सत्तेत आल्यावर सरकारी इमारत परिसरातील संघाच्या शाखांवर बंदी घालू : काँग्रेस #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात :-

1) सत्तेत आल्यावर संघाच्या शाखांवर बंदी घालू : काँग्रेस

मध्यप्रेदशात काँग्रेसची सत्ता आली तर सरकारी इमारती आणि परिसरात लागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखांवर बंदी घालू, असं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलं असल्याची बातमी सकाळमध्ये देण्यात आली आहे.

जाहीरनाम्यातील काँग्रेसच्या या आश्वासनानंतर भाजपनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं या जाहीरनाम्यामध्ये RSSच्या शाखांवर बंदी घालण्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याबाबतचा आदेशही रद्द करण्यात येईल, असं म्हटलं आहे.

दरम्यान, "सध्या काँग्रेसचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे 'मंदिर बनू देणार नाही आणि शाखा चालू देणार नाही'', अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2) पुण्याला जिजापूर नाव द्या : संभाजी ब्रिगेड

पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले असल्यामुळे या शहराला जिजापूर असं नावं द्यावं असा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी आग्रह धरला आहे. अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

फैजाबादचं अयोध्या झालं, अलाहबादचं प्रयागराज झालं त्याच धर्तीवर पुण्याचं नावही जिजापूर करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्य सरकारला करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने नामांतराच्या मागणीचं निवेदन पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली.

3) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात 'गज' या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. येत्या काही दिवसांत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असून यामुळे तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ABPमाझाने ही बातमी दिली आहे.

2 महिन्यांपूर्वी आलेल्या तितली वादळापेक्षा या चक्रीवादळाची तीव्रता जास्त आहे. ताशी 90 ते 110 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. येत्या काही तासांत ते उत्तर तामिळनाडूच्या कुंडलोर आणि श्रीहरिकोटाच्या किनारी भागाला धडक देईल, असं सांगितलं जात आहे.

4) छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १८ जागांसाठी सोमवारी मतदान झालं. त्यात एकूण 70.08 टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

विधानसभेच्या 18 जागांसाठी एकूण 4,336 मतदान केंद्रांवर हे मतदान झालं. सुमारे 31 लाख 80 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 16 लाख मतदार महिला आहेत. पहिल्या टप्प्यात 8 नक्षलग्रस्त जिल्हे होते. कोंडागाव, केशकाल, कांकेर, बस्तर, दंतेवाडा, खैरागड, डोंगरगड आणि खुज्जी येथे मोठ्या संख्येनं मतदान झालं.

5) भाजप सरकार हे 'राष्ट्रीय आपत्ती' आहे - शरद पवार

वर्तमान सत्ताधारी हे राष्ट्रीय आपत्ती असल्याचं समजून सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सोमवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. अशी बातमी आपलं महानगर या वेबसाईटनं दिली आहे.

आज शेती अर्थव्यवस्था अडचणीत आहे. आत्महत्या होत आहेत, शेती उत्पादन घटलेलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना याबद्दल आस्था नसून केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत हे सरकार म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)