...अन्यथा नक्षलवाद्यांचं नेतृत्व मला करावं लागेल : उदयनराजे - #पाचमोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Swati Patil Rajgolkar/BBC
पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्या.
1. ...अन्यथा नक्षलवाद्यांचं नेतृत्व मला करावं लागेल - उदयनराजे
सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष द्यावं, नाहीतर नक्षलवादी तयार होतील असं वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी केलं आहे,
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त यादीत नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात उदयनराजेही सहभागी झाले होते.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, या मोर्चादरम्यान बोलताना उदयनराजे यांनी सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास नक्षलवादी तयार होतील असं म्हटलं. आणि जर असं नक्षलवादी तयार झाले तर मलाच नाईलाजाने या नक्षलवाद्यांचं नेतृत्व करावं लागेल असंही ते पुढे म्हणाले.
2. शबरीमला आंदोलनावर हिंसक आंदोलन करण्याचं नियोजन भाजपाचंच
शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून हिंसक आंदोलन करण्याचं नियोजन हे जवळपास पक्षानेच केलेलं होतं, असा धक्कादायक खुलासा भाजपाच्या केरळ प्रदेश अध्यक्षांनी केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शबरीमला मंदिरांचे दरवाजे बंद करण्याविषयी मंदिर प्रमुखांनी माझ्याशी चर्चा केली होती असा खुलासाही श्रीधरन पिल्लई यांनी केल्याचं द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या बैठकीत झालेल्या या संवादांची टेप समोर आली आहे.
मंदिर प्रमुखांना मी महिला आल्यास नेमकं काय करायचं याच मार्गदर्शनही केलं. प्रत्येकाने एकप्रकारे भाजपाचाच अजेंडा राबवल्याची आत्मस्तुतीही त्यांनी केली.
या प्रकरणावर विचारलं गेलं असता पिल्लई यांनी सल्ला देण्यात काहीच गैर नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, शबरीमला मंदिर परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या आंदोलनात एक फोटो जर्नालिस्ट जखमी झाला आहे.
मासिकपाळी येऊ शकेल अशा वयाच्या स्त्रीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने पुन्हा हिंसाचाराला तोंड फुटले.
या हिंसाचारादरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींना लक्ष केल्याचं वृत्त NDTV च्या वेबसाईटने दिलं आहे.
3. आणखी एका वाघिणीची हत्या
वाघिणीने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी वाघिणीलाच ट्रॅक्टरखाली चिरडून मारल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गावकऱ्यांनी या वाघिणीला घेरत लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी या वाघिणीला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले असं न्यूज18 लोकमतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लखीमपूर जिल्ह्यातील दुधवा व्याघ्र प्रकल्पातील किशनपूर वनक्षेत्रात ही घटना घडली.
दुधवा येथील उपविभागीय अधिकारी महावीर कौजलगी यांनी सांगितलं की, या भागात एका वाघिणीने चलतुआ गावात देवानंद (वय ५०) नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात देवानंदचा मृत्यू झाला.
4. साखर कारखाना अध्यक्षांची आत्महत्या
भवानीनगर (ता. इंदापूर) इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप केशवराव निंबाळकर (वय ४५) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.
निंबाळकर यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली होती. सोमवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
अचानक गोळीचा आवाज आल्याने घरातील सदस्यांनी जाऊन पाहिलं, त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर तातडीनं त्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
5. INS अरिहंत देशाला समर्पित
देशाची पहिली आण्विक पाणबुडी 'INS अरिहंत'ने सोमवारी आपलं पहिलं गस्त अभियान पूर्ण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी INS अरिहंतला देशाला समर्पित करून तिला धनत्रयोदशीची भेट म्हटलं आहे.
'अरिहंतचा अर्थ आहे शत्रुचा नायनाट करणे. INS अरिहंतदेखील सव्वाशे कोटी भारतीयांच्या सुरक्षेची हमी आहे. अरिहंत ही न्युक्लिअर ब्लॅकमेलिंगचं चोख प्रत्युत्तर आहे,' असं पंतप्रधान म्हणाले.
जमीन, हवा आणि पाणी यांवरून आण्विक मारा करण्याची क्षमता अरिहंतमुळे भारताकडे निर्माण झाली आहे. युद्धनौका नौदलात दाखल करण्याच्यादृष्टीने हे मोठे पाऊल आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








