You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रसायनी : एचओसी कंपनीतील वायूगळतीमुळे 31 माकडांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:
1. रसायनी: एचओसी कंपनीतील वायूगळतीमुळे 31 माकडांचा मृत्यू
रसायनीतील पाताळगंगा परिसरातील हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनीत वायूगळती झाल्यामुळे 31 माकडं आणि 14 पक्षी मृत्यूमुखी पडल्याची बातमी लोकमतने दिली आहे. मात्र त्याचा काहीही थांगपत्ता न लागू देता कंपनीच्या अधिकाऱ्यांना मृत प्राण्यांची विल्हेवाट लावली, असंही या बातमीत म्हटलं आहे.
शनिवारी रात्री यासंबंधी अधिकारी आणि कर्मचारी आणि वन्यजीव सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनी इस्रोसाठी इंधननिर्मितीचं काम करते, असं या बातमीत म्हटलं आहे.
2. उद्धव ठाकरेंची आता चंद्रभागेतीरी पूजा
अयोध्येतील राममंदिराच्या निमित्ताने भाजपविरोधात आक्रमक झालेली शिवसेना येत्या २४ डिसेंबरला पंढरपुरात शक्तिप्रदर्शन करणार आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. तसेच पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेणार आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.
यावेळी मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या 'विठाई' या नव्या एसटी सेवेचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.
3. काश्मीर: जवानांच्या गोळीबारात सात नागरिक ठार
दक्षिण काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या सुरक्षा दलांनी अनियंत्रित जमावाला रोखताना केलेल्या गोळीबारात सात नागरिक ठार झाल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. या घटनेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारवाईत तीन कट्टरपंथी ठार झालेअसून एक जवानही मृत्युमुखी पडला आहे.
सिरनू खेड्यात एका वस्तीत कट्टरपंथी लपल्याची माहिती गुप्तहेरांनी दिल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला होता.
4. जैतापूर प्रकल्पाबाबत स्वराज यांची फ्रान्सच्या मंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जेन युवास ली ड्रायन यांच्यात भारत आणि फ्रान्स या दोन देशात संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी बातमी दिली आहे.
ले ड्रायन आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची जैतापूरमधील युरोपियन प्रेशराईज्ड रिअक्टर (EPR) बद्दल चर्चा केली. "पुढील काही महिन्यात हा प्रकल्प उभा रहाण्याबाबतचा अंतिम निर्णय व्हावा यासाठी काय करता येईल या मुद्दयावर चर्चा झाली," असं ले ड्रायन म्हणाले.
5. मुंबईत पोलीस आणि ड्रग्स माफियांमध्ये चकमक
मुंबईतील भायखळ्यामध्ये पोलीस आणि नायजेरियन ड्रग्ज माफियांमध्ये मोठी चकमक उडाल्याची बातमी नेटवर्क18 लोकमतने दिली आहे. नायजेरियन माफियांचा पाठलाग करत असताना या माफियांनी पोलिसांवर गोळीबार केला.
भायखळ्यात नायजेरियन ड्रग्स माफिया हे ड्रग्स विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी झोन क्रमांक 3मध्ये दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाच ते सात नायजेरियन तरुणाची टोळीला पाहिलं. जेव्हा पोलिसांनी या टोळक्याची तपासणी सुरू केली असता. त्यांनी पळ काढला आणि पोलिसांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. पोलिसांनीही प्रतिउत्तर दाखल नायजेरियन टोळीवर गोळीबार करून जेरबंद केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)