'नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था घसरली' -रघुराम राजन - #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात :-
1) 'नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची घसरगुंडी'- रघुराम राजन
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गेल्यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था घसरली आहे. देशाच्या वाढत्या गरजेपुढे सध्याचा 7 टक्के विकासदरही कमी असल्याचे मत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये ते बोलत होते. अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.
नोटाबंदी आणि 'जीएसटी'च्या अंमलबजावणीतील त्रुटींचा मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. जीएसटी आणि नोटाबंदी लागू होण्यापूर्वी चार वर्षांपर्यंत (2012-2016) भारताच्या विकासदरामध्ये वेगाने वाढ होत होती, असेही रघुराम राजन म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख चढता असला तरीही देशातील रोजगाराच्या संधी वाढत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
2) सांगलीच्या हळदीला मिळाला जीआय टॅग
भारत सरकारच्या 'Geographical Indications Registry' या कार्यालयाने 7 नोव्हेंबर रोजी सांगली हळदीला 'जीआय' टॅग जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील हळदीची बाजारपेठ वाढण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी सांगलीच्या हळदीला मिळाली आहे, असं अॅग्रोवनच्या बातमीत म्हटलं आहे.
सांगली जिल्हा हा द्राक्षे, ऊस व भाजीपाला या पिकांबरोबरच हळदीसाठीही प्रसिद्ध आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील शिवराज्य हळद उत्पादक शेतीकरी स्वयंसाहायता गटातील शेतकऱ्यांनी हळदीला 'जीआय' मिळावे, यासाठी सन 2013पासूनच प्रयत्न सुरू केले होते. 'जीआय' विषयातील पुणे येथील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे म्हणाले, की आम्ही सांगलीची हळद या नावाने जीआय मिळावा यासाठी भारत सरकारच्या 'भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री' कार्यालयाकडे ऑगस्ट-2014मध्ये अर्ज दाखल केला होता.
3) नेरुळ ते खारकोपर पहिली लोकल
मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण रेल्वे मार्गातील पहिला टप्पा असलेल्या नेरुळ ते खारकोपर दरम्यान आज, रविवारी पहिली लोकल धावणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यासोबतच आज दिवसभर मुंबई उपनगरी मार्गावर प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. सहा नवीन पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट, नवीन तिकीट कार्यालये, प्रसाधनगृहे, एटीव्हीएम मशिन, इंडिकेटर अशी रेल्वेची 'सुविधा एक्स्प्रेस'च जणू उपनगरी मार्गावर धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत या सेवा-सुविधा प्रवाशांना खुल्या होणार आहेत.
4) दानवेंच्या दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचाच राडा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 मतदारसंघांचा दौरा करत आहेत. त्यांच्या खान्देशातील दौऱ्यात जळगाव आणि धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची बातमी, ABP माझाने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जळगावात भाजपा रावेर लोकसभा क्षेत्रात कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात कधी घेणार? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी दानवेंना विचारला. यामुळे धुळ्यात भाजपच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला असून सभेतच आमदार अनिल गोटे यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे, असंही या बातमीत नमुद केलं आहे.
5) अवनीला मारले, त्यात मुनगंटीवारांचा काय दोष? : गडकरी
अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. तिने सुमारे तेरा जणांचा बळी घेतला. त्यामुळेच तिला ठार मारावे लागले. मात्र, त्यावरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वनमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन तिला मारले नाही, असं सकाळच्या बातमीत म्हटलं आहे

फोटो स्रोत, TWITTER/@NITIN_GADKARI
"अवनी'ची पांढरकवडा परिसरात प्रचंड दहशत होती. तिने 13 लोकांना फस्त केले. तेरा लोकांचा बळी घेतला तेव्हा कुणालाच कंठ फुटला नाही, त्यांना गरिबांचा कळवळा आला नाही. वाघिणीला मारण्याचे मी समर्थन करीत नाही; मात्र तिला असेच सोडून दिले असते तर आणखी अनेकांचा जीव घेतला असता. वनविभागाने तिला जिवंत पकडण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र ती हाती लागली नाही. वाघिणीला ठार मारण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार वनविभागाने केली," असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








