Women’s World T20 : सांगली, कोल्हापूरच्या कन्यांसह या आहेत भारताच्या शिलेदार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
वूमन्स वर्ल्ड ट्वेन्टी-20 स्पर्धा दर तीन वर्षांनी होते. 2009मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. साधारणत: पुरुषांच्या ट्वेन्टी-20 वर्ल्ड कपच्या बरोबरीने ही स्पर्धा होते. मात्र यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक म्हणजे तीन वेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. यंदाचे यजमान वेस्ट इंडिज गतविजेते आहेत. भारतीय संघही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वामध्ये या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
वुमन वर्ल्ड ट्वेन्टी-20 इतिहास
हरमनप्रीत कौर
वीरेंद्र सेहवागला प्रमाण मानणाऱ्या हरमनप्रीतकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश ट्वेन्टी-20 लीग स्पर्धेत खेळणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आक्रमक बॅटिंग आणि उपयुक्त फिरकी असा अष्टपैलू खेळ करणारी हरमनप्रीत भारतीय संघासाठी निर्णायक आहे. हरमनप्रीतला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. मूळची पंजाबची असणाऱ्या हरमनप्रीतने घरापासून 30 किलोमीटर दूर असणाऱ्या जिआन ज्योती अकादमीत क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली.
मिताली राज

फोटो स्रोत, Getty Images
संघातील सगळ्यात अनुभवी खेळाडू असलेली मिताली भारतीय संघाचा कणा आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. महिला ट्वेन्टी-20 प्रकारात 2000 धावा करणारी मिताली पहिली खेळाडू आहे. भारतीय महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर असं बिरुदावली तिने कर्तृत्वावर मिळवली आहे.
वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत दडपणाचा सामना कसा करावा यादृष्टीने मितालीचा अनुभव युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरू शकतो. कारकिर्दीच्या सेकंड इनिंग्जमध्ये संघाला विश्वविजेता करून देण्याची ताकद मितालीच्या खेळात आहे.
स्मृती मन्धाना
टीम इंडियाची नवी स्टार स्मृतीने यंदाच्या वर्षीच भारतातर्फे ट्वेन्टी-20 प्रकारात वेगवान अर्धशतक झळकावलं होतं. आयसीसीतर्फे निवडण्यात आलेल्या वूमन टीम ऑफ द इअरमध्ये समावेश झालेली स्मृती एकमेव भारतीय खेळाडू होती. इंग्लंडमध्ये झालेल्या किआ सुपर लीग ट्वेन्टी-20 स्पर्धेत सर्वाधिक धावा स्मृतीनेच केल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
फलंदाजीत कुमार संगकाराला आदर्श मानणाऱ्या 22वर्षीय स्मृतीच्या बॅटिंगमध्ये आक्रमकता आणि देखणेपण यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. याच वर्षी बीसीसीआयने स्मृतीला आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम प्रदर्शन करणारी भारतीय खेळाडू या सन्मानाने गौरवलं. पदार्पणानंतर अल्पावधीत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या स्मृतीला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार पटकावणारी स्मृती केवळ दहावी महिला क्रिकेटपटू ठरली.
तान्या भाटिया
प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंह यांच्या तालमीत तयार झालेली तान्या भाटिया भारतीय संघाची विकेटकीपर आहे. इंग्लंडची सारा टेलर आणि अॅलिसा हिली यांचे व्हीडिओ पाहून तान्या अनेक गोष्टी शिकत असते. अंजू जैन यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय संघ दर्जेदार विकेटकीपर आणि उपयुक्त बॅटिंग करू शकेल अशा खेळाडूच्या शोधात होता. म्हणूनच दशकभरात जवळपास दहा विविध विकेटकीपर बॅट्समन खेळाडूंना संधी देण्यात आली. सुषमा वर्माच्या कामगिरीत सातत्य नसल्याने तान्याला संधी देण्यात आली. तान्याने या संधीचं सोनं केलं. मैदानाबाहेर शांत राहणारी तान्या खेळताना मात्र आक्रमक असते. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाने केवळ एकाच विकेटकीपरची निवड केली आहे. यातूनच संघव्यवस्थापनाचा तान्याच्या कौशल्य क्षमतांवरचा विश्वास दिसून येतो.

फोटो स्रोत, Getty Images
एकता बिश्त
कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही एकताने चिकाटीने क्रिकेटची आवड जोपासली. एकताची डावखुरी फिरकी भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एकताचा प्रदीर्घ अनुभव भारतीय संघासाठी कळीचा आहे.
दयालन हेमलता
सहा वर्षांपूर्वी महिलांच्या क्रिकेटची दयालनला कल्पनाही नव्हती. मात्र शिस्तबद्ध महाविद्यालयीन क्रिकेटमुळे दयालनचं आयुष्यच बदललं. दयालनने चेन्नईचं उपनगर असलेल्या अल्वार्थीरुनगर इथल्या एमओपी वैष्णव कॉलेजची दयालन विद्यार्थिनी. मुलीने शिक्षण पूर्ण करावं, जॉबला लागावं अशी दयालनच्या पालकांची इच्छा होती. मात्र दयालनला कॉलेजमध्ये क्रिकेटची गोडी लागली. या आवडीला मेहनतीची जोड मिळाल्याने केवळ सहा वर्षात दयालन वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. ऑफस्पिन बॉलिंग आणि उपयुक्त बॅटिंग करणाऱ्या दयालनची ऊर्जा भारतीय संघासाठी महत्त्वाची असणार आहे.
मानसी जोशी
भारतीय संघात पदार्पणाचं वचन पूर्ण केल्यानंतर फास्ट बॉलर मानसी जोशीने प्रशिक्षकांना कार गिफ्ट दिली होती. डेहराडूनची मानसी वेगवान गोलंदाज आहे. वर्ल्डकप वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. तिथल्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात. मानसीसाठी हे वरदन ठरू शकतं. दोन वर्षांपूर्वी ट्वेन्टी-20 पदार्पण केल्यानंतर प्रशिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून मानसीने त्यांना कार भेट दिली होती. असा शिष्य मिळणं दुर्मीळ असल्याचं प्रशिक्षक वृंदर रौतेला यांनी सांगितलं होतं. दरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे मानसीला यंदाच्या वर्षात क्रिकेटपासून दूर राहावं लागलं आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने दमदार पुनरागमन करण्याची संधी मानसीकडे आहे.
वेदा कृष्णमुर्ती
कराटेतला ब्लॅक बेल्ट कमावणाऱ्या वेदाने तेराव्या वर्षीच कर्नाटकच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवलं होतं. अठराव्या वर्षी वेदाने भारतासाठी पदार्पण करताना अर्धशतकी खेळी केली होती. भारतासाठी फिनिशरच्या भूमिकेत असणाऱ्या वेदाकडे गोलंदाजीचीही जबाबदारी आहे. चांगल्या सुरुवातीनंतर विकेट टाकल्यामुळे वेदावर अनेकदा टीकाही झाली आहे. संघातल्या सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक वेदा उत्तम नाचतेही.
अनुजा पाटील
कुस्ती तसंच फुटबॉलची परंपरा असणाऱ्या कोल्हापूरची अनुजा पाटील संघर्षामय प्रवासाचं प्रतीक आहे. शालेय पातळीवर मुलांच्या मॅचेसमध्ये अनुजाने स्कोअरर म्हणून सुरुवात केली. अरुण पाटील आणि शोभा पाटील या दांपत्याची अनुजा ही लेक. क्रिकेटचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा. पण प्रसंगी पोटाचा चिमटा घेत त्यांनी अनुजाची खेळाची आवड जोपासली.

फोटो स्रोत, Getty Images
कोल्हापूरात अनुजाचा सराव पाहण्यासाठी गर्दी होते. प्रशिक्षकांच्या विश्वासाला पात्र ठरत अनुजाने वाटचाल केली आहे. 2012मध्ये भारतासाठी पदार्पण करणारी अनुजा दर्जेदार फिरकीपटू आहे. जादुई फिरकीच्या बळावर अव्वल फलंदाजांना सातत्याने चकवणाऱ्या अनुजाने गेल्यावर्षी भारतीय अ संघाचं नेतृत्वही केलं होतं.
पूनम यादव
भारतीय पुरुष संघातील चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवप्रमाणे पूनम यादवची फिरकी प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी अडचणीची ठरते. पूनम यादवची गुगली भारतीय संघासाठी कळीची आहे.
अरुंधती रेड्डी

फोटो स्रोत, Getty Images
आईकडून खेळांचा वारसा मिळालेल्या अरुंधतीने 12व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अभ्यासात चांगली असतानाही हैदराबादच्या अरुंधतीने क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला घरच्यांनी पुरेपूर पाठिंबा दिला. नूशीन अल खादीर आणि सविता निराला यांनी अरुंधतीच्या कौशल्यगुणांना हेरलं.
जेमिमा रॉड्रिग्ज
मुंबईकर जेमिमाने 17व्या वर्षी द्विशतकी खेळी साकारत क्रिकेटविश्वात आपल्या आगमनाची दणक्यात नांदी केली होती. मुंबईतल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत जेमिमाने 163 चेंडूत 202 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. तडाखेबंद खेळासाठी प्रसिद्ध जेमिमाने हॉकीपटू म्हणून कारर्कीदीची सुरुवात केली होती. चांगल्या खेळामुळे दोन्ही खेळांच्या संघात तिची निवड होत असे. एकाक्षणी तिने हॉकीऐवजी क्रिकेटची निवड केली. हॉकीचं नुकसान क्रिकेटसाठी फायद्याचं ठरलं.
स्थानिक क्रिकेटमध्ये परिचित नाव झालेल्या जेमिमाने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20मध्येही सातत्यपूर्ण कामगिरीने आपली छाप उमटवली आहे. याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मॅरिझेन कापचा जेमिमाने घेतलेला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कॅचने मॅचचं पारडं फिरलं आणि भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत ट्वेन्टी-20 मालिका जिंकण्याची किमया केली होती. जेमिमा या वर्ल्डकपची स्टार ठरू शकते. खेळाव्यतिरिक्त जेमिमा सुरेख गिटार वाजवते.
दीप्ती शर्मा
आग्रा हे प्रामुख्याने ताजमहालसाठी प्रसिद्ध आहे. मात्र क्रिकेटपटू दीप्तीने आपल्या दमदार खेळासह आग्र्याला नवीन ओळख मिळवून दिली. भाऊ सुमीतच्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर दीप्तीने ही भरारी घेतली आहे. दीप्तीला सरावासाठी सुमीतने आग्र्यात क्रिकेट अकादमी सुरू केली. या अकादमीचा फायदा दीप्तीला झालाच मात्र त्यापेक्षा जास्त परिसरातील गरजू खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ प्राप्त झालं. टी-20 सारख्या वेगवान प्रकारात अष्टपैलू खेळाडू आवश्यक असतात. आक्रमक बॅटिंग आणि ऑफब्रेक बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर दीप्तीने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
पूजा वस्त्राकर
मध्य प्रदेशातल्या शाहडोलच्या पूजाला 'छोटा हार्दिक' म्हटलं जातं. 19व्या वर्षी पूजाची वर्ल्ड कपसाठी निवड होणं तिच्या कौशल्यगुणांची प्रचीती देणारं आहे. झटपट क्रिकेट असं वर्णन होणाऱ्या ट्वेन्टी-20 प्रकारासाठी अगदीच अनुकूल असा पूजाचा खेळ आहे. यंदाच्या वर्षीच तिने बडोदा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचमध्ये नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतकाची नोंद केली होती. झूलन गोस्वामी या अनुभवी खेळाडूची निवृत्ती आणि शिखा पांडेच्या अनुपस्थितीत पूजाची वेगवान गोलंदाजी भारतीय संघासाठी कामाची ठरू शकते.
राधा यादव
गुजरातचं राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करणारी राधा पहिलीच खेळाडू आहे. यावर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या राधाचा जन्म मुंबईचा, याच शहरात तिने व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली. मात्र उत्तम संधीच्या शोधात पंधराव्या वर्षी राधाने बडोद्यातर्फे खेळण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती बेतास बेत असणाऱ्या राधाच्या वडिलांचं मुंबईत एक छोटंसं दुकान आहे. प्रशिक्षक प्रफुल्ल नायक यांनी राधाचं नैपुण्य हेरलं. त्यांनीच तिच्या क्रिकेटचा खर्च उचलला.
प्रशिक्षक रमेश पोवार
भारताच्या महिला संघाची प्रशिक्षणाची धुरा मराठमोळ्या रमेश पोवार यांच्याकडे आहे. महिला संघाचे आधीचे प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश यांच्याकडे सूत्रं सोपवण्यात आली. दोन टेस्ट आणि 31 वनडे मॅचेसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या रमेश यांनी निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून भूमिका स्वीकारली आहे. याआधी मुंबई संघाचे फिरकी प्रशिक्षक असलेल्या रमेश यांचं नाव मुख्य प्रशिक्षक म्हणून चर्चेत होतं. मात्र विनायक सामंत यांची मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. यंदाच्या वर्षीच 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने त्यांच्या युवा फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी रमेश यांना निमंत्रित केलं होतं. भारतासाठी आणि मुंबईसाठी खेळताना फिरकीपटू म्हणून छाप उमटवलेल्या रमेश यांचा प्रदीर्घ अनुभव महिला संघासाठी मोलाचा आहे.
असे होतील सामने
वर्ल्डकपसाठी संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
'अ' गट - इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश
'ब' गट - ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड. पाकिस्तान आणि आयर्लंड
प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
भारतीय संघाच्या मॅचेस
9 नोव्हेंबर - विरुद्ध न्यूझीलंड
11 नोव्हेंबर - विरुद्ध पाकिस्तान
15 नोव्हेंबर - विरुद्ध आयर्लंड
17 नोव्हेंबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारतीय संघाचे प्राथमिक फेरीचे सगळे सामने गयाना नॅशनल स्टेडियम, प्रॉव्हिडन्स येथे होणार आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








