#5मोठ्याबातम्या : लोकसभा निवडणुकांमध्ये गैरवापर टाळण्यासाठी फेसबुकने कसली कंबर

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1. निवडणुकांसाठी फेसबुकने कसली कंबर

येत्या लोकसभा निवडणुकांत फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी फेसबूकने एक टास्क फोर्स तयार केला आहे.

"2019च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसोबत काम समन्वय साधण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांची टीम तयार स्थापन केली आहे," अशी माहिती फेसबुक जागतिक धोरणांचे उपाध्यक्ष रिचर्ड अॅलन यांनी दिली.

बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार फेसबुकवर दिसणाऱ्या राजकीय जाहिरातींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यापुढं राजकीय जाहिरातीला पैसे देणऱ्यांचं नाव संबंधित जाहिरातीत दिसणार आहे.

2. तनुश्री दत्ताची पोलिसांकडे तक्रार

बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करणारी एक तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची बातमी NDTV ने दिली आहे.

2008 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झालेल्या या प्रकरणात तिने तक्रार करताना नाना पाटेकर यांच्यासह कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

"तनुश्री यांनी तक्रार नोंदवली असून अद्याप या प्रकरणात FIR नोंदवलेला नाही," अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) मनोज कुमार शर्मा यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली आहे.

नाना पाटेकर यांनी याआधीच हे आरोप फेटाळले असून तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

3. मान्सूनचा राज्याला रामराम

राज्यातून परतीच्या पावसाने निरोप घेतल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केलं. महाराष्ट्र टाइम्सने अशी बातमी दिली आहे. जेमतेम चार महिने राज्यात मुक्काम करत मान्सूनने आता राज्यातून माघार घेतली आहे.

राज्याच्या उर्वरित भागात काही ठिकाणी परतीच्या पावसाने उपस्थिती लावली तरी त्या मानाने मुंबईतून मात्र नैऋत्य मौसमी वारे शांतपणे माघारी फिरले.

गोव्यामधूनही येत्या एक ते दोन दिवसात मान्सून माघार घेईल. महाराष्ट्रातून सर्वसाधारणपणे 1 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परततो, असं या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान, मंत्रोच्चाराने पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे कृषी विद्यापीठात हा प्रयोग घेण्यात येत आहे, असं विधान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी युवा महोत्सवात केलं.

त्यांच्या या वक्तव्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याची बातमी लोकमतने दिली आहे.

4. राज्यात औषधांचा तुतवडा

महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये औषधाचा तीव्र तुटवडा असून रुग्णांनाच बाहेरून औषध खरेदी करावी लागत असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वाद होत आहेत. या परिस्थितीत बदल केव्हा होणार, असा प्रश्न केवळ रुग्णच नव्हे, तर डॉक्टरही उपस्थित करत आहेत असंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.

रायगड, नांदेड, नागपूर, सातारा, सांगली, जळगाव आणि औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये औषधांची तीव्र टंचाई आहे. अन्य जिल्ह्यातही औषधं नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही औषधांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने त्यांचे नातलग आणि डॉक्टरांमध्ये वाद होत आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तर असे प्रकार वारंवार घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

5. तिसऱ्याच दिवशी भारताचा विजय

राजकोट कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर एक डाव राखून 272 धावांनी मात केली. सकाळसह सगळ्याच माध्यमांनी याविषयीची बातमी दिली आहे.

पहिल्या डावात धावडोंगर उभारल्यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 रन्समध्ये गुंडाळला. वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की ओढवली, पण त्यांचा दुसरा डावही 196 रन्समध्ये गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.

तिसऱ्या दिवशी इंडिजच्या 14 विकेट पडल्या होत्या.

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीत पाच बळी मिळविण्याची कामगिरी केली. तर आश्विनने तीन आणि जडेजाने दोन बळी मिळविले. विंडीजकडून किरॉन पॉवेलने सर्वाधिक 83 धावा केल्या.

पुढची कसोटी 12 ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)