You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केरळ पूर: 'अंत्यसंस्कारासाठी आईवडिलांचा मृतदेहही मिळाला नाही'
- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
"मॅडम माझ्या नवऱ्याचं नुकतंच ट्रान्सप्लान्टचं ऑपरेशन झालं आहे. आम्हाला सुरक्षित नेण्यासाठी तुम्ही मदत करू शकता का?" ...पत्रकार संकटकाळी आधार म्हणून धावून आला होता.
नैसर्गिक आपत्तीने वेढलेल्या केरळमध्ये मी गेल्या एक आठवड्यापासून वार्तांकन करतेय. मी जेव्हा वार्तांकन करायला सुरुवात केली तेव्हा एक दिवस माझ्यावरच कोणाला वाचवण्याची वेळ येईल याची मला कल्पना नव्हती.
साठीच्या वयातली एका महिलेनं माझ्याकडे मदत मागितली. मी तिचे डोळे पुसले आणि तिला मिठी मारली. "मी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे आई, काळजी करू नका, आपण सुरक्षित बाहेर पडू," मी म्हणाले.
पण स्थानिक आमदारानं मला सांगितलं की, "सध्यातरी त्या रुग्णाला वाचवणं शक्य होणार नाही. कारण माझ्या आणि शेजारच्या भागातही पुराचं पाणी घुसलं आहे. त्यामुळे सध्या हे सातमजली हॉटेल सोडू नका नाही कारण लोकांची निवाऱ्यासाठी गर्दी केलेल्या बचाव शिबिरांमध्ये जाण्याऐवजी इथेच राहणं सोयीस्कर होईल."
"तुमचं हॉटेल हे आता एका बेटासारखं झालं आहे. आम्ही तुम्हाला लगेच वाचवू शकत नाही. पण तुमच्यापर्यंत काहीतरी अन्न पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू," अशा शब्दांत एर्नाकुलमच्या आमदार हिबी एडन यांनी बचावकार्यात व्यग्र असतानाही मला धीर देण्याचा प्रयत्न केला.
सूर्योदयाची प्रतीक्षा
माझ्या हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा आता कमी होत होता आणि तळघरात पाणी साचलं होतं. पाणी कमी होऊन ते पहिल्या मजल्यावर शिरू नये यासाठी सगळेजण प्रार्थना करत होते.
"पिण्याचं पाणी अतिशय कमी आहे. आपल्या हॉटेलच्या बाजूला असलेल्या बचाव शिबिरातसुद्धा पाणी कमी आहे. आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही," असं आमच्या मॅनेजरने आम्हाला सांगितलं.
आम्ही आता पाऊस थांबण्याची आणि सुर्योदयाची वाट पाहत होतो.
गेल्या तीन दिवसांपासून लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आवाज ऐकते आहे, लोकांना हवाई मार्गानं वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर येत आहेत. अग्निशमन दलाच्या बोटीतून लोकांना नेण्यात येत आहे. या आवाजामुळे मला मध्यरात्री जाग येते. हजारो लोक झगडत आहे. मदतीसाठी याचना करणारे लोक मला दिसत आहेत.
वार्तांकनाच्या पहिल्या दिवशी मी इडुक्की येथील पीडितांची भेट घेतली. हा केरळमधला डोंगराळ भाग आहे आणि तिथे भूस्ख्लनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसंच स्थानिक चर्चमध्ये असलेल्या बचाव शिबिरालाही भेट दिली. आईवडील गमावलेली मुलं, म्हातारपणीचा एकमेव आधार असलेलं घर गमावलेली माणसं, झालेल्या नुकसानामुळे शोकमग्न झालेली अनेक माणसं अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांनी मला काहीही विचारलं नाही. पण त्यांचा चेहरा मला अस्वस्थ करत होता. त्यांचं सांत्वन करायला माझ्याकडे शब्द नव्हते.
सली नावाची एक पीडित माझ्याशी बोलली. "दरवर्षी इथे मुसळधार पाऊस पडतो आणि भूस्ख्लनसुद्धा होतं. माझा जन्म इडुक्कीला झाला, मी तिथेच वाढले. मी ढगफुटी होतांनाही पाहिलं आहे. पण यावेळी माझे आईवडील घरातच अडकून राहिले. भूस्खल्न झाल्यामुळे संपूर्ण घरच त्यांच्यावर कोसळलं आणि ते गंभीर जखमी झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी मला त्यांचे मृतदेहसुद्धा मिळाले नाही," हे सांगताना सलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
अभूतपूर्व पूर
दोन दिवस प्रभावित क्षेत्रात फिरल्यानंतर तिसऱ्या दिवशी कोचीन शहरात आले. इडुक्की येथे इंटरनेट नव्हतं. त्यामुळे माझा माझ्या ऑफिसशी संपर्क तुटला होता. मी त्यांना बातम्या पाठवल्या नव्हत्या.
तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात इडुक्कीचं छायाचित्र आलं होतं. मी जिथं दोन दिवस होते तिथं भूस्खलन झालं होतं.
मी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलचा संपर्क पूर्णपणे तुटला होता आणि मला कळलं की कोचीन विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
मी हॉटेलबाहेर आले. तिथून मी काही पत्रकारांना आणि पर्यावरणतज्ज्ञांना भेटायला बाहेर पडले. त्यांच्याकडून या प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठीच मी बाहेर पडले होते. बाहेर पडताच त्या भागात पाणी शिरलेलं मला दिसलं. कार पुढे जात आहे की नाही याचा मी अंदाज घेतला. कार जात होती. मग मी माझ्या नियोजित भेटी उरकण्याचा विचार केला.
या काळात मला दिसत होतं की काहीतरी भयानक गोष्टी घडत आहेत. कंपनीपदी मेट्रो स्टेशन पुराच्या पाण्यानं भरलं होतं मी ती माहिती माझ्या कार्यालयाला कळवली. गेल्या 90 वर्षांमध्ये कोचीननं पहिल्यांदाच पूर पाहिला होता त्यामुळे या परिस्थितीचा सामना कसा करावा याचं उत्तर कोचीनवासियांकडं नव्हतं.
श्रीमंत लोक त्यांची घरं सोडण्यास तयार नाहीत. त्यांना त्यांच्या जीवापेक्षा मालमत्तेची जास्त काळजी आहे. आम्ही त्यांची समजूत काढू शकलो नाही, बचाव कार्यात सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्यानं मला सांगितलं.
बचाव कार्यातल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कडेवर मुलांना घेतलं आणि नायलॉन दोरीच्या साहाय्याने ते जमिनीकडं येताना दिसले. आईकडे जाण्यासाठी ही मुलं व्याकूळ होऊन रडू लागली होती. काही म्हातारे लोक मला दिसले. ते म्हणाले आम्ही आमचा जीव वाचवून तिथून निघालो पण आम्हाला आमची औषधं घेता आली नाहीत.
नागरिकांना जबर धक्का
मी जेव्हा हॉटेलवर परतले तेव्हा मला सांगितलं गेलं की तुम्ही चेकआऊट करू शकत नाही कारण पुरामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. मी चौथ्या दिवशी एका बचाव शिबिराला भेट दिली.
तिथं एका राजकारणी महिलेला भेटले. त्यांचं नाव मिनी एलधोरा. नेदुंबसरी या पंचायतीची त्या अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे शिबिराच्या अवस्थेबद्दल विचारणा केली.
"आपलं घर गमावलं म्हणून इथं आलेले डॉक्टर्स खूप आहेत. मी सर्वांना अन्न देण्याची आणि त्यांची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला हे माहीत नाही की नेदुंबसरीचे सर्व नागरिक बचावले आहेत की नाही. शेकडो मुलांना पुराचा फटका बसला आहे," असं म्हणत त्या रडायला लागल्या.
त्यांच्या भागातल्या सर्वांच्या मदतीला त्या धावू शकल्या नाहीत याचं त्यांनी दुःख होतं. "अनेक लोक बचावकार्याच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. लोकांना जबर मानसिक धक्का बसला आहे. मी त्यांची मदत करू शकले नाही," त्या सांगत होत्या.
मला असं कळलं की या पुरात 300हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि लाखो लोक निर्वासित झाले.
पेट्रोल पंप शोधण्यासाठी आमचा बराच वेळ गेला. पुराच्या पाण्यातून इंच-इंच पुढे सरकण्यासाठी आम्हाला दोन तास लागले.
सोयीसुविधांचा तुटवडा
पाचवा दिवस महाप्रलयाचा होता. मी हॉटेलमध्येच होते. पुराचं पाणी पहिल्या मजल्याच्या पायऱ्यांपर्यंत आलं होतं. विजेचा पुरवठा खंडित झाला होता आणि लॅंडलाइन बंद पडले होते.
बचावकार्य कसं सुरू आहे हे पाहण्यासाठी मी हॉटेलच्या छतावर जायचे. हॉटेलमध्ये जनरेटर होतं. त्यामुळे दिवसातून दोनदा मोबाइल चार्ज करता येत असे. हॉटेलमधलं धान्य संपल्यामुळे काही कर्मचारी बाहेर तांदूळ आणायला गेले.
लॉरीतून लोकांना बचाव शिबिराकडे नेलं जात होतं. पावसामुळं लॉरी चालकांना स्पष्ट दिसत नव्हतं. त्यात आत बसलेल्या आणि बाहेरच्या लोकांचा आवाज येत होता. काही लॉरी चालकांना परत फिरण्याचा निर्णय घेतला होता. पुढे पाण्यात अडकण्यापेक्षा मागे फिरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
सहाव्या दिवशी आमचं पिण्याचं पाणी संपलं होतं. माझ्या खिडक्या भिजल्या होत्या. मी हे लिहित असताना पिण्याचं पाणी कधी येईल याची वाट पाहत होते.
जिकडं तिकडं पाणीच पाणी होतं पण पिण्यासाठी एक थेंब पाणी नव्हतं, हे इंग्रजी वाक्य मला आठवू लागलं होतं.
पण मला या गोष्टीचं समाधान वाटत होतं की केरळातल्या लोकांवर काय वेळ आली आहे ही गोष्ट मी माझ्या बातम्याच्या माध्यमातून जगासमोर आणू शकले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)