फेक न्यूजच्या विरोधात बीबीसीची मोहीम : खोट्या बातम्यांपल्याडचं खरं विश्व

फोटो स्रोत, Bloomberg
- Author, रुपा झा
- Role, संपादक, भारतीय भाषा, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
आपल्यापर्यंत येत असलेल्या बातम्यांचं विश्लेषण कसं करायचं, त्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांची सत्यता आणि विश्वासार्हता कशी पडताळून पाहायची, याबाबत जे लोक शिक्षित असतात, जाणकार असतात, त्यांच्याकडून 'फेक न्यूज' पसरवली जाण्याची शक्यता कमी असते.
म्हणूनच बीबीसीच्या पत्रकारांची एक टीम ब्रिटन आणि भारतातील अनेक शाळांमध्ये जाऊन मीडिया साक्षरतेवर कार्यशाळा घेते आहे. या 'द रियल न्यूज' नावाच्या कार्यशाळा बीबीसीच्या 'बियाँड फेक न्यूज' #BeyondFakeNews उपक्रमाअंतर्गत घेतल्या जात आहेत. 12 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश आहे जगभरात चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे तसेच यावर व्यवहार्य तोडगा काढणे.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या नव्याने सुरू झालेल्या विविध उपक्रमांपैकी 'माध्यम साक्षरते'वर भर असणारा हा एक उपक्रम आहे. या 'द रियल न्यूज' कार्यशाळा अलीकडच्या काळात ब्रिटनमध्ये यशस्वी ठरलेल्या अनेक उपक्रमांवर आधारित आहेत. मीडिया जागरूकतेसाठीच्या या कार्यशाळांमध्ये फेक न्यूज किंवा अफवा म्हणजे नेमके काय, हे विद्यार्थ्यांना कळावं तसंच लक्षात आल्यावर त्यावर तोडगा काढता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
फेक न्यूजचा प्रसार कसा रोखणार?
भारतीय दूरसंचार नियामक आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशात 1 अब्जापेक्षाही अधिक नागरिकांकडे चालू मोबाईल कनेक्शन आहेत. अल्पावधीतच लाखो भारतीयांनी ऑनलाईन मार्गांचा वापर सुरू केला आहे. तसंच बहुतांश लोकांची मोबाईल फोनद्वारे पहिल्यांदाच इंटरनेटशी ओळख झाली आहे. त्यांना चॅट अॅपच्या माध्यमातूनच बऱ्याच बातम्या कळतात आणि त्या बातम्या ते शेअर करतात, आसपासच्या लोकांना सांगतात.
इंटरनेटशी जोडले जाण्याचा हा उत्तम मार्ग असला तरी कुठलीही खातरजमा न होताच चुकीची बातमीही चटकन पसरण्याचा मोठा धोका याद्वारे निर्माण होतो. अचानक शेकडो बातम्यांचा आणि प्रंचड माहितीचा महापुरात अनेक जण वेढले जातात आणि मग त्यापैकी काय खरे, काय खोटे, यात त्यांची गफलत होऊ शकते. म्हणूनच बातम्या कशा समजून घ्यायच्या तसंच त्यांची पडताळणी कशी करायची, हे मुलांना-तरुणांना शिकवणं अत्यंत महत्त्वाचे आहे, असं बीबीसीला वाटतं.
अशा बातम्या फक्त मुलं आणि तरुण मंडळींपर्यंतच मेसेजेसद्वारे पोहोचतात असे नाही. पण तरीही आम्ही दोन मुख्य कारणांसाठी या कार्यशाळेचे आयोजन या वयोगटासाठी करत आहोत. पहिलं म्हणजे, मुलांच्या या गटाकडे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या आसपासच्या कोणत्याही पिढीतील लोकांवर, स्वतःच्या कुटुंबातील वा मित्रांच्या कुटुंबातील सदस्यांवर प्रभाव टाकण्याची शक्ती असते. दुसरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आजची ही मुलं आणि तरुणाई सोशल मीडिया आणि चॅटॲपच्या जगातच मोठी झाली आहेत, जिथे संवादाचे प्रमुख माध्यम इंटरनेट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हे लक्षात ठेवूनच आमच्या या शाळास्तरीय कार्यशाळांची रचना करण्यात आली आहे, ज्यांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रसारमाध्यमे तसेच डिजिटल साक्षरतेविषयी मूलभूत जागरूकता निर्माण होईल. त्यांना फोनमधून त्यांच्याकडे येणाऱ्या माहितीवर विचार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि अशा खोट्या बातम्यांचा प्रसार रोखला जाईल, मग हा प्रसार त्यांच्या भोवतालच्या लहान विश्वापुरताच मर्यादित का असेना?

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीने या कार्यशाळांचे आयोजन दिल्ली आणि शेजारच्या भागातील शाळांमध्ये यापूर्वीच केले आहे. याबरोबरच आमच्या टीम आता अहमदाबाद, अमृतसर, चेन्नई, पुणे आणि विजयवाडा येथील शाळांमध्ये जाऊनही हा उपक्रम राबवत आहेत. चार तासांच्या या कार्यशाळेत विविध खेळ, व्हिडिओ तसेच सांघिक कृतींद्वारे विद्यार्थ्यांसोबत विचारांची देवाण-घेवाण होते. इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ, तेलुगु, गुजराती, मराठी आणि पंजाबी अशा स्थानिक भाषांमधून या कार्यशाळा पार पडत आहेत.

कार्यशाळेच्या अखेरीस विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त केले जाते की कसे ते आता आपापल्या पातळीवर फेक न्यूजशी लढण्याच्या उपाययोजना करतील. त्या दिशेने काही कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. यामुळे चुकीच्या बातमीवर अंकुश ठेवण्यासाठी ही मुले पोस्टर, भित्तीचित्रे, पथनाट्य, संगीत किंवा एखादे सादरीकरण करून इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवतील. अशा प्रकारच्या उपाययोजना ही मुले 12 नोव्हेंबर रोजी बीबीसी 'बियाँड फेक न्यूज'च्या देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सादर करणार आहेत.
त्यांच्यासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे विद्यार्थी गुगलच्या भारतातील मुख्यालयात 'हॅकेथॉन-अ टेक्नोलॉजीकल ब्रेनस्ट्रॉम' या मोहिमेत सहभागी होणार आहेत. ऑनलाइन पसरणाऱ्या चुकीच्या बातम्यांना आळा घालण्यासाठी काही तांत्रिक तोडगा काढता येईल का, यादृष्टीने ते या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

फोटो स्रोत, PA Wire
कोणतीही खातरजमा, शहानिशा न केलेली चुकीची माहिती जेव्हा पसरते तेव्हा समाजासाठी ही एक गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा इतर माध्यम संस्थांवरचाही लोकांचा विश्वास उडण्याचा धोका संभवतो ज्या खरोखरच तथ्य तपासून आणि पूर्ण संशोधन करून बातमी देतात. म्हणूनच खोट्या बातम्यांच्या समस्येवर लढण्यासाठी जनता, टेकनॉलॉजी कंपन्या तसेच बातम्यांच्या स्रोत असणाऱ्या इतर संस्था, या सगळ्यांशी हात मिळवून बीबीसी काम करत आहे, कारण बीबीसीला वाटते की या समस्येचे उत्तर केवळ एका व्यक्ती, कंपनी किंवा क्षेत्राकडे नाही तर सर्व बाजूंनी एका दिशेने केलेल्या एकत्रित प्रयत्नांमध्येच दडलेले आहे.
अशा अनेक संघटना आणि शैक्षणिक संस्था यांच्याबरोबर संलग्नपणे हा उपक्रम राबवण्याचा आणि पुढे नेण्याचा आमचा मानस आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तरुणाईच्या मीडिया साक्षरतेत भर घालणे, हे पहिले आणि महत्त्वाचे पाऊल आहे. या मोहिमेचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण 'रिअल न्यूज'बद्दल संवाद सुरू करण्याची आता खरी गरज आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








