एक रुपयाची नोट झाली 100 वर्षांची!

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

30 नोव्हेंबर 1917 रोजी पहिल्यांदा एक रुपयाची कागदी नोट चलनात आली होती. आज ती शंभर वर्षांची झाली. या शतकभरात ही नोट कशी बदलली? जाणून घेऊया.

1917मध्ये आलेली एक रुपयाची नोट आजच्या चलनी नोटांच्या तुलनेत जरा साधीच वाटते. फिकट, पिवळसर रंगाच्या या नोटेचीही काही खास वैशिष्ट्यं आहेत.

इंग्लंडमध्ये छापण्यात आलेल्या या नोटांच्या दर्शनी बाजूला वर डाव्या कोपऱ्यात इंग्लंडचे राजे जॉर्ज पंचम यांची प्रतिमा असलेल्या नाण्याचा छाप आहे.

नोटेच्या याच बाजूला वरच्या उजव्या कोपऱ्यात तसंच खालच्या डाव्या कोपऱ्यात 1 Rupee असं इंग्रजीत लिहिलं आहे.

विशेष म्हणजे या नोटेवर 'I promise to pay the bearer the sum of One Rupee on demand at any office of issue', अर्थात 'मी धारकाला एक रुपया ही रक्कम देण्याचे वचन देतो आहे', असं लिहिलं आहे.

म्हणजेच एक प्रॉमिसरी नोट म्हणून ही नोट छापण्यात आली होती.

भारतात त्यानंतर छापण्यात आलेला एक रुपयांच्या नोटांवर हे वाक्य दिसत नाही.

या नोटेच्या मागच्या बाजूला आठ भारतीय लिपींमध्ये 'एक रुपया' असं छापलं आहे.

भारतात चलनी नोटांचा इतिहास

मिंटेजवर्ल्ड या ऑनलाईन संग्रहालयाचे CEO आणि संग्राहक सुशीलकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कागदी नोटांचा वापर 19व्या शतकातच सुरू झाला होता.

त्याआधी ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या अधिपत्याखालील बंगाल प्रांतातही कागदी चलन वापरात आलं होतं.

पण चलनाचा पाया मानला जाणारा रुपया 1917पर्यंत नाण्याच्या रुपात मिळायचा.

ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात एक रुपयाची नोट चलनात आल्यावर भारतातील इतर युरोपीय वसाहतींनीही मग एक रुपयाची नोट जारी केली.

पोर्तुगीज Nova Goa notes आणि फ्रेन्च Roupie त्यांच्या पैकीच.

भारतातील काही संस्थानिकांनीही अंतर्गत व्यवहारांसाठी स्वतंत्र चलन जारी केलं होतं. हैदराबाद आणि काश्मीरच्या संस्थानिकांना एक रुपयाची नोट छापण्याची परवानगी मिळाली होती.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान बर्मामध्ये (आताचं म्यानमार) वापरासाठी एक रुपयाच्या नोटा जारी करण्यात आल्या.

दुबई, बहारीन, ओमान अशा मध्यपूर्वेतील देशांमध्येही एके काळी भारतीय चलन वापरलं जायचं. त्यासाठी भारत सरकारनं मग 1959 साली खास 'पर्शियन एक रुपया'ही छापला होता.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्लंडच्या राजाऐवजी भारतीय राजमुद्रेला एक रुपयाच्या नोटेवर स्थान मिळालं. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर जारी करण्यात आलेली एक रुपयाची नोट काही काळ पाकिस्तानतही चलनात होती.

गेल्या शंभर वर्षांत एक रुपयाच्या 125 वेगवेगळ्या नोटा चलनात आल्या. एकूण 28 वेळा या नोटांचं डिझाईन बदललं गेलं.

एक रुपयाचं महत्त्व आजही कायम

एक रुपयाचं मूल्य आज जरी खूप जास्त नसलं तरी एक रुपयाच्या नोटेचं महत्त्व मात्र कायम आहे. भारतीय चलनात एक रुपयाची नोट ही सर्वांत लहान, पण तरीही सर्वांत मोठी म्हणायला हवी.

कारण केवळ एक रुपयाची नोटच भारत सरकार थेट चलनात आणतं, तर बाकीच्या नोटा रिझर्व्ह बँकेमार्फत जारी केल्या जातात.

त्यामुळं एक रुपयाच्या नोटेवर 'भारत सरकार' असा उल्लेख असतो आणि भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते.

अन्य नोटांवर 'भारतीय रिझर्व्ह बँक' असं छापलं असतं आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते.

छपाईसाठी बराच खर्च

व्यवहारात एक रुपया मूल्य असलेल्या या नोटेच्या छपाईसाठी मात्र बराच खर्च येतो. त्यामुळं 1995 साली एक रुपयाच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

2015 साली नव्यानं एक रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या. यंदाही त्यात भर पडली आहे.

पण एक रुपयाच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात होत नसल्यानं त्या नियमित चलनात फारशा येत नाहीत. त्यामुळं संग्राहकांकडून या नोटांना मोठी मागणी दिसून येते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नियोजन आयोगाचे प्रमुख माँटेक सिंग अहलुवालिया यांच्यासारख्या नामवंत वित्त सचिवांची स्वाक्षरी असलेल्या नोटा तर आता दुर्मिळ झाल्या आहेत.

एक रुपयाच्या अशा एखाद्या दुर्मिळ नोटेची किंमत लिलावात काही लाखांतही जाऊ शकते.

'क्लासिकल न्युमिस्मॅटिक्स गॅलरी' या दुर्मिळ नाण्यांचा लिलाव करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर यंदा 1985 सालची एक रुपयाची एक नोट 2.75 लाख रुपयांना विकली गेली होती.

1944 सालच्या एक रुपयाच्या 100 नोटांचं बंडल तोडीवाला ऑक्शन्समध्ये 1.30 लाख रुपयांना विकलं गेलं.

थोडक्यात काय, तर "एका रुपयात काय मिळू शकतं?" या प्रश्नाचं उत्तर तुमच्या हातात एक रुपयाची कोणती नोट आहे, यावर अवलंबून आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)