You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एल्फिन्स्टन रोड चेंगराचेंगरी : 'लोक मला तुडवून पुढे जात होते'
- Author, रेश्मा प्रकाश कदम
- Role, एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी पीडित
गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी मुंबईतील एल्फिन्स्टन रोड (आताचे प्रभादेवी) रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा हकनाक बळी गेला आणि 39 जण जखमी झाले. आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याच्या धक्क्यातून मृतांचे नातेवाईक अद्याप सावरलेले नाहीत, तर काही जखमी प्रवासी त्या भीतीदायक आठवणी मनात घेऊनच रोज पुन्हा त्याच वाटेवरून नाईलाजाने घाबरत प्रवास करतात.
वर्षभरानंतरही अपघातग्रस्त रेश्मा प्रकाश कदम पाठीच्या मणक्याच्या दुखण्याने त्रस्त आहेत. 29 वर्षांच्या रेश्मा यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना मांडलेली व्यथा त्यांच्याच शब्दांत.
त्या दिवशी नेमकं काय झालं?
29 सप्टेंबरच्या त्या सकाळी नेहमीप्रमाणे मी दिव्याहून ट्रेनने दादरला आले आणि दादरहून 8.59ची लोकल पकडून परळला उतरले. परळ आणि एल्फिन्स्टन रोड (आताचे प्रभादेवी) स्थानकांना जोडणारा पादचारी पूल हा माझा नेहमीचा रस्ता होता.
दुसऱ्या दिवशी दसरा होता, म्हणून त्या दिवशी सगळे जण सणानिमित्त खूश दिसत होते. एरवी गर्दीने फुललेला हा पूल कामावर जाणारी मंडळी, फुलवाले या लोकांमुळे आणखीच गजबजला होता.
त्या दिवशी जेव्हा मी त्या पुलावर एल्फिन्स्टनच्या दिशेने चालू लागले तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. ज्यांच्याकडे छत्र्या नव्हत्या त्यांनी या पुलाचाच आसरा घेतला, त्यामुळे पुलावरची गर्दी अचानक वाढली.
लोक अक्षरश: एकमेकांना खेटून उभे होते. पुलावरील भार वाढल्यामुळे आणि खालून धडधडत जाणाऱ्या ट्रेनमुळे पुलाला चांगलेच हादरे बसत होते. त्यातच पूल पडल्याची आणि पुलाचा पत्रा कोसळल्याची अफवा कुठूनतरी पसरली आणि बघताबघता लोकांची एकच धावपळ सुरू झाली.
मीसुध्दा पुलावरील त्याच गर्दीत होते. लोकांच्या धक्क्यांमुळे मी पुढे एल्फिन्स्टन रोड स्टेशनकडून बाहेर पडणाऱ्या जिन्यापर्यंत पोहोचले. जो तो आपला जीव वाचवण्यासाठी धावा करत होता. त्याच धावपळीत मी उपडी पडले आणि अर्ध्या ब्रिजवरून थेट पायऱ्यांवरील खालच्या प्लॅटफॉर्मवर आले.
मी सगळ्यांच्या खाली दबले होते आणि लोक मला तुडवून पुढे जात होते. पायाखाली कुणीतरी आहे, याचं देखील त्यांना भान नव्हतं.
माझा जीव गुदमरला होता तरी मी शुद्धीत होते. मी स्वत:च उठून उभी राहिले. काही लोकांनी मला पकडून बाजूला बसवलं. थोडा वेळ तिथेच बसले आणि नंतर स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माझ्या ऑफिसमध्ये गेले.
माझ्या पाठीचा मणका सटकला
माझी पाठ आणि संपूर्ण शरीर दुखत होतं. मग त्रास असह्य होऊ लागल्याने मी स्वत:च नजीकच्या KEM रुग्णालयात गेले. जवळपास दहा दिवस मी तिथे अॅडमिट होते. काही चाचण्यांनंतर माझ्या पाठीचा मणका सरकला आहे, असं कळलं. त्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.
वर्षभरापूर्वी घडलेला हा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर दररोज येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून हा पूल माझा नेहमीचा रस्ता आहे. पण त्या दिवसापासून मला याच रस्त्याची खूप भीती वाटू लागली, कारण त्याच ब्रिजवरून मला आजही रोज ये-जा करावी लागते.
मला चांगल्या ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. पण वेळ आणि पैशाचं गणित जुळत नाहीये. रेल्वेने मदत देऊ केली असली तरी ती अपुरी आहे. आजही मला दिवसभर कमरेला बेल्ट लावून ठेवावा लागतो, नाहीतर उठताना-बसताना खूप त्रास होतो.
डॉक्टरांनी मला योगासन करण्याचा सल्ला दिलाय. पण माझा संपूर्ण दिवस प्रवास आणि कामाच्या ठिकाणी जात असल्यामुळे योगासनं करायला वेळ मिळत नाही.
माझे वडील हयात नाहीत. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय. त्यामुळे आईची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे.
आधीच नवीन पूल बांधला असता तर..
मी जुन्याच पुलावरून रोज ये-जा करते हे माझ्या घरच्यांनाही ठाऊक आहे. पण माझा नाईलाज आहे. आजही मला जुन्याच पूलाचा वापर करावा लागतो, कारण नवीन पुलाची उंची जास्त आहे. मणक्याला दुखापत झाल्यामुळे नवीन पूल चढता-उतरताना खूप त्रास होतो.
गेल्या वर्षभरात एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलून 'प्रभादेवी' झालं. दुर्घटनेनंतर इथं लष्कराच्या मदतीनं तातडीनं नवा पूलही उभा राहिला. पण राहून राहून एकच वाटतं, जर आधीच हा नवीन पूल बांधला असता तर एवढ्या जणांना आपला जीव गमावावा लागला नसता. आणि मलासुध्दा हे पाठीचं दुखणं मिळालं नसतं.
(बीबीसी मराठीसाठीप्रशांत ननावरे यांचं शब्दांकन)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)