सोशल : 'मी लग्नानंतर नाव बदललं नाही आणि बदलणारही नाही'

अभिनेत्री सोनम कपूरनं लग्नानंतर सोशल मीडियावर आपलं नाव बदलून सोनम कपूर- आहुजा असं लिहिलं. त्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं.

सोनम कपूरच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर स्त्रीनं लग्नानंतर नाव बदलावं की नाही यावरच्या चर्चेला उधाण आलं आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, लग्नानंतर बायकोने नवऱ्याचं नाव/आडनाव लावाव का?

वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. गंमत म्हणजे अनेक पुरूषांना हा विषय महत्त्वाचा वाटला नाही, पण महिलांनी मात्र भरभरून प्रतिक्रिया दिल्या.

शर्वरी उबाळे म्हणतात की, "बायकोनं नाव बदलू नये. लहानपणापासूनची ओळख एकदम का बदलावी? मी बदललं नाही आणि बदलणारही नाही."

सविता राणेंना मात्र हा वैयक्तिक प्रश्न वाटतो. "तिनं स्वतःची जुनी ओळख पुसली नाही आणि नवी ओळखही स्वीकारली. मुख्य म्हणजे स्त्रीनं किंवा पुरूषानं स्वतःला सिद्ध करणं जास्त गरजेचं असतं, आडनावनं काही होतं नाही."

सुवर्णा दामलेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्या लिहितात, "नाव बदललं म्हणून एखादी मुलगी पूर्णपणे सासरची झाली किंवा नाव बदललं नाही म्हणून ती 'अजून आपली झाली नाही' हे दोन्ही थोडं गंमतशीर, अतार्किक आणि गंभीरपणे विचार करावा असंच आहे. जेव्हा मुलींना ओळखच नव्हती तेव्हा हे योग्य वाटत असावं. आता मुलींची ओळख फक्त आडनावावर आहे का? विचार करायला हवा ना?"

वन लास्ट राईड या अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे की, "हा मुद्दा काही लोकांसाठी इतका महत्त्वाचा नाही."

संजय गदडे यांनीही ट्वीट केलं आहे की, "हा वाद निरर्थक आहे. नावात काय आहे असं शेक्सपिअरनं देखील म्हटलं होतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)