सोशल : 'माझ्याकडे हाय प्रोफाईल डेटा नाही, मी फेसबुक वापरणार'

तुम्ही कोणत्या बॉलिवूड स्टार सारखे दिसता, तुम्ही किती वेळा प्रेमात पडला, तुमचा सर्वांत जवळचा मित्र कोण, अशा प्रकारच्या क्विझ तुम्ही फेसबुकवर खेळल्या असतील. वरवर ही क्विझ तुम्हाला अगदीच निरुपद्रवी वाटत असेल, पण यातून तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईलची माहिती कुणाला तरी देत असता आणि तुमची ही माहिती पुढे कशी वापरली जाणार हे तुम्हाला माहीत नसतं.

असाच काहीसा प्रकार सध्या वादात सापडलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीनं केला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकच्या युजर्सचा गैरवापर केल्यावरून डेटा रिसर्च कंपनी केंब्रिज अॅनालिटिका वादात सापडली आहे. यावरून जगभरातील सोशल मीडियाच विश्व ढवळून निघालं आहे. युजर्सनी आपली माहिती सुरक्षित कशी ठेवायची, हा आता कळीचा मुद्दा बनला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर झुकरबर्ग यांनी पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं आहे. "या प्रकरणात विश्वासघात झाला आहे," असं त्यांनी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

"तुमच्या डेटाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. जर आम्ही त्याचं संरक्षण करू शकलो नाही तर तुम्हाला सेवा देण्यास आम्ही पात्र नाही, असं समजू. मी फेसबुकची स्थापना केली, म्हणून या प्लॅटफॉर्मवर जे काही होईल, त्यासाठी मी जबाबदार आहे," असं ते म्हणाले.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, तुम्हाला फेसबुक किती सुरक्षित वाटतं? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया इथे देत आहोत.

धीरज बेळे लिहितात,"आम्ही सामान्य माणस आहोत, आमच्याकडे हाय प्रोफाईल डेटा नाही, त्यामुळे आम्हाला कोणतेही टेन्शन नाही. माझ्या डेटामध्ये काहीही इंपॉर्टंट नाही. मी फेसबुकचा वापर करणार."

मकरंद ननावरे यांनी काहीसी मिश्कील प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "कसला डेटा? मला पाणीपुरी आवडते हे माहीत करून कोणाला काय फायदा?"

पण त्यांना सविस्तर उत्तर देत कपिल कांबळे यांनी कमेंट दिली आहे. ते लिहितात, "याचा नक्कीच फायदा आहे. तुमच्यासारखे लाखो असतील ज्यांना पाणीपुरी आवडते. त्यांच्या एकत्रित डेटा, जे पाणीपुरी बनवतात त्यांना पुरवला जातो."

भरत माने तर फेसबुकच्या इतक्या प्रेमात आहेत की, त्यांनी सरळ 'लुट गये हम तेरी मोहब्बत में' असं लिहून टाकलंय.

शाम ठाणेदार यांनाही असंच काहीसं वाटतं. "फेसबुक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. फेसबुकवर कितीही आरोप झाले तरी कोणी स्वतःहून फेसबुक डिलीट करेल असं वाटत नाही."

"आता डिलीट करून फायदा नाही. जी माहिती जायची ती गेलीये," असं मत मांडलं आहे गौरव पवार यांनी.

तर आपली कोणती माहिती फेसबुकवर द्यायची हे आपण ठरवावं असं भूषण खटावकर यांना वाटतं.

अमोल तेली यांचं म्हणणं आहे की, "जी लोक EVM मध्ये घोटाळा करू शकतात, ते फेसबुक ट्विटरवर काहीही करू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)