You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजकारण आणि निवडणुकांवर किती परिणाम करतात फेकन्यूज #BeyondFakeNews
- Author, नवीन नेगी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'भारताच्या राष्ट्रध्वजाला जगातला सर्वोत्तम राष्ट्रध्वज म्हणून घोषित केलं आहे.'
तुम्हाला हा व्हॉट्सअॅप मेसेज कोणी ना कोणी जरूर पाठवला असेल. हाच कशाला, भारताचं चलन युनेस्कोनं जगात सर्वोत्तम आहे, असं युनेस्कोचं म्हणणं आहे किंवा तुमचा धर्म धोक्यात आहे आणि त्याला वाचवायची गरज आहे, यातला कुठला ना कुठला मेसेज तुम्हाला जरूर आला असेल.
आणि असा मेसेज आला रे आला की तुम्हीही बहुधा मागचा पुढचा विचार न करता फॉरवर्डचं बटन दाबलं असेल. अशानेच तुम्ही फेक न्यूजच्या जाळ्यात अडकत जाता.
फेकन्यूजच्या समस्येनं सारं जग त्रासलं आहे. म्हणून याच समस्येच्या मुळाशी जायचा प्रयत्न करत बीबीसीनं एक रिसर्च प्रसिद्ध केला आहे. ज्यात समोर आलं की लोक देशभक्तीच्या भावनेपोटी खोटे राष्ट्रवादी मेसेजेस शेअर करत असतात.
हा रिसर्च बीबीसीच्या #BeyondFakeNews प्रोजेक्ट अंतर्गत केला गेला होता. चुकीच्या किंवा खोट्या माहितीविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर उचललेलं हे एक पाऊल आहे.
बीबीसीच्या रिसर्चमध्ये समोर आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या अकाउंटसला फॉलो करतात त्यापैकी जवळपास 56 टक्के अकाउंट व्हेरिफाईड नाही आहेत. या व्हेरिफाईड नसलेल्या अकाउंट्सवरूनच भाजपचा 61 टक्के प्रचार होतो.
या रिसर्चविषयी बोलताना भाजपचे प्रवक्ते गोपाळकृष्ण अग्रवाल म्हणतात, "फेकन्यूज आजच्या काळातलं सगळ्यांत मोठं आव्हान आहे यात तिळमात्र शंका नाही. बरं, आता निवडणुका जवळ आल्यात, त्या पार्श्वभूमीवर हे आव्हान अधिकच कठीण आहे. 2019च्या निवडणुकांसाठी अनेक लोक सोशल मीडियावर आताच सक्रिय झालेत. या लोकांचं कामच फेकन्यूज पसरवणं आहे."
अर्थात अग्रवाल हेही म्हणतात की निवडणुका जवळ आल्या की विरोधी पक्षाचे लोक काहीही बोलायला लागतात, पोस्ट करायला लागतात.
"कधी कोणी गोरक्षेच्या नावाखाली फेकन्यूज पसरवतात तर कधी कोणी दलितांच्या नावावर."
पण ते हेही मान्य करतात की फेक न्यूजचा प्रसार रोखणं फक्त सरकारच्याच नाही तर सगळ्यांच्या हिताचं असलं तरी त्याला अंकुश लावणं कठीण आहे.
भारतात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजलेत. त्याबरोबरच काही महिन्यातच देशाची जनता आपलं नवं सरकारही निवडेल.
अशात फेक न्यूजचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे. याला आळा घालण्यासाठी राजकीय पक्ष काय योजना राबवत आहेत?
काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणतात, "फेक न्यूजमुळे दंगलसदृश्य परिस्थिती ओढावते. फेक न्यूजवर विश्वास ठेवून दुकानं बंद केली जातात, व्यवसाय बरबाद केले जातात. फेक न्यूज येत्या काळातलं मोठं आव्हान असणार आहे. आपल्या देशाला आणि समाजाला या आव्हानाचा सामना कसा करायचा यावर गंभीरपणे विचार करायची गरज आहे.
"आताशा खूप सारे अकाउंट्स आणि वेबसाईटस आल्या आहेत ज्या फेकन्यूज खोडून काढतात आणि व्हायरल झालेल्या घटनेमागचं सत्य समोर आणतात. अनेक वृत्तपत्रंही फेकन्यूज कोणत्या आहेत ते सांगतात. तरीही चुकीची माहिती आणि फेकन्यूजचा प्रसार होतच राहातो. या फेकन्यूजमुळे आमच्यासारख्या लोकांना धमक्या येतात.
"फेकन्यूज मागचं सत्य उघड होण्याचा वेग आणि फेकन्यूजच्या प्रसाराचा वेग यात खूप फरक आहे. हा फरक लवकरात लवकर कमी व्हायला हवा.
फेकन्यूजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी बीबीसीनं सोमवारी देशातल्या पुणे, नवी दिल्ली, लखनौ, हैदराबाद, अमृतसर, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले होते.
या कार्यक्रमांमध्ये राजकारण, पत्रकारिता आणि सिनेमासृष्टीतल्या अनेक नामांकित लोकांनी सहभाग घेतला. फेकन्यूज एक गंभीर समस्या आहे असं मत सगळ्यांच पाहुण्यांनी व्यक्त केलं.
आयआयटी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाल्या, "आजच्या जमान्यात आपल्या देशात अशी परिस्थिती आहे की मोठ्यामोठ्या वृत्तसंस्थांनीही फेक न्यूज दिलेल्या आहेत. मग अशा परिस्थितीत काय म्हणाल तुम्ही?
"आज परिस्थिती अशी आहे की कोणावर विश्वासच ठेवता येत नाही. एकतर माणूस काम करेल, नोकरी करेल, पैसे कमवेल किंवा दिवसभर गुगलवर प्रत्येक फेकन्यूज मागचं सत्य शोधत बसेल. अवघड आहे! म्हणूनच मी शक्य तेवढं फेकन्यूजपासून वाचण्याचा प्रयत्न करते आणि झालीच चूक तर माफी मागून मोकळी होते.
अशाच प्रकारचा कार्यक्रम चेन्नईमध्ये आयोजित केला होता. त्यात सहभागी झालेले अभिनेते प्रकाश राज म्हणाले की, या फेकन्यूज इतक्या व्यवस्थित पसरवल्या जातात की लोकांना त्याविषयी जराही शंका येत नाही.
बीबीसीचे महासंचालक टोनी हॉल यांनी या मोहिमेचं कौतूक केलं आहे. तसंच येत्या लोकसभा निवडणुकांच्या काळात बीबीसी रिअॅलिटी चेक करेल हेही त्यांनी सांगितलं.
फेक न्यूजपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जागरूक राहणं. आता पुढे कधीही तुम्हाला कोणता मेसेज आला की त्याची पडताळणी करायला विसरू नका.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)