You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साईबाबांची चंद्रातील प्रतिमा किती खरी किती खोटी?
पौर्णिमेच्या चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा नुकतीच मुंबईत पसरली होती. साईबाबांची चंद्रात प्रतिमा असलेला फोटो क्षणार्धात व्हॉट्सअॅपवर पसरला. शिवाय खऱ्या भक्तालाच हे साईबाबा दिसतील, असंही त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून, कुणी गच्चीवरून तर कुणी दुर्बिण घेऊन चंद्राला न्याहाळताना दिसले.
दोन-तीन महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातही अशीच व्हॉट्सअॅप अफवा पसरली होती. मात्र व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये फिरत असलेला तो फोटो बनावट असल्याचं सिद्ध झालं होतं. तो फोटो फॉटोशॉप करून पसरवण्यात आला होता.
मात्र चंद्रात अशी प्रतिमा दिसण्याची ही काही पहिली घटना नाही. अगदी पुरातन काळापासून अनेकांना अनेकदा अशा प्रकारचा भास झाला आहे. कुणाला चंद्रावर, कुणाला ढगांमध्ये, कुणाला झाडाच्या पानांमध्ये, तर कुणाला भाज्यांमध्येसुद्धा चेहेरे दिसले आहेत. अशा प्रकारे प्रतिमा दिसण्यामागे काय कारण असावं?
याला पॅरेडोलिया (Pareidolia) असं म्हणतात. हा शब्द आपल्या माहितीतला नसला तरी याचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतलेलाच आहे.
अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची कल्पना करणं म्हणजे पॅरेडोलिया. हा एक प्रकारचा सिंड्रोम आहे. एखाद्याला जर चंद्रात दोन डोळे, तोंड, नाक असा चेहऱ्याचा आकार दिसत असेल तर तो पॅरेडोलिक आहे, असं म्हणतात.
पॅरेडोलिया सिन्ड्रोम
काही वर्षांपूर्वी जर्मनीच्या Onfirmative या डिझाईन स्टुडिओने या पॅरेडोलिया सिंड्रोमसंदर्भात अभ्यास केला होता. गुगल फेसेस प्रोजेक्टचा तो एक भाग होता. या प्रकल्पांतर्गत या स्टुडिओने पृथ्वीचे वेगवेगळ्या कोनातून फोटो घेतले. या फोटोमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आकार आणि चेहेरे दिसले.
काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन नागरिकाला चिकन नगेटमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची प्रतिमा दिसली होती. तो चिकन नगेट ई-बेवर पाच हजार युरोला विकला गेला होता.
तर जवळपास 15 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये एका चपातीमध्ये येशूचा चेहरा दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी देश-परदेशातून जवळपास वीस हजार ख्रिश्चन बांधव बंगळुरूत गेले होते.
1994मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या डायना डायझर नावाच्या स्त्रीला ती खात असलेल्या चीझ टोस्टमध्ये व्हर्जिन मेरीची प्रतिमा दिसली होती. 10 वर्ष हा टोस्टचा तुकडा जपून ठेवल्यानंतर तिने त्याचा लिलाव केला, त्यात तिला 28 हजार डॉलर्स मिळाले होते.
गुगल फेसेसचे डिझायनर सेड्रिक किफर आणि ज्युलिया रॉब या दोघांनाही पॅरेडोलियाबद्दल फार कुतूहल आहे.
मंगळ ग्रहाच्या एका फोटोत माणसाच्या चेहऱ्याची प्रतिमा बघितल्यावर आणि कॅमेऱ्याच्या फेस रिक्गनिशन तंत्रज्ञानाच्या विकासानंतर तर त्यांचं हे कुतूहल अधिकच वाढलं. मशीनद्वारे पॅरेडोलिया ही मानसिक स्थिती कशी निर्माण करता येईल, याचा ते विचार करू लागले.
अल्पावधीतच माणसांच्या प्रतिमा असलेले रशियाच्या टुन्ड्रा प्रदेशाचे आणि ब्रिटनच्या ग्रामीण भागातले त्यांनी काढलेले फोटो वेबवर खूपच लोकप्रिय ठरले. किफर सांगतात, "काही प्रतिमा इतक्या वास्तविक असतात की तो केवळ योगायोग आहे, हे मान्यच होत नाही."
अशा प्रतिमा का दिसतात?
मात्र लोकांना चंद्रात, ढगांमध्ये, डोंगरांमध्ये अशा प्रकारचे आकार किंवा प्रतिमा का दिसतात?
हॉर्वर्ड विद्यापीठाच्या नौशीन हाजीखानी सांगतात, "माणसाला पिढ्यानपिढ्या परंपरागत पद्धतीने जे ज्ञान मिळत आलं आहे, हेसुद्धा या पॅरेडोलियामागंचं एक कारण आहे. जन्मापासूनच आपल्याला अवतीभोवतीच्या लोकांमध्ये ओळखीचे चेहरे बघण्याची सवय असते. नवजात बाळसुद्धा अवतीभोवतीच्या चेहऱ्यांमध्ये साम्य शोधत असतं."
माहितीवर प्रक्रिया करण्याच्या मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीचा तो परिणाम असल्याचं काही तज्ज्ञांना वाटतं. मेंदू सतत रंग, आकार, रेषा इत्यादींचं आकलन करत असतो. हे करत असताना तो स्मृतीमध्ये पूर्वीच साठवून ठेवलेल्या प्रतिमांशी त्याची तुलना करतो. जेव्हा मेंदूला दोघांमध्ये काही साम्य आढळतं, तेव्हा नव्याने बघत असलेली वस्तू ही स्मृतीत आधीच साठवलेली तीच जुनी वस्तू असल्याचं मेंदूला वाटतं.
पॅरेडोलिया आपल्या विचारांचंही प्रतिबिंब असल्याचं लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या न्युरोसाइंटिस्ट सोफी स्कॉट यांना वाटतं. मेंदूत येशूचा विचार घोळत असल्यानेच टोस्टमध्ये येशूची प्रतिमा दिसल्याची घटना घडल्याचं त्या सांगतात.
एकदा का अशी एखादी प्रतिमा तुम्हाला दिसली की मग बघणाऱ्या प्रत्येकाला ती दिसते. The Self Illusionचे लेखक ब्रुस हड म्हणतात, "त्या प्रतिमांची ताकद इतकी असते की आपण त्यातून बाहेर पडूच शकत नाही."
हड सांगतात, "चमत्कारांवर विश्वास असलेल्या व्यक्तींना तर हे भास खरेच वाटतात. या व्यक्ती इतक्या आहारी गेलेल्या असतात की त्यांना भूत, आत्मे दिसू लागतात. ते त्यांच्याशी बोलतात. त्यांना बोलावतात. हा दैवी चमत्कार असल्याचं त्यांना वाटतं."
देवावर विश्वास असलेल्यांनाच हा पॅरेडोलिया सिन्ड्रोम होतो, असं नाही. मात्र हा सिंड्रोम असलेले बहुतांशी लोक हे आस्तिक असतात, असं ते सांगतात.
शेवटी अशा प्रतिमा या केवळ मेंदूच्या कल्पना असतात. तो भास असतो, यापलीकडे काहीही नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)