या मंदिरात मासिक पाळीत असलेल्या स्त्रियांनासुद्धा प्रवेश आहे

शबरीमला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ए. डी. बालासुब्रमण्यम
    • Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी

केरळच्या शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातल्या स्त्रियांना प्रवेश नाकारला जाऊ नये, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि अयप्पा देवस्थानाचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले. मात्र महिलांना प्रवेश देण्याच्या मद्द्यावरून मंदिरातले पुजारी, भाविक तसंच या प्रथेचं समर्थन करणारे लोक हिंसक झाले, त्यांनी महिलांना देवळात जाण्यापासून रोखलं आणि या घटनेचं वार्तांकन करायला गेलेल्या महिला पत्रकारांवरही हल्ला केला.

अयप्पा देवस्थानाची यात्रा वर्षातून काही काळापुरतीच करता येते. त्याच्या आधी 41 दिवस पुरुषांना व्रत करावं लागतं, ज्यात कुठलीही नशा करता येत नाही, लैंगिक संबंध प्रस्थापित करता येत नाही किंवा मासिक पाळी आलेल्या महिलांचा स्पर्शही वर्ज्य असतो. त्यामुळे साहजिकच मासिक पाळी आलेल्या महिलांनाही प्रवेश नाकारला जातो. त्यामुळेच लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेशबंदी नाही.

भारतातल्या जवळजवळ सर्वच मंदिरांमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना एक अघोषित बंदी असते. पण तामिळनाडूमधील आदी परशक्ती हे मंदिर याला अपवाद आहे.

या देवळात मासिक पाळीला अपवित्र मानली जात नाही. मासिक पाळी सर्व स्त्रियांच्या शरीरात घडणारी एक नैसर्गिक आणि वैश्विक प्रक्रिया आहे, असं इथल्या मंदिरात मानलं जातं. या मंदिरात हिंदू धर्मासाठी असलेल्या अनेक प्रथा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे इथे मासिक पाळीत असलेल्या स्त्रियांना अगदी मंदिराच्या गाभ्यातसुद्धा प्रवेश दिला जातो. ही प्रथा गेले अनेक दशकं सुरू आहे.

दक्षिण भारतातल्या सगळ्या मंदिरात पुजारी असतात, मात्र इथल्या मंदिरात एकही पुजारी नाही. "पुरुष आणि स्त्रिया मुक्तपणे इथे येऊ शकतात. अगदी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अभिषेक किंवा पूजा करू शकतात. त्यात जात आणि धर्माचं काहीही बंधन नाही," असं या मंदिराचे जनसंपर्क अधिकारी आणि स्वयंसेवक रविचंद्रन सांगतात.

वाऱ्यामुळे लिंबाचं झाड पडलं आणि...

चेन्नई-वेळुपुरम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मेल मरुवथूर या खेड्यात बंगारू नावाचे एक शिक्षक राहायचे. काही दशकांपूर्वी त्यांनी असा दावा केला की एकदा सोसाट्याचा वारा आला आणि लिंबाचं झाड पडलं. हे झाड पडल्यावर त्या झाडातून दूध स्रवायला सुरुवात झाली.

त्याच ठिकाणी एका स्वयंभू लिंगाची निर्मिती झाल्याचा दावाही त्या शिक्षकाने केला. त्यांनी नंतर स्वत:लाच शक्ती, असं संबोधायला सुरुवात केली आणि आदि परशक्ती मंदिराची प्रतिष्ठापना केली.

आदि परशक्ती आणि लिंगम हे त्यांच्या मते स्वयंभू आहे. त्या दोन्हीची मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापना करण्यात आली आहे. त्या शिक्षकाने पुढे जाऊन भविष्य सांगायलासुद्धा सुरुवात केली.

या धार्मिक चळवळीचा परिणाम असा झाला की आदि परशक्ती साप्ताहिक प्रार्थना समितीची स्थापना तामिळनाडू आणि शेजारच्या राज्यांमध्ये झाली. या समित्यांमध्ये बहुतांशी महिलांचा समावेश आहे.

रविचंद्रन सांगतात, "बंगारू अदिगलर यांना हे स्वयंभू लिंग 1966 साली सापडलं. आता 5,000 प्रार्थना समित्या अस्तित्वात आहेत. त्यातील काही परदेशातसुद्धा आहेत."

शबरीमला

फोटो स्रोत, BBC Sport

या मंदिराशी निगडित असलेल्या ज्या संस्था वाढीस लागल्या त्यांच्याबाबत अनेक वाद आहेत. असं असलं तरी या मंदिरात लिंगभेद नसल्यामुळे स्त्रीवर्ग आनंदात आहे.

मीनाकुमारी कंगराज या थेनकसी या तामिळनाडूच्या दक्षिण भागातील एका गावातील निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्या या मंदिरात गेल्या 30 वर्षांपासून येत आहेत. पहिल्यांदा या मंदिरात प्रवेश करण्याचा त्यांचा अनुभव सांगतात -

"तो अनुभव शब्दातीत होता. जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्यास जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला होता. मासिक पाळी अपवित्र नाही, असं अम्मा (बंगारू अदिगलर यांना भक्त प्रेमाने 'अम्मा' म्हणतात) यांचं ठाम मत होतं. मंदिर हे माहेर आहे, असं समजा असं ते आम्हाला सांगायचे. मलासुद्धा तसंच वाटतं. समानता या विषयावर बरंच बोललं जातं आणि लिहिलं जातं. मात्र भक्तिभावाच्या रूपात का होईना समानता अस्तित्वात आली."

समानतेचं वारं

त्यांच्या मते ही समानता फक्त लिंगाधारित नसून जातआधारितसुद्धा आहे. "या प्रार्थना समितीत आम्ही प्राध्यापिका, मैला गोळा करणाऱ्या स्त्रिया आणि साफसफाई करणाऱ्या स्त्रिया सदस्य आहोत. जेव्हा ते इथे भेट देतात तेव्हा गाभाऱ्यात जाऊन त्या स्वत: पूजा करतात. इथे तुम्हाला तुमची जात विचारली जात नाही. लिंग किंवा जात कोणतीही असली तरी इथे सगळ्यांना शक्ती, असं संबोधलं जातं. इथे मासिक पाळी अजिबात अपवित्र समजली जात नाही," असं त्या पुन्हा सांगतात.

शबरीमला

इरा मुरुगवेल हे आघाडीचे लेखक आहेत. आदिवासी संस्कृतीचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. बीबीसी तामिळशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं, "आदिवासी समाजात पाळी हे प्रजननाचं लक्षण मानलं जातं. म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. कारण स्त्रिया प्रजननक्षम असल्यामुळेच त्यांचा वंश वाढतो आणि टिकतो."

"कुंकू हे मासिक पाळीतील रक्ताचं प्रतीक आहे. बंगारू अदिलगर यांना एखाद्या आदिवासी समाजातूनच ही संकल्पना सुचली असावी. मात्र त्यांनाही सुरुवातीला इशा योग समाजाचे संस्थापक जग्गी वासुदेव यांच्यासारखंच टीकेला सामोरं जावं लागलं असेल," असं त्या सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)