देशातल्या सगळ्यांत मोठ्या माओवादी संघटनेचे नवे नेते कोण?

फोटो स्रोत, CGP
- Author, आलोक प्रकाश पुतूल
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रायपूरहून
नंबाल्ला केशव राव उर्फ बसवराजू हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे महासचिव असतील. ही भारतातली सगळ्यात मोठी माओवादी संघटना आहे.
माओवादाच्या अभ्यासकांच्या मते बसवराजू यांना महासचिव केल्यावर देशभरात माओवादी हल्ल्यांमध्ये वाढ होऊ शकते.
गेल्या 25 वर्षांपासून या पदावर कार्यरत असणाऱ्या मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी आपल्या जागी बसवराजू यांना महासचिव बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
बसवराजू महासचिव होतील अशी चर्चा गेले वर्षभर सुरू होती.
आता सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय कमिटीचे प्रवक्ते अभय यांनी एक निवेदन जारी करत या घडामोडींना दुजोरा दिला आहे. असं केल्यामुळे केंद्रीय कमिटी आणखी सशक्त होईल असा त्यांचा दावा आहे.
आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या जियन्नापेटा गावातील रहिवासी असलेल्या बसवराज यांची महासचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय कमिटीच्या पाचव्या बैठकीत घेण्यात आला.
बसवराजू गेल्या 27 वर्षांपासून केंद्रीय कमिटीचे सदस्य आहेत.
माओवादी प्रवक्त्यांच्या मते गेली 18 वर्षं पॉलिट ब्युरोचे सदस्य म्हणून सक्रिय असलेल्या बसवराज यांनी संघटनेच्या केंद्रीय सैन्य आयोगाचे प्रभारी म्हणूनही काम केलं आहे.
त्यांनी वारंगलमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून 1980 साली झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या वादात त्यांना अटक करण्यात आली होती.
तेव्हापासून ते भूमिगत आहेत आणि 63 वर्षांच्या बसवराज यांचा कोणताच फोटो सध्या उपलब्ध नाही. त्यांच्यावर विविध राज्यांच्या आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांनी एकूण 1.57 कोटींचं बक्षिस ठेवलं आहे.
माओवाद्यांच्या सैन्याचे प्रमुख
छत्तीसगढच्या नक्षलवादी प्रकरणांचे महानिरीक्षक सुंदरराज म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून माओवाद्यांच्या संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता."
सुंदरराज यांच्या मते बसवराजू यांची महासचिवपदी निवड करून दिवसेंदिवस क्षीण होत असलेली माओवादी संघटना आपली लढाई मजबूत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे.

फोटो स्रोत, NIA
सुरक्षा दलांना छत्तीसगढमध्ये एका मागोमाग एक जे यश मिळत आहे त्यामुळे माओवादी घाबरले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या बदलांमुळे काही फरक पडत नाही असंही ते म्हणाले.
दुसऱ्या बाजूला माओवादी तज्ज्ञ पी वी रमना म्हणतात, "बसवराजू हे गणपती यांच्यापेक्षा वयाने लहान असले तरी गणपती जास्त तत्त्वनिष्ठ आहेत."
रमना यांच्यामते माओवादी सैन्याची जबाबदारी सांभाळल्यामुळे आक्रमक हल्ल्यांसाठी विशेषतः रणनीती तयार करण्यासाठी बसवराज ओळखले जातात.
बसवराज यांच्या नेतृत्वाखाली माओवादी हल्ल्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असं रमना यांना वाटतं.
गणपती कोण आहेत?
माओवाद्यांच्या कागदपत्रांचा आधारे लक्षात येतं की, जून 1992 मध्ये मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट-लेनिनिस्ट) पीपल्स वॉर या पक्षाच्या महासचिवपदी निवड झाली होती.
त्यानंतर 1995 मध्ये पक्षाच्या अखिल भारतीय विशेष अधिवेशनात गणपती यांची या पदावर फेरनिवड झाली.

फोटो स्रोत, CGP
इतकंच नाही तर 21 डिसेंबर 2004 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट-लेनिनिस्ट) पीपल्स वॉर आणि कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया यांच्या विलीनीकरणानंतर तयार झालेल्या सीपीआय (माओवादी) या नवीन पक्षातही त्यांचे महासचिवपद कायम ठेवण्यात आलं.
माओवादी प्रवक्त्यांच्या मते 2013 मध्ये सीपीआय (माओवादी) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया नक्षलवादी यांच्या विलीनीकरणाबरोबरच माओवादी संघटनांच्या विलीनीकरणाची प्रकिया पूर्ण झाली. 1992 ते 2017 पर्यंत गणपती हे महासचिवपदी होते तेव्हा त्यांनी संघटनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला.
71 वर्षांच्या गणपतींवर वेगवेगळ्या प्रकरणांत 2.52 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. मात्र माओवाद्यांच्या एका संमेलनात काढलेल्या एका फोटोशिवाय गणपती यांच्याविरुद्ध पोलिसांकडे कोणतेच पुरावे नाहीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








