मुंबईत जन्माला आलं हे 75 ग्रॅम वजनाचं गोंडस पेंग्विन

    • Author, प्रशांत ननावरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

15 ऑगस्टची स्वातंत्र्यदिनाची सायंकाळ. मुंबईत नेहमीची धावपळ सुरू होती. पण, इथल्या भायखळ्यात सुरू असलेली प्राण्यांच्या डॉक्टरांची धावपळ जरा खासच होती. खासपेक्षा ऐतिहासिक म्हणावी लागेल. कारण, इथल्या मुंबई महानगर पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एका अंडयाला तडा गेला होता.

हे अंडं काही साध्या-सुध्या पक्ष्याचं नव्हतं. तर, हम्बोल्ट जातीच्या 'फ्लिपर' या पेंग्विन मादीनं 40 दिवसांपूर्वी दिलेलं हे अंडं होतं. गेल्या बुधवारी संध्याकाळी 6 वाजता या अंड्याला पहिल्यांदा तडा गेला.

साहाजिकच सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. बुधवारीच अवघ्या दोन तासांत म्हणजे बरोबर 8 वाजून 2 मिनिटांनी अंड्यातील पिल्लू धडपड करत बाहेर आलं.

पेंग्विनने भारतात जन्म घेण्याची ही पहिलीच घटना होती. उद्यानातला नर पेंग्विन 'मोल्ट' आणि मादी पेंग्विन 'फ्लिपर' यांचं हे नवजात पिल्लू.

दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाच्या सोलमधून भारतात मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) पहिल्यांदाच तीन नर आणि पाच मादी पेंग्विन दाखल झाल्या. तेव्हापासून काळ्या कोटवाल्या या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात पर्यटक तुफान गर्दी करत आहेत.

भारतात दाखल झाल्याच्या अवघ्या दीड वर्षांतच अतिशय लोभसवाण्या हम्बोल्ट पेंग्विनपैकी मादी फ्लिपरने 5 जुलै रोजी अंडे दिले होते. अंड्यातून पिल्लू बाहेर पडण्याची प्रक्रिया 40 दिवसांची असते.

या चाळीस दिवसांच्या काळात मादी फ्लिपर आणि नर मोल्ट आळीपाळीनं अंडं उबण्यासाठीची जबाबदारी घेतात. दहा दिवसांपूर्वी तर मादी फ्लिपर सलग 48 तास अंड्यावर बसून होती. ही माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

15 ऑगस्टला सायंकाळी पिलाचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरांची टीम रात्रभर पिलावर लक्ष ठेवून होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच्या सुमारास म्हणजे जवळपास बारा तासांनंतर डॉक्टरांनी नवजात पिलाला स्पर्श केला.

सुदृढ पिल्लू

"पेंग्विन भारतात दाखल होऊन अवघी दोन वर्षंच झाली आहेत. साधारणपणे नव्या हवामानाशी आणि जागेशी जुळवून घ्यायला त्यांना बराच कालावधी जावा लागतो. परंतु भारतात दाखल झालेल्या या पेंग्विनने अवघ्या दोन वर्षांच्या आतच अंडं दिलं. ही जगातील एकमेव घटना आहे," असा दावा डॉ. त्रिपाठी करतात.

पेंग्विन साधारणपणे वर्षांतून दोन वेळा आणि एकदा दोन अंडी देतात. पण फ्लिपर आणि मोल्ट यांनी एकच अंड दिलं आहे. नर-मादीच्या जोडीपैकी मादी फ्लिपर ही साडेचार वर्षांची असून नर मोल्ट हा तीन वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्यांच्यात समागम झाल्यानं एकच अंडं दिलं गेलं असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.

पेंग्विनच्या नवजात पिल्लाचं वजन हे 60 ग्रॅमच्या आसपास असतं. पण भारतात जन्मलेल्या पेंग्विनच्या पहिल्याच पिल्लाचं वजन हे 75 ग्रॅम असून उंची 12 ते 15 सेंटीमीटर इतकी आहे.

पिल्लाचे लिंग आठवड्याभराने कळणार

भारतात जन्मलेल्या पेंग्विनच्या नवजात पिल्लानं अद्याप डोळे उघडलेले नाहीत. त्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी जाईल. अंड्यातून बाहेर आल्यावर लहानग्या पेंग्विनने मात्र 'क्यॅह्यॅ' करत आपल्या अस्तित्वाची जाणीव सर्वांना करून दिली.

पिल्लाचं लिंग अजून कळलं नसून गुणसूत्र चाचणीनंतरच पिल्लू नर आहे की मादी हे स्पष्ट होईल. त्यासाठी बंगळुरू येथील लॅबमध्ये सॅम्पल पाठवले जाणार आहेत. त्यानंतरच पिलाचं नामकरण केलं जाईल, अशी माहिती डॉ. त्रिपाठी यांनी दिली.

तीन महिन्यानंतर दर्शन

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विगची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ते पाहण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. पण पुढील तीन महिने पिल्लू त्याचे आईवडील फ्लिपर आणि मोल्ट यांच्यासोबतच असेल.

राणीच्या बागेतील सर्व पेंग्विनना दिवसाला साडेचारशे ते पाचशे ग्रॅमच्या आसपास आहार दिला जातो. त्यामध्ये चार ते पाच प्रकारचे मासे असतात. ते वाशीवरून आणले जातात. पण नवजात पिल्लाला कुठलंही बाहेरचं अन्न दिलं जाणार नाही. मासे खाऊन त्याच्या पचनानंतर शरीरात निर्माण झालेला चोथा बाहेर काढून फ्लिपर आपल्या पिल्लाला भरवेल आणि तोच पिल्लाचा आहार असेल.

पिल्लाला पिसं येऊन पोहण्याची शारीरिक क्षमता विकसित होण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच पिल्लाला इतर पेंग्विनसोबत मुक्तसंचार करण्यासाठी सोडले जाईल आणि तेव्हाच पर्यटकांनाही त्याचं दर्शन घडेल.

जन्माची कहाणी माहितीपटाद्वारे उलगडणार?

चाळीस दिवसापूर्वी मादी फ्लिपरने अंडं दिलेल्या घरट्यात चोवीस तास निरीक्षण करणारे कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे अंडं दिल्यापासून ते जन्मापर्यंतचे संपूर्ण चित्रण राणीबाग प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्याचाच वापर करून भारतातील पहिल्या पेंग्विनची जन्मकहाणी सांगणारा माहितीपट बनवण्याचा विचार करू, असं डॉ. संजय त्रिपाठी म्हणाले.

पेंग्विनसाठी सर्वोत्तम सुविधा

भारतात दाखल झालेल्या पेंग्विनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'असोसिएशन्स ऑफ झू अॅन्ड अॅक्वेरियम' यांनी पेंग्विगची काळजी घेण्यासाठी तयार केलेल्या मॅन्युअलमधील मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं जात असल्याचं डॉ. त्रिपाठींनी स्पष्ट केलं.

फ्लिपरने अंडं दिल्यापासून डॉ. मधुमिता काळे, डॉ. नेहा शाह आणि डॉ. गोविंद मंगनाळे यांच्यासह प्राणी संग्रहालयातील तीन कर्मचारी तीन शिफ्टमध्ये अंड्याची देखरेख करत होते. सर्व डॉक्टर कायम त्यांच्या अमेरिकेतील सल्लागारांच्या संपर्कात होते आणि संदर्भ पुस्तकांमधून आवश्यक माहिती मिळवत होते.

अंड्यासाठी अतिदक्षता विभाग

एवढंच नव्हे तर कोणत्याही कारणास्तव नर आणि मादीने अंड्याकडे दुर्लक्ष केल्यास तातडीची उपाययोजना म्हणून अतिदक्षता विभागाचीही उभारणी करून ठेवण्यात आलेली होती.

पेंग्विनच्या भारतातील आगमनावरून प्रचंड वादळ उठलं होतं. मुंबईचे उष्ण हवामान त्यांना सहन होणार नाही, अशी टीका त्यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या काळातच या पक्ष्यांमधील सर्वांत तरुण मादीचा एन्रोफ्लाक्सोसिन या जिवाणूंचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता.

दोन वर्षांपासून टीकेला सामोरं गेल्यानंतर आणि दिवसरात्र घेतलेल्या सर्व प्रकारच्या उपाययोजनांनंतर पेंग्विनच्या जन्माने प्राणी संग्रहालयात आनंदाचं वातावरण आहे. आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती नवजात पेंग्विनच्या प्रत्यक्ष दर्शनाची.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)