'आमचं इस्लामिक स्टेटने अपहरण केलंय, हा माझा शेवटचा कॉल असेल'

    • Author, सुखचरण प्रीत
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बर्नालाहून

"प्रीतपाल यांनी त्या दिवशी कसबसं मला फोन केला. त्यांना आणि इतर भारतीयांना पकडून एका कारखान्यात ठेवण्यात आलं होतं. माझं काळीज चर्र झालं होतं. मनात भीती वाटत होती. ते मला म्हणाले, हा माझा शेवटचा कॉल असेल. मी आता पुन्हा त्यांचा आवाज ऐकू शकणार नाही, या विचारानेच माझी घालमेल झाली."

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील धुरी शहरातील घरात प्रीतपाल शर्मा यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. 2014ला ज्या 39 भारतीयांचं आयएसआयएसने अपहरण केलं होते, त्यांची हत्या झाली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत मंगळवारी दिली.

स्वराज यांचं निवेदन धुरी शहरात पोहोचलं ते धक्का देतच.

या 39 जणांत प्रीतपाल यांचाही समावेश होता. शर्मा यांची घरची परिस्थिती यथातथा असल्याने एका एजंटच्या मदतीने त्यांनी 2011ला इराक गाठलं होतं. घरची परिस्थिती सुधारावी, म्हणून प्रीतपाल इराकला गेले. पण पुढं काय वाढून ठेवलं आहे, याची त्यांना कल्पना नव्हती.

निम्न मध्यमवर्गीय वस्तीत शर्मा कुटुंबीयांचं घर आहे. इराकमधल्या त्या भारतीयांच्या मृत्यूची माहिती सर्वत्र झालेली असल्यानं पत्रकार घरी येतील, याची कल्पना शर्मा यांचा मुलगा नीरजला होती. घरातही सगळे टीव्ही पाहात होते. प्रीतपाल यांच्या पत्नींचे, राज राणी यांचे अश्रू थांबतच नव्हते. नीरजनं स्वत:चे अश्रू कसेबसे रोखून धरलेत. त्यांची मुलगी कॉलेजमध्ये गेली होती. तिला अजून ही बातमी कळवण्यात आलेली नव्हती.

शर्मा यांच्या घरची स्थिती ही अशी ह्रदयद्रावक होती. कुणीही बोलण्याची मानसिक स्थितीमध्ये नव्हते.

राज राणी यांना बोलण्याच्या स्थिती येण्यासाठी बराच वेळ जावा लागला.

प्रीतपाल इराकला कसे गेले, हे त्या सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, "माझे पती इलेक्ट्रिशिअन होते. घरची परिस्थिती बरी नव्हती. एका एजंट मार्फत त्यांना 2011मध्ये इराकला जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यानी दोन लाख रुपये जमवले होते."

इराकला गेल्यावर प्रीतपाल 2014पर्यंत नियमित पैसे पाठवत होते. 2014मध्येच इराकच्या मोसूल या शहरातून त्यांचं इस्लामिक स्टेटनं अपहरण केलं.

पकडण्यात आल्यावरही त्यांनी एकदा फोन केला आणि तो अखेरचाच ठरला, त्या सांगत होत्या. राज राणी यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता.

राज राणी यांनी ते संभाषण आजही स्पष्टपणे आठवते. "ते म्हणाले होते की हा बहुधा त्यांचा शेवटचा फोन असेल आणि तसंच झालं."

थोड्या वेळानं त्या म्हणाल्या, "त्यांना एका कारखान्यात ठेवण्यात आलं होतं."

मुलाचं शिक्षण थांबलं

त्या फोननंतर राज राणी यांना सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागले. त्यात त्यांचे सुमारे दीड लाख रुपये खर्च झाले.

राज राणी म्हणतात, "सरकारला जर आधीपासून त्यांच्याविषयी माहिती होतं, तर त्यांनी आम्हाला तेव्हाच कल्पना द्यायाला हवी होती. म्हणजे आम्हाला एवढा त्रास झाला नसता."

प्रीतपाल इराकला गेले तेव्हा नीरजचं शिक्षण सुरू होतं. ते म्हणतात, "वडील गायब झाल्यावर माझं शिक्षण थांबलं. कारण घर चालवण्यासाठी मला मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

नीरज स्वत:च्या कुटुंबाविषयी बोलतानाच त्या सर्व 39 जणांच्या कुटुंबीयांविषयी बोलू लागतात.

डीएनए टेस्ट

इराकमध्ये कोणाचे वडील गेले तर कोणाचा भाऊ गेला. ते सगळे तिथे नोकरीसाठी गेले होते. नीरज पुढं आता भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

कुठे नोकरी मिळाली तर आमचं जगणं शक्य होईल, असं नीरज म्हणतात.

या कुटुंबाशी बोलण्यासाठी स्थानिक नायब तहसीलदार करमजीत सिंह घरी पोहोचले. त्यांनीच प्रीतपाल शर्मा यांच्या निधनाची खात्री करण्यासाठी डीएनएचे नमुने इराकला पाठवले होते.

ते म्हणाले, "परिवाराच्या मागणीनुसार इराकहून त्यांच्या अस्थी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय कुटुंबातल्या एकाला नोकरी मिळावी यासाठी शिफारसही करण्यात आली आहे."

हे बोलणं सुरू असेपर्यंत प्रीतपाल यांची मुलगी दीक्षा कॉलेजमधून परतली नव्हती.

घरच्यांना तिला ही बातमी सांगण्याची इच्छा नाही. मुलीली ही बातमी कशी कळवायची ही तगमग त्यांच्या नजरेत दिसत होती.

पण ही बातमी कळवण्यास उशीर केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याविषयीची नाराजी मात्र त्यांच्या बोलण्यात डोकावते.

(परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इराकमधील 39 भारतीयांच्या मृत्यूची माहिती संसदेत जाहीर केल्यावर मंगळवारीच बीबीसी हिंदीसाठी सुखचरण प्रीत यांनी शर्मा कुटुंबियांची भेट घेऊन केलेलं हे वार्तांकन)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)