'दुबईत नोकरी मिळेल अशा अपेक्षेने गेलो आणि पोहोचलो इराकमध्ये'

    • Author, रविंदर सिंह रॉबिन
    • Role, बीबीसी हिंदी, अमृतसर

इराकमधल्या मोसूलच्या हत्याकांडातून बचावलेल्या हरजित सिंग एकमेव भारतीयानं सांगितली सत्य परिस्थिती.

गावात नोकरी मिळत नाही, दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत. त्यामुळेच हरजित सिंग यांनी इराकमध्ये नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इस्लामिक स्टेटनं त्या देशावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या ताब्यातून सुटून भारतात जिवंत परतलेले ते एकमेव आहेत.

शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या हरजित यांना भारतात नोकरी मिळणं कठीण आहे, पण आखाती देशात नोकरीची संधी आहे. शिवाय, तेथून महिन्याला किमान 20 हजार रुपये घरी पाठवणं शक्य होईल. त्यामुळे त्यांनी अखेर आई-वडिलांकडून नोकरीसाठी परदेशी जाण्याची परवानगी मिळवलीच.

आपल्याला दुबईत नोकरी मिळेल अशी त्याला अपेक्षा होती, प्रत्यक्षात, ते पोहोचले इराकमध्ये. दुबईमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या एका माहितीतल्या ट्रॅव्हल एजंटनं त्यांना इराकमध्ये जाण्यास प्रवृत्त केलं. हरजित यांच्या काही मित्रांनी त्यापूर्वी इराकमध्ये काम केलं होतं. हरजित यांनी दुबईला जाण्यासाठी सुमारे दीड लाखांचं कर्ज काढलं होतं, असं सांगितलं.

इराकमध्ये गेल्यावर तिथल्या कामाचं स्वरूप आणि पगार पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला.

सुरुवातीचे काही महिने पगार नियमित मिळाला. परंतु नंतर त्यात अनियमितता आली. त्यांना एका बांधकाम कंपनीत मजुराचं काम मिळालं होतं.

त्यांनी सांगितलं की, इराकमध्ये त्यांच्यासारख्या कामगारांना कारखान्याच्या आवाराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. घरी पाठवण्यासाठी कारखान्याबाहेर जायचे असेल तर विशिष्ट ओळखपत्र दिले जात असे. तसंच, वेर्स्टन युनियनमध्ये जाण्यासाठी सोबत एखादी व्यक्तीही दिली जायची.

त्यांना कोणत्याही बातम्या कळण्याची सोय नव्हती. कधीतरी बाहेर संचारबंदी असल्याचं कळायचं किंवा बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येत.

हरजित सिंग यांच्या मते, पंजाबमध्ये फार स्थिती बदलेली नाही. अजूनही तरुणांना धोका पत्करून बाहेर जाण्याची तयारी असल्याचं ते सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)