनाही हात घालायला हवा, ही अपरिहार्यता काँग्रेसला जाणवू लागल्याचं दिसतंय, त्यामुळेच कमलनाथांच्या शपथविधी सोहळ्यातील शंखनादांचे प्रतिध्वनी बराच काळ ऐकू येत राहतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)