#पाचमोठ्याबातम्या : नाना पाटेकरांनी अर्ध्या मिनिटात संपवली पत्रकार परिषद

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1. नाना पाटेकरांनी अर्ध्या मिनिटात संपवली पत्रकार परिषद

अभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अभिनेता नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

माझ्या वकिलांनी मला मीडियाशी न बोलण्याचा सल्ला दिला असल्याने मी अधिक बोलणार नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी त्यांची पत्रकार परिषद अर्ध्या मिनिटात संपवली. याबाबतीतलं वृत्त झी 24 तासच्या वेबसाईटनं दिलं आहे.

मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडतं. मी नेहमीच तुमच्याशी संवाद साधतो. मात्र, सध्या माझ्या वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलायला मनाई केली आहे.

अन्यथा मी कधीच यावर प्रतिक्रिया दिली असती, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. मी दहा वर्षांपूर्वी बोललो होतो तेच सत्य आहे, असं सांगत नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

2. तन्मय भट्ट-गुरसिमर खम्बा 'AIB'तून बाहेर

AIB या युट्यूब चॅनलचा सर्वात लोकप्रिय चेहरा असलेल्या तन्मय भट्टनं आता AIBसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यासोबत गुरसिमर खम्बानंही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. याविषयीची बातमी नेटवर्क18-लोकमतच्या वेबसाईटनं दिली आहे.

AIB ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तन्मय या पुढे AIB च्या कामात सहभागी होणार नाही असं म्हटलं आहे.

AIB चा सदस्य उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला. त्यानंतर AIBने हा निर्णय घेतला. उत्सववर एका महिला सहकाऱ्यानं गंभीर आरोप केला होता. याबद्दल तन्मयला माहिती होती. पण यावर AIBने कोणतीही कारवाई केली नाही. तन्मयने याबद्दल माफी मागितली आहे.

3. काश्मीर खोऱ्यात 8.3 टक्के मतदान

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात काश्मीर खोऱ्यात फक्त 8.3 टक्के मतदानाची नोंद झाली. याविषयीची बातमी लोकसत्तानं दिली आहे.

जम्मूमध्ये 70 टक्के तर कारगिलमध्ये सर्वाधिक 78 टक्के मतदानाची नोंद झाला आहे.

फुटीरतावाद्यांनी या निवडणुकांवर बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसह अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. पण त्याचा परिणाम जम्मू आणि लडाख भागात दिसून आला नाही.

4. 'भाजप MP, छत्तीसगड राखणार; राजस्थान गमावणार'

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'टाइम्स नाऊ'ने देशात निवडणूकपूर्व सर्वेक्षण केलं. याविषयीचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

यानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा भाजपचं कमळ फुलेल तर राजस्थानात वसुंधराराजे यांना मात देत काँग्रेस मोठा विजय मिळवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या तिन्ही हिंदी भाषिक राज्यांमध्ये लोकसभेच्या ६५ तर विधानसभेच्या ५२० जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत या तीन राज्यांतील ६५ पैकी ४३ जागा भाजप तर २२ जागा काँग्रेस जिंकेल, अशी शक्यता आहे.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांची जादू कायम असल्याचं हे सर्वेक्षण सांगतं. राज्य विधानसभेच्या २३० जागांपैकी १४२ जागा भाजप जिंकेल, असा अंदाज आहे. भाजपला गेल्यावेळीपेक्षा २३ जागा कमी मिळतील, असं दिसत आहे.

5. शबरीमाला निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका

काही दिवसांपुर्वी सुप्रीम कोर्टानं केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश खुला करून दिला होता. या निर्णयाविरूद्ध फेरविचार याचिका आता सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.

याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

राष्ट्रीय अयप्पा भक्त संघाचे अध्यक्ष शेलजा विजयन यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं की 'सगळ्या वयांच्या महिलांना' या मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय समजण्यापलिकडे आहे.

याआधी या मंदिरांच्या पुजाऱ्यांनी केरळ सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)