You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#5मोठ्याबातम्या : पुण्यात गाड्यांवर होर्डिंग कोसळून चार ठार
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:
1. पुण्यात होर्डिंग कोसळून चार ठार
पुण्यातील जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे रेल्वेने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गंभीररीत्या जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
2. EPF न भरल्याने विविध कंपन्यांविरोधात गुन्हा
कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर हडप करणाऱ्या कंपन्यांवर ठाण्याच्या भविष्य निधी कार्यालयामार्फत फौजदारी कारवाई करण्यात आल्याची बातमी लोकमतने दिली आहे.
कायद्यानुसार प्रत्येक कंपन्यांनी दर महिन्याच्या 15 तारखेच्या आत कामगाराच्या वेतनातून 12 टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या निधीतून संकलित करून ती PF कार्यालयाकडे जमा करणे अभिप्रेत आहे. परंतु काही कंपन्या कामगारांच्या वेतनातून कापलेल्या रकमेचा परस्पर अपहार करतात, अशी बाब समोर आली होती.
त्यांना चाप लावण्यासाठी केंद्रीय स्तरावर यंत्रणा कार्यान्वित असून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांत काही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्री समर्थ कन्स्ट्रक्शन ठाणे, दीपा कॉटन भिवंडी आणि M. V. वाघाडकर अँड सन्स ज्वेलर्स प्रा.लि. डोंबिवली अशा काही कंपन्यांचा त्यात समावेश आहे.
3. महाराष्ट्रात डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त
केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रानेही डिझेलच्या किमतीत कपात केल्यामुळे राज्यात डिझेल 4 रुपये सहा पैशानी स्वस्त होणार असल्याची बातमी ABP माझाने दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम म्हणून इंधनांच्या दरांमागे देशातही सातत्याने वाढ होत होती. या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपये कपात करण्याची घोषणा केली होती.
त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे पेट्रोल पाच तर डिझेल चार रुपयांनी स्वस्त झालं आहे.
4. केरळच्या शबरीमला मंदिरात 600 महिला पोलीस
केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर तिथे केरळ पोलीस 600 महिला सैनिक नियुक्त करणार आहे. महिला भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा बंदोबस्त करण्यात आल्याचं केरळच्या पोलीस महासंचालकांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
या महिन्याच्या अखेरीस मासिक पूजेवेळी या महिला पोलिसांना तिथे पाठवलं जाणार असल्याचं लोकनाथ बेहरा यांनी सांगितल्याचं वृत्त NDTVने दिलं आहे.
यापूर्वी 10 ते 50 वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. सप्टेंबर 28 रोजी न्यायमूर्ती दीपक मिश्रांच्या खंडपीठाने महिलांच्या प्रवेशावरील बंदी उठवली.
5. रोहिंग्यांच्या पाठवणीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब
आसाममध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सात रोहिंग्या घुसखोरांना परत त्यांच्या मायदेशी म्हणजे म्यानमारमध्ये पाठविण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केलं आहे. सकाळने ही बातमी दिली आहे.
या स्थलांतरितांना 2012 मध्ये ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कछार येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. हे स्थलांतरित इथे बेकायदा वास्तव्यास होते, ही बाब त्यांनी आणि त्यांच्या देशानेही मान्य केली आहे.
म्यानमार सरकारवर या लोकांचा छळ आणि वंशद्वेषातून संहार करण्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. त्यातून जीव वाचवून हे रोहिंग्या मुस्लीम बांगलादेश आणि त्यापुढे भारतात आश्रयाला आले आहेत. त्यामुळे त्यांना माघारी पाठवलं जाऊ नये, अशी भूमिका याचिकाकर्ते जफरुल्लाह यांनी घेतली आहे.
आता आम्ही निर्णयामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही, त्यामुळे आम्ही या संदर्भातील याचिका फेटाळून लावत आहोत, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं. या खंडपीठामध्ये न्या. S. K. कौल आणि न्या. K. M. जोसेफ यांचा समावेश होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)