You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एशियन गेम्समधल्या या आहेत साठी पार केलेल्या महिला खेळाडू
- Author, वंदना
- Role, बीबीसी प्रतिनिधी
67 वर्षांच्या हेमा देवरा, 67 वर्षांच्याच किरण नादर आणि 79 वर्षांच्या रीटा चौकसी... ही त्या महिलांची नावं आहेत ज्या यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.
तुम्ही विचार करत असाल की ज्यांचं रिटायरमेंटचही वय निघून गेलं त्या महिला कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडास्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कसं करू शकतात? या सगळ्या महिला ब्रिज म्हणजेच पत्त्यांच्या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.
मला ब्रिज या खेळातलं अबकडही माहीत नव्हतं, पण साठी ओलांडलेल्या या खेळाडूंच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा मला दिल्लीतला माझा पहिला ब्रिजचा डाव आणि ब्रिजपटू हेमा देवरांकडे घेऊन गेली.
वयाच्या पन्नाशीपर्यंत हेमा देवरा एकतर घरी मुलांसोबत राहायच्या किंवा पती आणि राजकीय नेते मुरली देवरा यांच्याबरोबर दौऱ्यावर असायच्या. मुरली देवरा पेट्रोलियम मंत्रीही होते. त्यांना ब्रिजचं अबकडही माहीत नव्हतं.
बीबीसीशी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या पतीचे मित्र दर शनिवारी चार वाजता घरी यायचे - मग भले पाऊस असो, वादळ असो किंवा काहीही असो आणि तासंतास ब्रिज खेळायचे.
"ते इतके मग्न व्हायचे की त्यांच्या लक्षात काहीच राहायचं नाही. मला कायम वाटायचं की नेमकं असं काय आहे या पत्त्यांच्या खेळात, कोणती नशा आहे की या लोकांना त्यापासून लांब राहाता येत नाही? माझ्या माहेरी पत्ते खेळणं सुसंस्कृतपणाचं लक्षण नव्हतं," हेमा सांगतात.
जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली आणि मुरली देवराही राजकारणातून अलिप्त राहायला लागले, तेव्हा 1998च्या आसपास त्यांनी ब्रिज शिकायला सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी एक पार्टनर निवडला आणि हळूहळू त्या ब्रिजच्या स्पर्धा जिंकायला लागल्या. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्या परदेशी जायला लागल्या.
एकदा हेमा दिल्लीमध्ये ब्रिजच्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या आणि तेव्हा पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा तिथं प्रमुख पाहुणे होते. हेमा त्या स्पर्धेत जिंकल्या आणि मुरली देवरांनी त्यांना ट्रॉफी दिली. "माझी सगळ्यात हृदयस्पर्शी आठवण आहे ती," असं त्या सांगतात.
कधीकाळी आर्किटेक्ट असणाऱ्या हेमा नंतर बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांच्याबरोबरही ब्रिज खेळल्या आहेत.
त्यांच्या मते ब्रिज हा बुद्धीचा खेळ आहे. "जर तुमची बुद्धी शाबूत असेल, तुम्ही गोष्टी सहजासहजी विसरत नसाल आणि अनुभवी असाल तर तुमचं वय किती आहे यानं फरक पडत नाही," हेमा म्हणतात.
दुसरीकडे 79 वर्षांच्या रीटा चौकसींची कहाणी सुद्धा इंटरेस्टिंग आहे. त्या कदाचित भारतातल्या सगळ्यांत वयस्कर खेळांडूपैकी आहेत.
सत्तरच्या दशकापासूनच रीटा ब्रिज खेळत आहेत आणि त्यांनी बऱ्याच स्पर्धा जिंकल्या आहेत. अर्थात त्यांनी कधी विचार नव्हता केला की त्यांना एशियन गेम्समध्ये खेळण्याची संधी मिळेल.
ब्रिजमुळेच त्यांचीच भेट त्यांचे दुसरे पती डॉ. चौकसी यांच्याशी झाली. त्याच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता. ब्रिजच्या टेबलवर एकत्र खेळणारे रीटा आणि डॉ. चौकसी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे साथीदार झाले.
पण त्यांचं वैवाहिक जीवन अल्पायुषी ठरलं. 1990मध्ये त्यांच्या दुसऱ्या पतीचाही मृत्यू झाला. दोन्ही मुलं लंडनला शिकायला गेली आणि तिथेच राहिली. रीटा आयुष्यात एकदम एकट्या पडल्या, पण त्यांच्या पत्त्यांनी त्यांची साथ सोडली नाही.
रीटा आपल्या पत्त्यांचा डाव मांडत राहिल्या आणि आज एशियन गेम्समध्ये पोहचल्या आहेत.
एशियन गेम्समध्ये अनेक प्रकारच्या उत्तेजक चाचण्या होतात. जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल तर साहाजिक आहे की बरेचसे ब्रिज खेळाडू अनेक प्रकारची औषधं घेत असणार.
अशात या खेळाडूंनी आणि ब्रिज असोसिएशननं आधीच नॅशनल डोपिंग एजंसीशी संपर्क केला म्हणजे पुढे अडचणी यायला नकोत.
हेमा देवरांसारखंच रीटा चौकसींना पण वाटतं की ब्रिज माइंड गेम आहे. आपल्या बुद्धीची धार टिकवून ठेवण्यासाठी त्या ऑनलाईन ब्रिज खेळतात जिथं दुसरे खेळाडूही असतात.
ब्रिजपटू आणि 67 वर्षांच्या किरण नादर यांनी याच वर्षी कॉमनवेल्थ नेशन्स चँपियनशिप जिंकली आहे.
किरण त्यांच्या घरी आई-वडीलांसोबत ब्रिज खेळायच्या आणि नंतर पतीबरोबर खेळता खेळता त्या खेळात प्रवीण झाल्या.
त्यांचे पती शिव नादर HCL कंपनीचे संचालक आहेत. किरण यांना कलेतही खूप रस आहे. त्या किरण नादर म्युझियम ऑफ आर्टच्या अध्यक्षाही आहेत.
दिल्ली ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष आनंद सामंत यांच्या मते ब्रिज हा खेळ अनेक देशांतल्या शाळा कॉलेजमध्ये शिकवला जातो. पण भारतात मात्र पत्त्यांकडे अजूनही चांगल्या नजरेनं पाहिलं जात नाही. ब्रिजसाठी आपल्याकडे स्कॉलरशिपही दिली जात नाही.
पण एक गोष्ट सगळ्याच ब्रिज खेळांडूनी अधोरेखित केली आहे ती म्हणजे ब्रिज खेळासाठी वयाचं कोणतंही बंधन नाही.
फोनवर हेमा देवरांनी मला सांगितलं की ब्रिजसारखं पॅशन म्हणजे उतरत्या वयातली गुंतवणूकच आहे.
आणि हेही सांगितलं की, वयाच्या एका टप्प्यात मुलं, कुटुंब नसतात. तुमचं आयुष्य त्यांच्या देखभालीत गेलेलं असतं आणि अशा वेळेस हा खेळ तुम्हाला एकट पडू देत नाही. भरीस भर म्हणून बुद्धी तीक्ष्ण ठेवतो ते वेगळंच.
हे ऐकून मला वाटलं की माझ्यासारख्या तिशी पार केलेल्या नवशिक्यांसाठी अजून आशा आहे तर.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)