You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिंगायतांचा स्वतंत्र धर्म : महाराष्ट्राच्या राजकारणावर किती परिणाम करेल?
- Author, मोहसीन मुल्ला, स्वाती पाटील-राजगोळकर
- Role, बीबीसी मराठी
कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही असंच पाऊल उचलावं, यासाठी लिंगायत समाजाच्या वतीने आंदोलन तीव्र होणार आहे. कर्नाटकशी लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाभागात हा मुद्दा राजकारणावर प्रभाव टाकेल अशी स्थिती आहे.
लिंगायत समाजाच्या या मागणीला धार्मिक संदर्भांना जोडून राजकीय, आर्थिक, सामाजिक पैलूही आहेत.
"कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता दिल्याने आमच्या आंदोलनाला आणखी बळ आलंम आहे," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरलाताई पाटील यांनी व्यक्त केली.
कर्नाटकात लिंगायत समाजाचं राजकीय प्राबल्य आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वच भागात लिंगायत समाज विखुरला आहे. पण कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत लिंगायत समाजाची लोकसंख्या जास्त आहे. सोलापुरातील 11पैकी 6 विधानसभा मतदार संघात लिंगायत समाजाची भूमिका महत्त्वाची ठरते.
नामांतरावरून वाद
सोलापूर विद्यापीठाचं नामांतर पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ करण्यात यावं असा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लिंगायत समाजाने सिद्धेश्वर विद्यापीठ असं नामकरण करण्याची मागणी केली होती. हा मुद्दा आता सोलापुरात राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला आहे, असं पत्रकार आणि शरण साहित्याचे अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी सांगितला.
विश्वलिंगायत महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजशेखर तंबाखे म्हणाले, "औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर इथं आमचं आंदोलन नियोजित आहे. 13 मे 2014ला केंद्र सरकारने स्वतंत्र धर्माची मागणी नाकारणारं पत्र पाठवलं होतं. हा दाखला देत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आमची मागणी नाकारली. पण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नेमण्यात आलेल्या 3 सदस्यांच्या समितीने लिंगायत समाजाला स्वंत्रत धर्माची मान्यता देण्यासाठी शिफारस करावी, अशी सूचना केली आहे."
आर्थिक कारणं
धार्मिक अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या सवलती हा महत्त्वाचा मुद्दा या मागणीच्या मागे आहे. आरक्षणाच्या सवलतींचाही विषय आहे. तंबाखे म्हणाले, "लिंगायत समाजातील काही उपजाती ओबीसीमध्ये आहेत. पण जन्माच्या दाखल्यावर लिंगायत अशी नोंद असेल तर या सवलती मिळताना अडचणी येतात. सरकारने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण स्वतंत्र धर्माच्या मागणीमागे हा एक मुद्दा आहे."
धार्मिक संदर्भ
जैन धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाल्यानंतर लिंगायत समाजातून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी जास्त प्रकर्षाने पुढं येऊ लागली, असं सोलापुरातील पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी सांगितलं. भद्रेश्वरमठ म्हणाले, "12व्या शतकात बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. स्वतंत्र धर्माचे सर्व निकष लिंगायत पूर्ण करतो."
वैदिक परंपरांचा अतिरेक होऊ लागल्याने ही मागणी जास्त तीव्रतेने पुढे आल्याचं तंबाखे सांगतात. "स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाल्यानंतर बसवेश्वर यांचं कार्य जगापुढं नेण्याची संधी मिळेल असं ते म्हणाले. बसवेश्वरांचे विचार तरुणांना प्रभावित करत आहेत, त्यामुळेच आमच्या आंदोलनात तरुणांची संख्या जास्त आहे", असं ते म्हणाले
कलबुर्गी यांच्या हत्येमुळे अस्वस्थता
साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे, असं भद्रेश्वरमठ म्हणाले. कलबुर्गी यांनी वचनसाहित्यांचा मोठा अभ्यास केला होता. हे साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात कलबुर्गी यांचा फार मोठा वाटा होता. त्यांच्या खुनामुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली, असं ते म्हणतात.
पहिलं आंदोलन लातूरमध्ये
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, यासाठी पहिलं आंदोलन गेल्या वर्षी लातूरमध्ये 3 सप्टेंबरला झालं होतं. त्यानंतर सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद अशा विविध भागांतून ही मोठे मोर्चे काढले होते.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)