हिंदुत्व की विकास : 2019 निवडणुकांमध्ये भाजपसमोर प्रमुख आव्हान

    • Author, प्रियंका पाठक
    • Role, ग्लोबल रिलिजन रिपोर्टर, बीबीसी

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या मुख्य हिंदी भाषिक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. त्यातून सत्ताधारी भाजप नक्कीच काहीतरी धडा घेईल. या निकालामुळे हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्यावरच उलटला आहे.

काल झालेल्या मतमोजणीत दोन राज्यात स्थानिक पातळीवर स्थानिक पक्ष वर आले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे मोठं आव्हान निर्माण केलं आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यावर भाजपला 13 राज्यात विजय मिळाला होता. पण ताज्या निकालामुळे हा विजयाचा अश्वमेध रोखला गेल्याचं चित्र आहे.

त्यामुळे सगळीकडे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय - 'भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्यावरच उलटला आहे का? सर्वसमावेशक, विकासाच्या मुद्द्यावरून हे मुद्दे ध्रुवीकरण, भेदभावापर्यंत कसे पोहोचले?'

हे सर्व प्रश्न साहजिकच आहेत कारण हिंदुत्वाचे खंदे समर्थक आणि ध्रुवीकरणासाठी जबाबदार असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या पाचही राज्यातले स्टार प्रचारक होते.

आदित्यनाथ यांनी पाच राज्यात एकूण 74 सभा घेतल्या. त्यापैकी 26 राजस्थानमध्ये, 23 छत्तीसगडमध्ये आणि 17 मध्य प्रदेशात घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अनुक्रमे 31 आणि 56 सभा घेतल्या.

याचबरोबर गेले काही महिन्यात संघ परिवारातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेत त्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1980च्या दशकापासून त्यांनी अयोध्येचा मुद्दा उचलून धरला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराचा मुद्दा 24 तासात निकाली काढण्याची शपथ घेतली होती. शरयू नदीच्या किनारी त्यांनी तीन लाख दिवे लावले. अर्धकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्याचीही त्यांनी घोषणा केली. तसंच उत्तर प्रदेशात रामाचा पुतळा उभारण्याची मनीषाही त्यांनी बोलून दाखवली.

निरीक्षकांच्या मते विकासाच्या मुद्दयापासून दूर गेल्यामुळे पक्षाचा पराभव झाला. हिंदुत्वाचा मुद्दाही त्यांच्यावर उलटला.

खासगी संभाषणात संघ परिवारातले लोक या मुद्द्याशी सहमत नाहीत. त्यांच्या मते खरी परिस्थिती अगदी विरुद्ध आहे. ज्याप्रमाणे आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत लोक सरकारवर नाराज आहेत, त्याचप्रमाणे सरकारने राम मंदिर बांधण्याच्या वचनाची पूर्तता केली म्हणूनही नाराज आहेत.

जर विहिंप आणि संघ या मुद्दयासाठी रस्त्यावर आले आहेत तर त्यावरून तुम्हाला काय कळतं? त्यामुळे मतदारांनाही काय संदेश जातो?

भाजप आणि संघाचं कौटुंबिक भांडण

दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या एका सभेत हजारो लोक राम मंदिर उभारण्याच्या मुद्द्यावरून एकत्र आले आणि त्यांनी सरकारवर टीका केली. तिथे त्यांनी पहले 'राम को आसन दो, फिर हमको सुशासन दो'या घोषणाही त्यांनी दिल्या. मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला बसलेला हा धक्का होता.

अंतर्गत सूत्रांनुसार हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौटुंबिक भांडण आहे. हे भांडण 2001ची आठवण करून देतं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. अर्थव्यवस्थेची चांगलीच प्रगती झाली होती आणि तेव्हाही त्यांना राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्याचा सामना करावा लागला होता.

मंदिर बांधण्याची तेव्हाही मागणी विहिंप आणि संघाने केली होती. तेव्हा त्यांनी सरकारला धमकी दिली होती की जर मंदिराचं बांधकाम सुरू केलं नाही तर 2002 मध्ये ते स्वत:च बांधकामाला सुरुवात करतील.

आताही भाजपचं सरकार आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे, मात्र त्यांच्या काळात अर्थव्यवस्था अगदीच डबघाईला गेली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा वर आला आहे. त्याचा निवडणुकीत काहीच फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारची अवस्था अवघड झाली आहे आणि त्यामुळे विकास की हिंदुत्व ही निवड करावी लागणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शिस्तीसाठी तसंच प्रत्यक्ष मतदानासाठी मतदारांना उद्युक्त करणं ही त्यांचं बलस्थान आहे. 2014च्या निवडणुकीत मिळालेल्या विजयासाठी त्यांच्या या कार्यपद्धतीचा मोठा वाटा होता. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

त्यामुळे पुरोगामी लोकांना हिंदुत्वाचा मुद्दा उलटला आहे, असं वाटतं. त्याचप्रमाणे आता सरकारने पुन्हा अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करायला हवं, अशी भावना असली तरी भाजपमधील काही लोकांना असं वाटतं की पक्षाने राम मंदिर, समान नागरी कयदा आणि गौरक्षा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायला हवं.

अर्थव्यवस्थेत अडचणी आहेत, हे अनेकांना मान्य आहे मात्र भाजप-संघ-विहिंप या तिन्ही संघटनांमधील नेत्यांना असं वाटतं की यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा आणखी महत्त्वाचा होईल आणि आगामी निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढल्या जातील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)