You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मी, माझं, मला : आजचे मिलेनिअल्स स्वतःच्याच प्रेमात आहेत का?
- Author, ख्रिस्तिअन जारेट
- Role, बीबीसी फ्युचर
आज सकाळी मी एका कॅफेमध्ये काम करत बसलो होतो. माझ्या शेजारच्या टेबलावर एक तरुणी आणि तिच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती बसले होते. ती तरुणी तासभर मोठ्या उत्साहात फक्त स्वतःबद्दलच बोलत होती, तिच्या बोलण्यात तिच्या आशा आणि नोकरीसंबंधीच्या आकांक्षा, तिचं प्रेमप्रकरण आणि तिचं घर हेच विषय होते.
तिचं जग फक्त स्वतःभोवतीच फिरत होतं, किंबहुना तिच्यासाठी ती स्वतःच या जगाचा केंद्रबिंदू होती. तिच्या मते तिची स्वप्नं सर्वांत महत्त्वाची होती.
आर्थिक उदारीकरणानंतर, म्हणजे साधारण 90च्या आसपास जन्मलेली आजची तरुण पिढी "मिलेनियल्स" म्हणून ओळखली जाते. ही पिढी अशीच आहे का? सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करण्याच्या आणि स्वतःचं प्रतिबिंब शोधण्याच्या अगणित संधी या पिढीसमोर आहेतच. त्याच्या जोडीला आली ती शिकण्यापेक्षा स्व-प्रशंसेला अधिक महत्त्व देणारी वाढती संस्कृती, यामुळे तरुणांचं व्यक्तिमत्त्व आधीच्या पिढीपेक्षा बदललं आहे का, ते अधिक आत्मकेंद्रित आणि स्वार्थी झाले आहेत का?
मानसशास्त्रज्ञांमध्ये याबद्दल मतभेद आहेत. काहींचं असं म्हणणं आहे की, तरुण पिढी फक्त "मी, मला, माझं" असाच विचार करते, हे दाखवून देणारे भरपूर पुरावे आहेत. तर काही मानसशास्त्रज्ञांच्या मते तसं अजिबात नाही.
दरम्यान, दर पिढीमागे बुद्धिमत्ता वाढत असल्याच्या पुराव्यांप्रमाणेच, काळाच्या ओघात आपलं व्यक्तिमत्त्व कसं बदलतं आहे, याचे सकारात्मक कल दाखवणारे काही आश्वासक पुरावे दिसून येत आहेत.
ही सध्याची तरुण पिढी सर्वाधिक आत्मकेंद्रित आहे, असं मानणाऱ्यांमध्ये जर कुणाचं नाव आघाडीवर असेल तर त्या आहेत जीन ट्वेंग. कॅलिफोर्नियाच्या सॅन दियेगो स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्रज्ञ असलेल्या ट्वेंग 15 वर्षांपासून या विषयावर अभ्यास करत आहेत.
बदलत्या संस्कृतीमुळे, विशेषतः गेल्या काही दशकांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्यावर जास्त लक्ष दिल्यामुळे आत्मकेंद्रीपणा वाढला आहे, असे ट्वेंग यांचं ठाम मत आहे. उदाहरणार्थ, आताची तरुण पिढी पालक आणि एकंदरीत समाजाला, सामाजिक कर्तव्यांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या यशाला अधिक महत्त्व देते, असं त्या मानतात.
दुसरा एक संभाव्य सिद्धांत म्हणजे "Self-esteem movement". यामागील विचार असा आहे की, अमली पदार्थांच्या व्यसनापासून हिंसाचारापर्यंत, समाजातील अनेक समस्यांचं मूळ हे लोकांना स्वतःविषयी असलेल्या न्यून भावनेमध्ये दडलेले असते.
दुर्दैवाने हा विचार बरोबर नाही असं, दर्शवणारी असंख्य संशोधनं झाली आहेत. इतकंच नव्हे तर, 50 Great Myths of Popular Psychology या पुस्तकाले 33वं मिथक असंच आहे की, "स्वतःविषयी फारसं चांगलं मत नसणं, हे मानसिक समस्यांचं प्रमुख कारण आहे."
असं असलं तरी, विशेषतः 80 आणि 90च्या दशकात झालेल्या या चळवळीमुळे, तरुणांचा नकारात्मक अभिप्रायापासून बचाव करण्याचं प्रयत्न करण्यात आले. उदाहरणार्थ, तरुणांच्या स्वतःविषयीच्या प्रतिमेला धक्का बसू नये, म्हणून त्यांना परीक्षेत चांगलेच गुण, श्रेणी मिळतील याची खबरदारी घेतली जाऊ लागली. त्याच वेळी स्वतःविषयी प्रेमाची भावना आणि आपण कुणीतरी "खास" आहोत, अशी भावना त्यांच्यामध्ये रुजावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
अलीकडेच न्यूयॉर्क या मॅगझीन लिहिताना, जेसी सिंगल यांनी Self-esteem movementने, विशेषतः अमेरिकी शाळांमध्ये कशा प्रकारे जम बसवला आहे, त्याचं वर्णन केलं आहे. या शाळांमध्ये बॉल खेळण्यासारखे उपक्रम राबवले जातात, "एक मुलगा दुसऱ्या मुलाकडे बॉल फेकतो आणि त्याचवेळी त्याची प्रशंसा करतो - मला तुझा शर्ट आवडला. त्यानंतर तो दुसऱ्याकडे चेंडू भिरकावतो आणि त्याची प्रशंसा करतो - तू फुटबॉल चांगला खेळतोस. अशा प्रकारे या चांगल्या भावना बॉलबरोबर, मागेपुढे-पुढेमागे अशा रीतीने संपूर्ण खोलीमध्ये पसरतात."
हे सांस्कृतिक प्रवाह पाहता, आजच्या तरुणांच्या स्वतःबद्दल काही विशेष कल्पना असण्याची आणि त्यासाठी आपली प्रशंसा व्हावी, अशी त्यांची मनोमन इच्छा असण्याची शक्यता नक्कीच आहे.
जीन ट्वेंग यांचा सिद्धांत हा बराचसा "Narcissistic Personality Inventory"वर आधारित आहे. ही एक प्रकारची चाचणी आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांच्याबद्दलचे 40 प्रश्न विचारले जातात, त्यांच्यापुढे दोन पर्याय असतात - एक उत्तर आत्मकेंद्रितपणा दर्शवणारं असते ("मी यशस्वी होईल") आणि दुसरं आत्मकेंद्रितपणा नसल्याचं दर्शवतं ("मी यशाची फार चिंता करत नाही").
ट्वेंगच्या संशोधनातून असं दिसलं की, गेल्या काही काळापासून अमेरिकन कॉलेजमधल्या तरुणांमध्ये या प्रश्नांच्या होकारार्थी उत्तरांचे प्रमाण वाढलं आहे. उदाहरणार्थ, या संशोधनातून असं आढळून आलं की, 1998 पेक्षा 2009 मध्ये पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोन-तृतियांश विद्यार्थी अधिक आत्मकेंद्रित होते.
2013 रिव्ह्यू मध्ये आपल्या भूमिकेचा सारांश मांडताना ट्वेंग यांनी निष्कर्ष काढला की, "या क्षणाला आजची तरुण पिढी (1980 नंतर जन्मलेली) - निदान पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत - 'आपल्या'पेक्षा 'माझा' विचार करणारी आहे, या दृष्टिकोनाला आधार देणारे पुरावेही आहेत."
काही जणांना हे मत मान्य नाही. त्यापैकीच एक आहेत वॉर्सेस्टरमधील क्लार्क युनिव्हर्सिटीचे जेफ्री अर्नेट. अमेरिकेतील महाविद्यालयीन तरुण हे काही सर्व तरुणांचं प्रतिनिधित्व करत नाहीत, असा त्यांचा युक्तिवाद आहे. तसंच Narcissistic Personality Inventory या चाचणीद्वारे खरंच आत्मकेंद्रितपणा मोजला जातो का, याबद्दलही त्यांना शंका वाटते.
उदाहरणार्थ, या चाचणीमध्ये ज्या गुणधर्माला आत्मकेंद्रितपणा असं ठरवण्यात आलं आहे, तो कधीकधी साधा, निरुपद्रवी आत्मविश्वास असू शकतो - आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी "मी ठाम आहे" विरुद्ध "मी अधिक ठाम असायला हवं" या दोन पर्यायी उत्तरांचं हे उदाहरण दिलं आहे.
तरुण पिढीत सामाजिक कामांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची शक्यता अधिक असते आणि ते विविधतेबद्दल अधिक सहिष्णू असतात, या तथ्याकडे निर्देश करून अर्नेट म्हणतात की, त्यांचा दृष्टिकोन हा ट्वेंगच्या दृष्टिकोनाच्या एकदम विरुद्ध आहे. ते सांगतात की आजची उदयोन्मुख प्रौढ पिढी केवळ कमी आत्मकेंद्रित आहे, असंच नाही तर, "ही विलक्षणरीत्या निस्वार्थी पिढी आहे. जग सुधारण्यासाठी ही पिढी अतिशय आश्वासक आहे."
वास्तविक पाहता हे खरं असल्याचे चढत्या श्रेणीने पुरावे मिळत आहेत. Psychological Science जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार असलेल्या संशोधनाचे उदाहरण घ्या. व्यक्तिमत्त्व तज्ज्ञ ब्रेन्ट रॉबर्ट्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन अमेरिकन विद्यापीठांमधील 1990चे दशक, 2000चे दशक आणि 2010चे दशक, अशा तीन निरनिराळ्या कालखंडांमधील 50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या अनेक तुकड्यांच्या Narcissism Inventoryची तुलना केली. पूर्वीच्या इतर बहुसंख्य संशोधनांप्रमाणे रॉबर्टच्या पथकाने केवळ थेट आत्मकेंद्रितपणाचा विचार केला नाही, तर आत्मप्रौढी, अधिकार आणि नेतृत्व असे इतर संबंधित गुणधर्मही विचारात घेतले.
निरनिराळ्या पिढ्यांमधील विद्यार्थी विधानांचा अर्थ निरनिराळ्या पद्धतीने लावू शकतात, हा बदलसुद्धा त्यांनी लक्षात घेतला. मात्र, संशोधकांनी डाटाचे लहान भाग केले तेव्हा त्यांना समान सूत्र आढळले : ९०च्या दशकापासून तरुणांमध्ये आत्मकेंद्रितपणा कमी होत आहे.
प्रेस रिलीजमध्ये रॉबर्टने आणखी एक गोष्ट नमूद केली की जुन्या पिढ्या त्यांचे स्वतःचा, तारुण्यातील आत्मकेंद्रितपणा विसरले असतील; हा वयानुसार कमी होत जातो. "आपली स्मरणशक्ती सदोष असते," ते म्हणतात, "त्यामुळे आपल्याला हे आठवत नाही की आपण त्या वयाचे होते तेव्हा आपणसुद्धा आत्मकेंद्रीच होतो."
एका अभ्यासानुसार 90च्या दशकापासून तरुणांमधील आत्मकेंद्रितपणा कमी होत आहे.
न्यूझीलंडमध्ये नुकतेच प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानेसुद्धा या सुरात सूर मिसळला आहे. या संशोधनातसुद्धा मिलेनियल्समध्ये आत्मकेंद्रितपणाचा एक पैलू असलेल्या वाढत्या अधिकारांचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. आश्चर्य म्हणजे, त्यामध्ये असे सुचवण्यात आलंय की तरुणांमध्ये अधिकाराची वाढलेली जाणीव हा विकासाचा परिणाम आहे, आणि तो दोन पिढ्यांमध्ये समान नसतो.
दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं तर आपलं वय वाढत जातं तशी आपले अधिकार कमी असल्याची जाणीव आपल्याला होत जाते.
ट्वेंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खात्री पटली आहे की आत्मकेंद्रितपणा वाढीला लागला आहे. इतर गोष्टींमध्ये त्यांना असा शोध लागला आहे की, 80च्या दशकातील तुलनेत अलीकडील पॉप गाण्यांमध्ये स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासंबंधी शब्दांचा वापर वाढला आहे. आणि ६०च्या दशकापासून अलीकडील पुस्तकांमध्ये "मी कुणीतरी स्पेशल आहे" अशांसारख्या व्यक्तिकेंद्री शब्दांचा आणि शब्दप्रयोगांचा वापर वाढतो आहे.
त्यांना अशीही शंका आहे की या व्यक्तिवादाच्या संस्कृतीमुळेच हल्ली पालक मुलांचे नामकरण करताना सामान्य नावांचा विचार करत नाहीत.
सोशल मीडियाचा वाढता वापर, सेल्फी आणि तुम्ही काय करत आहात, काय विचार करत आहात आणि तुम्हाला काय वाटत आहे, त्याबाबत सातत्याने इतरांना अपडेट करत राहण्याची सवय या पार्श्वभूमीवर विद्वानांचे वादविवाद झडत आहेत. तंत्रज्ञानात्मक आणि सांस्कृतिक बदलांमुळे आत्मप्रौढी आणि आत्मकेंद्रितपणाला खतपाणी मिळत असल्याचा निष्कर्ष नाकारता येत नाही.
ट्वेंग यांनी निश्चितपणे असा संबंध जोडला आहे. 2013 साली 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी सोशल मीडियाला "Narcissism enabler" म्हणजे स्वप्रशंसेला प्रोत्साहन देणारं म्हटलं होते. पण सोशल मीडिया खरंच आत्मकेंद्रीपणाला कारणीभूत आहे, हे दर्शवण्यासाठी फारसा पुरावा नाही हेही त्यांनी मान्य केले होते.
खरोखर, गोळा केलेल्या डेटावरून असं लक्षात येत होतं की, हो, आत्मकेंद्री लोक सेल्फी पोस्ट करण्याची शक्यता जास्त असते. पण याचा अर्थ असा नाही, की सेल्फी पोस्ट करणारे लोक आत्मकेंद्री असतात.
वास्तविक याचा पुरावा आहे की, तुम्ही जितके जास्त इतरांशी "सहमत" असता - विश्वासाने, मोकळेपणाने आणि मैत्रीने वागणारे - तितके तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असण्याची शक्यता जास्त असते.
आत्मकेंद्रितपणावर इतके वादविवाद होत आहेत, पण आपलं चारित्र्य सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करत असण्याची शक्यता असेल तर? खरंतर, त्याबद्दल चांगली बातमी आहे.
संशोधकांना हे माहीत आहे की, आपण अधिकाधिक हुशार होत आहोत, दर दशकाला आपला IQ सुमारे तीनने वाढत आहे.
न्यूझीलंडमधील अभ्यासक जेम्स फ्लिन यांनी सर्वप्रथम ही कल्पना मांडली. त्यांच्यावरून याला Flynn Effect असं म्हणतात. अनेक वर्षं वाढीव सुधारणा झाल्यामुळे 1930 पासून आजपर्यंत बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. असं का, या प्रश्नाच्या उत्तरात संसर्गजन्य आजारांमध्ये झालेली घट ते अधिक चांगल्या शाळा, अशी अनेक स्पष्टीकरणं आढळतील. पण असाच परिणाम आपल्या वैयक्तिक गुणधर्मांना आकार मिळतानाही होत आहे का, याबद्दल संशोधकांमध्ये कुतूहल आहे.
असं घडत असावं, असे फिनलँडमध्ये या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात सुचवण्यात आलं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीमध्ये मार्कस जोकेला यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी 1962 ते 1976 या दरम्यान जन्माला आलेल्या सक्तीच्या सैन्यभरतीतील जवळपास 5 लाख सैनिकांच्या व्यक्तिमत्त्व डाटाचे विश्लेषण केले, हे सैनिक 18 किंवा 19 वर्षांचे असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती घेण्यात आली. जोकेला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असा अहवाल दिला की, काळानुसार पुढील तुकड्यांमध्ये समाजशीलता आणि अधिक उत्साही असण्यासारखे बहिर्मुखतेशी संबंधित आणि कर्तव्यदक्षता आणि यशप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे प्रामाणिकपणाशी संबंधित गुणधर्म जास्त आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना वाढत्या आत्मविश्वासाचा पुरावादेखील मिळाला आहे. हे संशोधन वाढत्या आत्मकेंद्रितपणावरील संशोधनाला दुजोरा देऊ शकतं, मात्र हा आत्मविश्वास निरोगी आहे की नाही, त्यावर ते अवलंबून आहे. फिनलँडमधील संशोधनातील डेटामधून तशी कुठलीच माहिती मिळत नाही.
असं दिसतंय की आजचे तरुण आधीच्या पिढीपेक्षा अधिक आत्मनिर्भर आहेत, हे जास्त खरं असावं. तुम्ही त्याकडे आत्मविश्वासाचे निरोगी लक्षण म्हणून पाहता, की तुम्हाला ते आत्मकेंद्रितपणाचं काळजी करण्यासारखे लक्षण वाटतं, यावरून या तरुण पिढीपेक्षाही तुमच्याबद्दल मानसिकतेवर अधिक प्रकाश पडतो.
(डॉ. ख्रिस्तियन जॅरेट ब्रिटीश सायकॉलॉजीकल सोसायटीच्या रिसर्च डायजेस्ट ब्लॉगचे संपादन करतात. त्यांचे पुढील पुस्तक पर्सनॉलॉजी हे २०१९मध्ये प्रकाशित होणार आहे)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)