मुंबईच्या छोट्या पेंग्विनचा आठच दिवसांत मृत्यू

15 ऑगस्टला मुंबईच्या जिजाबाई उद्यानात जन्माला आलेल्या पिंगूने आठच दिवसांत अखेरचा श्वास घेतला आहे. 22 ऑगस्टला रात्री हे पिल्लू मृतावस्थेत आढळल्याचं उद्यानानं प्रसिद्धिपत्रकात जाहीर केलं आहे. या पिलाची प्रकृती सकाळी खराब झाली आणि रात्रीपर्यंत ते अत्यवस्थ झालं होतं. त्याच्या यकृतात बिघाड झाला होता.

जिजामाता उद्यानाच्या प्रशासनानं म्हटलं आहे की १५ ऑगस्टला जन्म झाल्यानंतर पिलाचे दोन्ही पालक त्याची उत्तम काळजी घेत होते. त्याची वाढही योग्य प्रकारे होत होती. त्याच्या वडिलांचं नाव मोल्ट तर आईचं नाव फ्लिपर आहे.

प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे की '२२ ऑगस्टला या पिलाची प्रकृती ढासळली. उद्यानात आणलेल्या या हंबोल्ट पेंग्विनची काळजी घेणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने सर्व प्रयत्न करून देखील २२ तारखेला हे पिल्लू मृतावस्थेत आढळलं.'

२३ ऑगस्टला सकाळी उद्यानातील हॉस्पिटलमध्ये या पिलाचं शवविच्छेदन करण्यात आलं. प्राथमिक निरीक्षणामध्ये या पिलाचा मृत्यू 'प्रामुख्याने नवजात पिलातील विसंगती' म्हणजेच अंड्यातील पिवळा बलक वापरला न गेल्याने किंवा यकृतात बिघाड यामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या मृत पेंग्विनच्या पालकांची तब्येत उत्तम असल्याचेही उद्यान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जुलै 2016मध्ये वर्षांपूर्वी मुंबईत हंबोल्ट जातीचे 8 पेंग्विन आणण्यात आले होते. त्यातले 5 मादी आणि 3 नर होते. तीन महिन्यांनंतर डोरी नावाच्या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला होता.

१५ ऑगस्टच्या रात्री ८ वाजून २ मिनिटांनी हे पिल्लू अंड्यातून धडपडत बाहेर आलं होतं. त्यामुळे काहींनी सोशल मीडियावर त्याचं नाव 'फ्रीडम बेबी' असंही ठेवलं होतं. पेंग्विनने भारतात जन्म घेण्याची ही पहिलीच घटना होती, असं प्रशासनाने जाहीर केलं. त्यामुळे या जन्माची देशभरात चर्चा होती.

हंबोल्ट पेंग्विन दक्षिण पेरूमध्ये आढळत असले तरी मुंबईतले हे पेंग्विन दक्षिण कोरियाच्या सोलमधून आणले होते.

या बातमीवर सोशल मीडियावर लगेच प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी हळहळ व्यक्त केली तर काहींनी संताप व्यक्त केला. या मृत्यूला जबाबदार कोण आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार का, असे प्रश्न विचारले.

थंड प्रदेशातले हे प्राणी भारताच्या उष्णतेत जगू शकतात का, हा प्रश्न आता लोक नव्याने विचारू लागले आहेत.

तर, या पेंग्विनना मुंबईत राहण्याजोगं वातावरण नसताना त्यांना मुंबईत कोणाच्या हट्टासाठी आणलं आहे? असा सवाल बीबीसी मराठीचे वाचक रवींद्र तारू यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)