You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नमाज पठणापासून रोखल्याचा मुस्लिमांचा आरोप, हरियाणातील गावात तणाव
- Author, सत सिंह
- Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातल्या टीटोली या गावात महिनाभरापूर्वी एका वासराला मारल्याच्या आरोपाखाली दोन मुस्लीम तरुणांना अटक करण्यात आली होती. या घटनेच्या महिनाभरानंतर मुस्लीम समाजाच्या लोकांवर ग्रामसभेनं अनेक बंधनं लादल्याचा आरोप केला जात आहे.
मुस्लीम समाजाचं प्रतिनिधित्व करणारे राजबीर खोखर म्हणतात, "नमाज पठणासाठी गावाबाहेर किंवा जवळच्या रोहतक शहरात जा, असं इथल्या मुस्लिमांना सांगण्यात आलं आहे. वासराच्या हत्येच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या यामीन खोखरला कोर्टानं दोषी ठरवावं किंवा नाही. पण गावानं आधीच त्याला गावात यायला आजीवन बंदी घातली आहे."
राजबीर सांगतात मुस्लीम समाजाला शांततेनं राहायचं आहे, त्यामुळे त्यांना ग्रामसभेचा निर्णय मान्य करावाच लागेल. त्यांचं म्हणणं आहे, कधीकधी दुसऱ्या समाजातल्या तरुणांची माथी शांत ठेवण्यासाठी काही पावलं उचलावी लागतात. "अशाप्रकारच्या बंदीचा काही उपयोग आहे किंवा नाही, हे तर येणारा काळच सांगेल. मात्र, गावात शांतता नांदावी यासाठी सध्यातरी आम्ही या निर्णयाला विरोध करणार नाही."
ते पुढे सांगतात, ग्रामसभेत कधीच कुठलाच ठराव लिखित स्वरुपात मंजूर होत नाही. नेहमी तोंडीच ठराव मंजूर केले जातात आणि जे उपस्थित नसतील त्यांच्यापर्यंत गावातले रखवालदार निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवतो.
कसलीही बंदी नाही, हिंदूंचा दावा
दुसरीकडे, गावातल्या हिंदूंनी मुस्लिमांच्या या आरोपांचं खंडन केलं आहे. सुरेश कुमार या जाट तरुणाचं म्हणणं आहे, "ग्रामसभेनं नमाज पठणावर किंवा दाढी ठेवण्यावर किंवा टोपी घालण्यावर बंदी घातलेली नाही. ग्रामसभेच्या बैठकीत केवळ एक निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे गावातलं कब्रस्तान दुसरीकडे हलवावं."
सुरेश कुमाार हे गावच्या सरपंच प्रमिला देवी यांचे दिर आहेत आणि ग्रामपंचायतीचं सर्व कामकाज तेच बघतात.
बीबीसी पंजाबीनं पोलिसांकडे जाऊन त्यांना या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र टिटोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उप-निरिक्षक नाफे सिंह यांनी त्यांना अशा कुठल्याही निर्णयाची अजिबात माहिती नसल्याचं सांगितलं. रहिवासी भागात आल्यानं कब्रस्तान दुसरीकडे हलवण्याच्या मुद्द्यावरून गेल्या मंगळवारी काही माणसं गोळा झाल्याचं ते म्हणाले. मात्र ग्रामसभेच्या त्या बैठकीत मोठ्या संख्येनं गावकरी हजर असल्याचं मुस्लिमांचं म्हणणं आहे.
गावात उघड तणाव
यामीन आणि शौकीन या दोघांच्या घराजवळ 22 ऑगस्टला एक मेलेलं वासरू आढळलं होतं. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. ते वासरू यामीन यानंच मारलं आहे, असं चिडलेल्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं.
मात्र दोघांनीही हे आरोप नाकारले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाला गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. त्यानंतर यामीन आणि त्याचा मदतनीस शौकीन दोघांनाही गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
दरम्यान, गावात तणाव निर्माण झाल्यानं आरोपीची बायको, मुलं आणि भाऊ गाव सोडून गेले. ते अजूनही परतलेले नाही. गावातल्या मुस्लीम बहुल भागामध्ये भीतीचं वातावरण स्पष्ट जाणवतं. मुस्लिमांच्या गल्ल्या ओस पडल्या आहेत आणि जे आहेत तेसुद्धा मीडियाशी या मुद्द्यावर बोलायला घाबरतात.
घटनेच्या महिनाभरानंतरही घटनेतला मुख्य आरोपी यामीन खोखर याच्या घराला टाळं आहे.
ग्रामसभेच्या कथित आदेशाबद्दल बोलताना राजबीर सांगतात, "प्रकरणाला राजकीय वळण देण्यासाठी येणाऱ्या मुस्लीम नेत्यांना घरी येऊ देऊ नका, असे आदेशही ग्रामसभेनं दिले आहेत."
हिंदुंबरोबर गावातील तळ्याजवळ अनेक वर्षं पत्ते खेळणारे आणि हिंदुंशी घरोब्याचे संबंध असणारे सत्तर वर्षांचे मीरसिंह खोखर सांगतात की ग्रामसभेनं चार निर्णय घेतले.
"वासराची हत्या करण्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी यामीनला गावात प्रवेश मिळणार नाही. मुस्लिमांना नमाज अदा करायची असेल तर त्यांनी रोहतक किंवा इतर कुठल्या ठिकाणी जावं, मात्र गावात नाही. मुस्लिमांचं कब्रस्तान एक किलोमीटर लांब गावच्या वेशीवर हलवावं आणि सध्या जिथं कब्रस्तान आहे तिथं 22 ऑगस्टला मारण्यात आलेल्या वासराचं स्मारक बनवावं."
मात्र गावात बहुसंख्य असलेल्या हिंदू जाट समाजानं मुस्लीम समजाविरोधात कुठलाही ठराव मंजूर केल्याचं वृत्त फेटाळलं आहे.
ग्रामसभेच्या बैठकीला उपस्थित असलेला दीपक कुमार सांगतो, कब्रस्तान हलवण्याचा निर्णय मुस्लिमांना विश्वासात घेऊनच घेण्यात आला आहे. तो म्हणतो, "गावातले मुस्लीम पिढ्यानपिढ्या नियम पाळत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या दाढी, टोपीर किंवा नमाज पठणावर बंदी आणण्याचा प्रश्नच नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)