भाजपचे संविधान बदलण्याचे षड्यंत्र - शरद पवार #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. संविधान बदलण्याचे भाजपचे षड्यंत्र हाणून पाडा- शरद पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेऊन सर्वोच्चपदी विराजमान होणारे नेते आता संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. भाजपचे लोकसभेतील सदस्य आणि मंत्री घेतलेल्या शपथेशी प्रतारणा करीत आहेत. संविधान बदलण्याचं भाजपाचं हे षड्यंत्र सर्वांनी मिळून हाणून पाडणं गरजेचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

कोकण विभागातल्या राष्ट्रवादीच्या संविधान बचाव अभियानादरम्यान रायगड जिल्ह्यातल्या रोह्यात पवार बोलत होते.

ते पुढे म्हणाले, "महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेच्या न्यायाचा हुंकार दिला होता. त्याच पवित्र भूमीत संविधान वाचवण्याचे अभियान राबवण्याची वेळ भाजपा सरकारमुळे आली आहे."

"देशाची सूत्रे ज्यांच्या हातामध्ये आहेत, त्यांचा संविधानावर विश्वास नाही, तेच आता घटना बदलण्याची भाषा करीत आहेत. हे देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोकादायक आहे आणि देशातल्या महिलाशक्तीने एकजुटीनं भाजपाचे मनसुबे उधळून लावायला हवेत," असंही पवार यांनी म्हटलं आहे.

2. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार

मराठा समाजाला राज्य सरकारनं 16 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर त्याला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात सादर झालेल्या पहिल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. मात्र आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टानं नाकारली आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे.

जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी झाली. या याचिकेवर मुख्य याचिकांसह येत्या 10 डिसेंबरला सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं ठरवलं आहे.

बुधवारी सकाळी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे याचिकाकर्त्यां जयश्री पाटील यांनी ही याचिका सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑन रेकॉर्ड वकील असताना याचिकाकर्ते स्वत: अशा प्रकारे याचिका मांडू शकत नाहीत, असं स्पष्ट करत हायकोर्टानं याचिका ऐकण्यास नकार दिला. दुपारी पुन्हा वकिलांसह हजर राहण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. त्यानुसार दुपारी या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

3. सोलापुरातील 41 शाळांचा गोवर आणि रुबेला लस घेण्यास नकार

सोलापुरातील 41 शाळांनी गोवर आणि रुबेला लस घेण्यास नकार दिला आहे. लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याच्या गैरसमजातून शाळांनी लस घेण्यास नकार दिला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

यातील बहुसंख्य शाळा मुस्लीम बहुल भागातील आहेत. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं तरच लस देऊ, असा या शाळा व्यवस्थापनाचा आग्रह आहे.

महापालिका आयुक्तांनी या शाळा व्यवस्थापनाचं मन वळवण्यासाठी बैठक बोलावली आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

4. कर्ज फेडण्यास तयार, पण व्याज देणार नाही - विजय माल्ल्या

मी संपूर्ण कर्ज फेडायला तयार आहे, पण व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही, अशा आशयाचं ट्वीट विजय माल्ल्या यांनी केलं आहे. एनडीटीव्ही इंडियानं ही बातमी दिली आहे.

100 टक्के कर्ज फेडायला तयार आहे. मात्र कर्जाची मुद्दलच परतफेड करु शकतो, व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही, असं माल्ल्या यांनी म्हटलं आहे. माल्ल्या यांनी एका पाठोपाठ चार ट्वीट करून भारतीय बँकांसमोर कर्जफेडीचा नवा प्रस्ताव सादर केला आहे.

विजय माल्ल्या यांच्यावर 9,000 कोटींचं कर्ज आहे.

5. फोर्ब्सच्या श्रीमंत सेलिब्रिटिंच्या यादीत सलमान अव्वल

फोर्ब्सनं 100 भारतीय श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेता सलमान खान सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

ही यादी जाहीर करण्यासाठी फोर्ब्सनं 1 ऑक्टोबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान अभिनेत्यांनी केलेल्या कमाईच्या आकड्याची दखल घेतली आहे.

2018मध्ये सलमान खाननं तब्बल 253.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या यादीत दीपिका पादुकोन चौथ्या, महेंद्रसिंह धोनी पाचव्या, आमीर खान सहाव्या, अमिताभ बच्चन सातव्या तर रणवीर सिंग आठव्या क्रमाकांवर आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)