रुपयाचा ऐतिहासिक नीचांक : भारतीय चलन डॉलरपुढे का घसरतंय?

    • Author, पूजा अगरवाल
    • Role, बीबीसी व्यापार प्रतिनिधी मुंबईहून

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाने सोमवारी नीचांक गाठला. डॉलरची किंमत 69.93 रुपयांवर पोहोचली. या घसरणीसाठी काही प्रमाणात तुर्कस्तानचं चलन लिरावर आलेलं संकटही जबाबदार आहे.

काही स्थानिक कंपन्यांची कर्ज फेडण्याच्या चिंतेने तसंच इराण आणि अमेरिकेमधल्या वाढत्या तणावामुळे लिराच्या मूल्यातही ऐतिहासिक घट झाली आहे. शिवाय, अमेरिकेने तुर्कस्तानमधून आयात होणाऱ्या पोलाद आणि अॅल्युमिनियमवर वाढीव कर लादले आहेत.

'चिंता नको'

यामुळे गुंतवणूकदार आता भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्याऐवदी डॉलमध्ये गुंतवत आहेत. त्यासाठी ते त्यांच्याकडील रुपयांच्या ठेवी विकत आहेत.

मात्र यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असं येस बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ विवेक कुमार सांगतात.

"हे यापुढेही चालू राहील, असं वाटत नाही. पण तसं झाल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने पुरेशी व्यवस्था करून ठेवली आहे, जेणेकरून आपल्यावर एकदम भार येणार नाही. ते सातत्याने व्याज दर वाढवत आहेत आणि गरज पडल्यास ठेवीही कमी करत आहेत," असं ते म्हणाले.

व्यापारातली वाढती दरी

तुर्कस्तानात लिराची परिस्थिती आणखी बिघडली असली तरी भारतात रुपया गेल्या काही काळापासून थोडा मंदावलाच आहे. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे व्यापारातली वाढती दरी.

भारताची व्यापारी तूट जूनमध्ये 16.6 अब्ज डॉलरवर पोहोचली, जी गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची वाढती शक्ती ज्यामुळे डॉलरच्या किमती वधारल्या आहेत.

तेल किमती वाढल्या

आणखी एक कारण म्हणजे भारतात येणारं तेल. भारत जगातला तिसरा सर्वांत मोठा तेल आयातदार आहे, जो आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो.

नुकतंच अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारात तेल किमती प्रचंड वाढल्या. यामुळे तेलतुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली, शिवाय भारताचा तेलावर होणारा एकूण खर्चही प्रचंड वाढला.

पण या सगळ्यामुळे एकंदर प्रश्न हाच की तुमच्या-आमच्या खिशावर काय परिणाम होणार?

"पारंपरिकरित्या पाहिलं तर जेव्हा जेव्हा रुपया असा थोडा मंदावतो, तेव्हा महागाई थोड्या प्रमाणात वाढते. यामुळे काही गोष्टी निर्यात करणं खर्चिक होऊन बसतं. पण यातून एक चांगली गोष्ट अशीही होते की आपण अधिक स्पर्धात्मक किमतीत निर्यात करू शकतो," कुमार सांगतात.

साहजिकपणे कुणाला तरी फटका बसणारच. या सगळ्यात गोची होणार ती त्या भारतीयांची जे परदेशी गेले आहेत, विशेषतः अमेरिकेला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)