You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॉग : 'शिवडे आय एम सॉरी'च्या निमित्तानं - प्रेयसीची माफी कशी मागावी?
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
प्रेयसची माफी कशी मागावी किंवा 'how to apologize to your girlfriend' असं जर गूगल सर्च केलं तर साडेतीन कोटीपेक्षा जास्त रिझल्ट मिळतात.
उदाहरण द्यायचं तर माफी मागण्याचा तुमचा उद्देश स्पष्ट करा, तुमच्या वर्तणुकीचं स्पष्टीकरण द्या, तुमच्या प्रेयसीचं म्हणणं समजून घ्या, तुमच्यातील मतभेद दूर होण्यासाठी वेळ द्या, तिला भेटवस्तू द्या, पत्र लिहा, असे गूगलवर बरेच रिझल्ट येतात.
जेव्हा प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरात 300 फलक लावले, तेव्हा मला आश्चर्य वाटलं की त्यांनं गूगलवरही उत्तर वाचली नसतील का?
25 वर्षांच्या या युवकानं 'Shivde I am Sorry' असं लिहिलेलं फलक पिंपरी चिंचवड परिसरात लावले होते.
प्रेयसीच्या हृदयापर्यंत पोहचण्यासाठी I am Sorryचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा विचार या युवकाच्या मनात का आणि कसा आला असेल?
प्रेयसीचं खरं किंवा टोपणनाव सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या होर्डिंगवर जाहीर करून प्रेयसीला अडचणीत तर आणत नाही ना, असा विचार त्याच्या मनात का आला नसेल?
ही कामगिरीच अशी होती की सर्वच माध्यमांनी याची दखल घेतली आणि ज्यांनी हे होर्डिंग पाहिलं नव्हतं आणि जे शहरात आणि राज्यात राहत नाहीत त्यांनाही हे कळलं.
आता ही मुलगी जिथं राहते त्या परिसरातील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
त्या मुलीनं या मुलाला माफ केलं का नाही हे कळू शकलं नसलं तरी या घटनेमुळे माफी कशी मागावी, यावर चर्चा झडू लागल्या आहेत.
प्रेयसीची जाहीर माफी मागण्याचा हा शेवटचा किंवा पहिला प्रकार नाही. सेलिब्रिटींनीही हा मार्ग स्वीकारला होता.
प्रसिद्ध गायिका रिहानाचा बॉयफ्रेंड ख्रिस ब्राऊननं तिची जाहीर माफी मागितली होती. 2009मध्ये ख्रिसनं रिहानाला मारहाण केली होती. त्यानंतर ख्रिसवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही नोंद झाला होता.
काही महिन्यानंतर त्याने रिहानाची माफी मागणारा व्हीडिओ रीलिज केला. मला आधीच माफी मागायची होती, पण खटला सुरू असल्याने वकिलांनी तसं न करण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासाही त्यानं केला होता.
मी रिहानाची अनेक वेळा वैयक्तिक माफी मागितली होती, पण तिनं ती स्वीकारली नाही, म्हणून जाहीर माफी मागत असल्याचं त्याने म्हटलं होते. झाल्या प्रकाराबद्दल आपल्याला खजील वाटत असून असा प्रकार परत कधी करणार नाही आणि आदर्श प्रियकर म्हणून मला पुढं यायचं आहे, असं त्यानं म्हटलं होतं.
या माफी मागचा उद्देश काय होता? रिहानाचं मन जिंकायचं होतं की स्वतः रोल मॉडेल व्हायचं होतं?
ही माफी ना रिहानाने स्वीकारली ना कायद्याने आणि ख्रिसला घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यात तुरुंगवासही झाला.
आपल्या शिगी डान्समुळे इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर लाखो फॉलोअर्स असलेल्या इंटरनेट स्टार शिगीने गेल्या महिन्यात त्याच्या प्रेयसीची जाहीर माफी मागितली होती.
शिगीने माफीचा व्हीडिओ पोस्ट केला आणि प्रेयसीचा विश्वासघात केल्याबद्दल माफी मागितली. आपल्याला खजील वाटत असून रोल मॉडेल व्हायचं आहे, असं त्यानं म्हटलं होतं.
अशा माफीमुळे शिगी तिच्या प्रेयसीचं काय तर त्याच्या चाहात्यांचं मन जिंकण्याचीही शक्यता नाही. या माफीबद्दल त्याला ट्वीटरवर ट्रोलही करण्यात आलं. यातून त्याची स्त्रियांबद्दलची मानसिकता आणि विखारी पुरुषी मनोवृत्ती दिसते, अशी टीकाही काहींनी केली.
सेलेब्रिटी जेव्हा जाहीर माफी मागतात तेव्हा बहुतांशवेळा एखाद्या ठराविक व्यक्तीकडून स्वीकार मिळावा हा उद्देश नसतो. हा प्रकार बऱ्याच त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला जो तडा गेला आहे त्यासाठी डॅमेज कंट्रोलचा प्रकार असतो. पण जर उद्देश योग्य नसेल तर लोकही त्यांना माफ करत नाहीत.
UN, जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय अभ्यासानं प्रेयसीची माफी मागण्याची परिपूर्ण मानकं ठरवलेली नाहीत.
जर एखाद्याला बोलायचं नसेल आणि त्याला आपण बोलावं यासाठी प्रयत्न करत असू आणि जबरदस्तीनं जर नकाराला होकारात बदलवण्याचा प्रयत्न करत असू तर ते 'स्टॉकिंग' ठरतं.
जर माफीचा स्वीकार केला नाही केली तर आपण हृदयशून्य आहोत, असं समजलं जाईल म्हणूही माफी स्वीकारण्याचा दबाव येतो.
अशा पद्धतीनं दबावाखाली स्वीकारलेल्या माफीनं ना तर मनापासून स्वीकरालेली असते ना तर यातून मन जुळतं.
प्रेम आणि माफी सार्वजनिक ठिकाणी मागायचं नसतं. याची कला आणि स्टाईल हे दोन्ही उद्देशांवर अवलंबून असतं.
एखाद्याची चूक मान्य करणं, एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन खुल्या मनाने ऐकणं आवश्यक असतं. त्यानंतर उत्तराची वाट पाहणं आणि उत्तर 'नाही' असेल तर स्वीकारावं. जर होकार असेल तर मागितलेली माफी निभावण्याची मानसिकता हवी.
कारण 'सॉरी' म्हणणं पाहिलं पाऊल असतं. चुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं माफीच्या उद्देशीची परीक्षा असते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)