You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शिवडे आय अॅम सॉरी' : हे प्रेम आहे की मनोविकार?
- Author, प्राजक्ता ढेकळे आणि संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठीसाठी
प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातल्या एका तरुणानं केलेल्या प्रकारनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
निलेश खेडेकर या तरुणानं प्रेयसीची माफी मागण्यासाठी 'शिवडे आय एम सॉरी'चे एक दोन नव्हे... तर तब्बल '३०० फलक' इथल्या पिंपळे सौदागर, वाकड आणि रहाटणी परिसरात लावले होते.
माध्यमांचं याकडे लक्ष गेल्यानं या प्रकारबद्दल सगळीकडेच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, हा मानसिक विकृतीचा प्रकार असल्याचं मत मनोविकार तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
'फिल्मी स्टाईल'नं अतिरंजितपणाकरून सगळ्यांचं लक्ष वेधण्याची ही वृत्ती असल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
प्रेयसीची माफी मागण्यासाठी या तरुणानं असं पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये याबद्दल चर्चा सुरू झाली.
स्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. इथल्या वाकड पोलीस ठाण्यानं या प्रकरणी तपास सुरू केला.
या प्रकरणाचा तपास करणारे वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश माने सांगतात,"'शिवडे आय अॅम सॉरी....' या आशयाची पहिली बातमी दैनिक पुढारीमध्ये पहिल्यांदा वाचली. त्या दिवशी माझी सुट्टी होती.
मात्र तरीही घटनेच्या चौकशीचे मी आदेश दिले. नेमके या आशयाचे पोस्टर कुणी लावले याचा शोध घेण्यास सुरवाता केली. मात्र पोस्टरवर कुठल्याही व्यक्तीचं नाव नव्हतं, ब्रॅंडचं नाव नव्हतं. त्यामुळे आम्हाला हे नेमके कुणी केलं आणि हे काय आहे समजत नव्हतं."
माने पुढे सांगतात, "मग आम्ही शहरातल्या पोस्टर तयार करून देणाऱ्या दुकानांमध्ये चौकशी करायला सुरवात केली.
तेव्हा आम्हाला हे पोस्टर बनवून घेणाऱ्या आदित्य शिंदे या तरुणाची माहिती मिळाली. आदित्य शिंदेला ताब्यात घेऊन त्याच्या चौकशी केली असता निलेश खेडेकरचा हा प्रकार समोर आला.
निलेश खेडेकरची मैत्रीण वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होती. तिची समजूत काढण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचं निलेश खेडेकरनं चौकशी दरम्यान सांगितलं."
२५ वर्षीय निलेश खेडेकरनं आपला मित्र आदित्य शिंदेच्या मदतीनं छोटे-मोठे असे ३०० फलक बनवून घेतले. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री पाच-सहा कामगाराच्या मदतीनं आदित्य शिंदेनं ते फलक सगळीकडे लावले.
माने सांगतात, "मूळ घटना काय आहे हे तपासून त्याची माहिती काढून देण्याचं काम आमचं होतं. घटनेचा तपास करून त्याची सर्व माहिती आम्ही पिंपर-चिंचवड महापालिकेच्या 'आकाश चिन्ह' या विभागाकडे दिली आहे.
आता यावर महापालिकेच्या आदेशानुसार आम्ही पुढची कारवाई करू, पण अजून महापालिकेकडून कारवाईचे आदेश आले नाहीत."
निलेश खेडेकर नेमका आहे तरी कोण?
पंचवीस वर्षीय निलेश खेडेकर हा मूळचा पुण्याच्या घोरपडे पेठेतला आहे. निलेशचा स्वतःचा व्यवसाय आहे. तसंच तो एमबीएचं शिक्षण घेत आहे.
या प्रकरणाविषयी विचारले असता निलेश खेडेकर म्हणतो, "ही प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन असल्यामुळे मी या विषयावर कोणेतीही प्रतिक्रिया देण्यास इच्छुक नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मी या विषयावर सविस्तर बोलेन."
मात्र या घटनेविषयी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणतात, "जोपर्यंत महापालिका कोणत्याही कारवाईचे आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही."
'समोरच्याला लाजवण्याचा मनोविकार'
एखाद्या तरुणानं मैत्रिणीशी वाद झाल्यानंतर अशा स्वरूपाचं पाऊल का उचललं असावं? यासाठी त्याची कोणती मनोवस्था कारणीभूत ठरली असावी? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत बीबीसीने मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी बातचीत केली.
बर्वे सांगतात, "हा एक प्रकारचा मनोविकार आहे. हल्लीच्या तरुण पिढीला कोणत्याही प्रकारचा नकार किंवा विरोध सहन होत नाही. त्यांना त्यांच्या मनासारखं झालं नाही, तर ते त्याविरुद्ध पाऊल उचलतात. अशावेळी ते समोरच्याला लाजिरवाणं वाटेल असा प्रकार करू शकतात. जेणेकरुन त्यांची बाजू त्यांना समोरच्याला ठासून सांगता येईल असं त्यांना वाटतं."
'फिल्मीस्टाईलने अतिरंजितपणा करणे'
बर्वे याबाबत अधिक माहिती देताना पुढे सांगतात, "हल्लीच्या तरुणांवर सिनेक्षेत्राचा, सिनेमाचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यामुळे एखादी गोष्ट व्यक्त करण्यासाठी ते फिल्मीस्टाईलनं अतिरंजितपणा करताना दिसतात. अशावेळी त्यांना परिणामांची चिंता नसते. समोरच्यावर याचा काय परिणाम होईल याकडेही त्यांचं लक्ष नसतं."
तरुणाईमध्ये अशा मनोविकारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याबाबत उदाहरण देताना बर्वे सांगतात की, "१०-१२ वर्षांपूर्वी माझ्याकडे एका मुलाची केस आली होती. त्याला मुलीनं नकार दिल्यानं त्यानं त्या मुलीचं भलत्याच मुलाशी लग्न झाल्याच्या पत्रिका तयार करून वाटल्या होत्या. पण, त्यानंतर त्या मुलाला घडलेल्या प्रकाराचं गांभीर्य कळलं आणि त्यानं माफीही मागितली."अशावेळी तरुणांनी समुपदेशनाचा आधार घ्यावा. त्यांना एखादं पाऊल उचलावं वाटत असेल, तर ते उचलण्यापूर्वी त्यांनी पालक, मित्र, शिक्षक यांच्याशी चर्चा करावी. तसंच, समुपदेशकांची मदत घेण्यासही हरकत नाही. असंही मनोविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)