You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका चोप्रा-जोनास: मुली लग्नानंतर दोन आडनावं का लावतात?
- Author, श्रीकांत बंगाळे आणि अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अभिनेत्री प्रियंका चोप्रानं लग्नानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचं नाव बदलून प्रियंका चोप्रा जोनास असं केलं आहे. यापूर्वी सोनम कपूरनेही लग्नानंतर सोनम कपूर-आहुजा असं स्वतःचं नाव बदललं होतं.
सहसा मुली लग्नानंतर त्यांच्या नावापुढे सासरचं आडनाव लावतात. पण काही मुली याला अपवाद आहेत. त्या एक तर त्यांचं मूळ नाव कायम ठेवतात किंवा काही जणी दोन आडनावं लावताना दिसतात. यामागची कारणं जाणण्याचा हा प्रयत्न.
मी माझ्या नावावर खूप प्रेम करते - वसुंधरा काशीकर
वसुंधरा काशीकर यांनी लग्नानंतर मूळ नाव कायम ठेवलं. त्या सांगतात -
मला माझं नाव खूप आवडतं आणि मी माझ्या नावावर खूप प्रेम करते. त्यामुळे लग्नानंतर मला नाव बदलायचंच नव्हतं. जन्मापासून माझं जे नाव आहे त्या नावाची एक छोटीशी का होईना, ओळख मी कष्ट करून निर्माण केली आहे. मग अचानक कुणी आयुष्यात आलं म्हणून आपलं नाव बदलायचं, हा विचार मला अतार्किक वाटतो आणि मी माझं नाव कायम ठेवलं.
मी स्वत: एका वाहिनीसाठी निवेदन करायचे. तेव्हा मी माझं नाव वसुंधरा काशीकर असंच सांगायची. सामाजिक दबावामुळे मी काही काळ दोन आडनावं लावलीत पण नंतर हा दबाव झुगारून मी परत मूळ नाव लावायला सुरुवात केली.
माझ्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला 'वसुंधरा काशीकर' असंच नाव दिसेल तसंच सर्व कागदपत्रांवरही असंच नाव आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जणी दोन आडनावं लावताना दिसून येतात.
काही जणींना दोन आडनाव लावणं रोमँटिकही वाटू शकतं. पण यामागे मुख्यत्वे सामाजिक दबाव कारणीभूत असतो.
हा दबाव मुलगा आणि मुलगी दोन्हींच्या बाजूनं असतो. मुलीनं नवऱ्याचं आडनाव लावलं नाही तर सासू-सासरे किंवा नातेवाईक कुरबूर करतात. दुसरीकडे लोक मुलांना विचारतात की तुझ्या बायकोनं अजून नाव नाही बदललं. यामुळे मग बहुतेक जण दबावापोटी नाव बदलतात.
जुनी ओळख पुसायची नाही, नव्याला नाकारायचं नाही - अश्विनी धायगुडे-कोळेकर
अश्विनी धायगुडेचं 8 वर्षांपूर्वी लग्न झालं. लग्नानंतर तिनं माहेर आणि सासरकडचं अशी दोन्ही आडनावं लावायचं ठरवलं. सध्या ती अश्विनी धायगुडे-कोळेकर असं नाव लावते.
दोन्ही आडनावं लावणं का पसंत केलं, यावर ती सांगते -
करिअरबद्दल महत्त्वाकांक्षी असलेल्या मुली साधारणत: वयाच्या पंचवीशीनंतर लग्न करतात. म्हणजे 25 वर्षं आपण एक नाव घेऊन वावरतो, स्वत:ची एक स्वतंत्र ओळख बनवतो, लोक आपल्याला त्या नावानं ओळखू लागतात. त्यानंतर आयुष्यात लग्न नावाचा एक सोपस्कार होतो आणि मग आपण आपली मूळ ओळख, आपलं नाव बदलून टाकतो.
पण मला माझी मूळ ओळखही बदलायची नव्हती आणि नवीन ओळखही नाकारायची नव्हती. म्हणून मग मी लग्नापासून अश्विनी धायगुडे-कोळेकर असं नाव ठेवणं पसंत केलं.
याचा उलट मला फायदाच होतो. सध्या मी लिखाण करते. मला माझी मित्र मंडळी अश्विनी धायगुडे या नावानं ओळखतात. माझं लिखाण त्यांच्यापर्यंत अश्विनी कोळेकर या नावानं पोहोचल्यास ते विचारतील की कोण ही अश्विनी? पण जर हेच लिखाण अश्विनी धायगुडे-कोळेकर या नावानं त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर त्यांना माझ्याबद्दल निदान क्लिक तरी होतं.
नाव बदलणं हा संस्कारांचा भाग - प्रीती तुषार पवार
पुण्यात राहणाऱ्या प्रीतीनेतीन वर्षांपूर्वी लग्नानंतर स्वतःचं मूळ नाव बदललं. त्याबद्दल ती सांगते -
लग्नापूर्वी माझं नाव प्रीती अश्विन जानी असं होतं. पण लग्नानंतर मी त्याच्यात बदल करून सोशल मीडिया साईट्सवर प्रीती तुषार पवार असं नाव वापरू लागले.
खरंतर मी लहानपणापासून ऐकत आले आहे की लग्नानंतर तुमचा होणारा नवरा हा तुमचं सर्वस्व असतो. हा आपल्या संस्कारांचा भाग आहे. यामुळे मग मी नवऱ्याचं नाव माझ्या नावासमोर लावणं पसंत केलं.
असं असलं तरी सरकारी कागदपत्रांवर मात्र मी माझं मूळ नाव वापरते. पण मला असं वाटतं की, पवार वापरा की जानी, नाव काहीही वापरलं तरी त्यानं काही फार मोठा फरक पडत नाही.
नाव न बदलणाऱ्या सामान्य महिलांच्या आयुष्यात काय घडतं?
सेलिब्रिटींचं ठीक, पण नाव न बदलणाऱ्या सर्वसामान्य महिलांच्या आयुष्यात काय घडतं? भारतासारख्या देशात जिथे अजूनही बऱ्यापैकी पुरुषी मानसिकता अस्तित्वात आहे, तिथे आपलं आधीच आडनाव कायम ठेवणाऱ्या स्त्रीला काही त्रास सहन करावा लागतो का, हाच प्रश्न काही दिवसांपूर्वी आम्ही बीबीसी मराठीच्या महिला वाचकांना विचारला होता.
अनेकींनी प्रतिक्रिया दिल्यात. बऱ्याच जणींचा सूर 'शासकीय व्यवस्था अजून मागासलेलीच आहे' असा होता. तर नाव न बदलणाऱ्या काही जणींना 'नवऱ्याचं नावं लावण्यात कसली आलीये लाज?' असले अनाहूत सल्लेही मिळालेत.
संध्या पानसेकरांना असाच अनुभव आला. त्या म्हणतात, "नाव न बदलणाऱ्या स्त्रीची सगळीकडे या ना त्या प्रकारे अडवणूक होतो. त्याला तोंड देताना खूप हिंमत आणि संयम लागतो."
सुषमा देशपांडेंनी सविस्तर अनुभव शेअर केला. त्या म्हणतात, "आजही न विचारता मनात येईल ते करण्याची पुरुषी मानसिकता व्यवस्थेत आहे. व्यक्तिशः मी याचा पूरेपूर अनुभनव घेतलेला आहे. एकदा माझा नवरा पासपोर्ट काढण्यासाठी पेपर घेऊन कार्यालयात गेला. तिथल्या कर्मचारी महिलेने नवरा-बायकोची वेगळी नावे पाहून पेपर सरकारी पद्धतीने फेकले.
"माझ्या वडिलांचा एक प्लॉट मी विकत घेतला. त्यावेळेस मी माझं नाव देशपांडे-कणेकर करणार नाही, असं ठामपणे माझ्या वकिलाला सांगितलं. म्हणून वकिलाने माझं नाव सुषमा देशपांडे असं लिहून कंसात विश्वास कणेकरांची पत्नी, असं लिहिलं."
"सरकारी कारकुनाने परस्पर माझं नाव सुषमा कणेकर लावून दिलं. त्यामुळे सुषमा देशपांडे आणि सुषमा कणेकर अशा दोन व्यक्ती आहेत, असा काहीसा सरकारी तिढा निर्माण झाला. त्या वेळेस मला बराच त्रास झाला.
अर्थात सगळ्यांनाच हा त्रास सहन करावा लागत नाही.
मानसी होळेहोन्नूर म्हणतात की त्यांनी नाव बदललं नाही पण त्यांना आजवर पासपोर्ट, व्हीसा कोणत्याही गोष्टीसाठी त्रास झालेला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)