You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
करुणानिधी अनंतात विलीन
द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री M करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 94 वर्षांच्या करुणानिधींना युरिनरी इन्फेक्शनच्या इलाजासाठी 28 जुलैपासून कावेरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. तिथेच त्यांचं निधन झालं.
सायं. 6.50 - करुणानिधी अनंतात विलीन
करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो चाहत्यांनी करुणानिधी यांचं अखेरचं दर्शन घेतलं.
सायं. 6.15- अंत्ययात्रा मरीना बीचवर पोहोचली
करुणानिधी यांचं पार्थिव मरीना बीचवरील अण्णा मेमोरियलजवळ पोहोचले. थोड्याच वेळात पोलीस मानवंदना देतील आणि दफनविधी सुरू होईल.
दु. 4.00 - अंत्ययात्रेस प्रारंभ
करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मरीना बीचवर नेलं जाणार आहे. त्यांचा मृतदेह राजाजी हॉलच्या बाहेर आणण्यात आला आहे.
दु. 3.30 - सुप्रीम कोर्टानं फेटाळली याचिका
करुणानिधी यांच्या पार्थिवाच्या मरीना बीचवरील अंत्यसंस्काराला आक्षेप घेणारी याचिका मद्रास हायकोर्टानं फेटाळल्यानंतर रामस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.
दु. 3.00 - चेंगराचेंगरीत 2 ठार, 33 जखमी
राजाजी हॉलच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 2 जण ठार आणि 33 जण जखमी झाल्याचं वृत्त ANI नं दिलं आहे.
दुपारी 2.00- राजाजी हॉलमध्ये समर्थकांची गर्दी
करुणानिधी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समर्थक राजाजी हॉल आणि परिसरात जमले आहेत.
सकाळी 11.30 - पंतप्रधानांनी घेतले अंत्यदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेन्नईतील राजाजी हॉल इथं जाऊन करुणानिधी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं.
सकाळी 11.07 - अंत्यदर्शनासाठी द्रमुक कार्यकर्त्यांची गर्दी
चेन्नईतल्या राजाजी हॉलमध्ये करुणानिधी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. अत्यंदर्शनासाठी लोकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे.
सकाळी 11 - कोण होते पेरियार?
करुणानिधींवर ज्यांचा प्रभाव होता ते पेरियार नेमके कोण होते? वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
सकाळी 10.53 - मरीना बीचवरच दफनविधी
तामिळनाडू सरकारचा निर्णय मद्रास हायकोर्टानं बदलला आहे. करुणानिधी यांच्या दफनविधीसाठी मरीना बीचवर जागा देण्याचे आदेश मद्रास हायकोर्टानं दिले आहेत.
सकाळी 10.14 - ...तर आक्षेप नाही - कोर्ट
मरीना बीचवर करुणानिधी यांच्या दफनविधीसाठी जागा दिली तर कुणीही आक्षेप घेणार नाही असं मत न्यायमूर्ती एस.एस. सुंदर यांनी नोंदवलं आहे.
सकाळी 9.40 - कोर्टात युक्तीवाद सुरूच
मरीना बीचवर करुणानिधी यांच्या दफनविधीसाठी जागा दिली गेली नाही तर तो द्रमुकच्या 1 कोटी समर्थकांचा अपमान ठरेल, असा युक्तीवाद द्रमुकच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
सकाळी 8 - सरकारचे प्रतिज्ञापत्र सादर
तामिळनाडू सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर.
सकाळी 6.20 - सरकारनं 8 वाजेपर्यंतची वेळ मागितली
रात्री उशीरा न्यायाधीशांच्या घरी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारनं त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सकाळी 8 पर्यंतची वेळ मागितली आहे. त्यामुळे सुनावणी तोपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
रात्री 9.30 - कोर्टात रात्री सुनावणी
करुणानिधी यांच्या समाधीसाठी मरिना बीचवर जागा मिळावी, अशी याचिका द्रमुकने मद्रास हायकोर्टात केली आहे. रात्री 10.30 वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
रात्री 8 - दफनविधीवरून वाद
करुणानिधी यांचा दफनविधी होणार आहे. त्यांच्या समाधीला मरीना बीचवर अण्णा दुरई, MG रामचंद्रन आणि जयललिता यांच्या समाधींच्या बाजूला जागा देण्यात यावी, अशी मागणी द्रमुकने केली होती.
सध्या तामिळनाडूत अण्णा द्रमुकचं सरकार आहे. या सरकारने ही परवानगी नाकारली. कोर्टाच्या निकालांचा दाखला देत अण्णा दुरईंच्या समाधीपासून 8 किमी दूर असलेला 2 एकरचा प्लॉट द्यायला सरकार तयार आहे.
त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलबाहेर तोडफोड केली.
हा प्रस्ताव द्रमुकने नाकारला आहे. त्यामुळे उद्या अंत्यसंस्कार होणार हे जरी ठरलं असलं तरी करुणानिधींचं पार्थिव कुठे दफन करण्यात येईल, यावरून वाद कायम आहे.
संध्या. 7.40 - मरीना बीचवर अंत्यसंस्कार
करुणानिधी यांच्यावर चेन्नईतल्या मरीना बीचवर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. उद्या संपूर्ण तामिळनाडू राज्यात सुटीची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
2016 साली जयललिता आणि त्यापूर्वी 1987 साली MG रामचंद्रन यांच्यावरही मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
संध्या. 7.30 - सुरक्षा वाढवली
शोकमग्न कार्यकर्ते धुडगूस घालू शकतील, ही शक्यता लक्षात घेऊन तामिळनाडूत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जयललिता यांच्या निधनाची बातमी जेव्हा एका वृत्तवाहिनीने 2016 साली पहिल्यांदा दाखवली होती, तेव्हा त्यांचे पाठीराखे हिंसक झाले होते. त्याआधी जेव्हा 1987 साली अद्रमुक नेते MG रामचंद्रन यांचं निधन झालं होतं, तेव्हा दंगल उसळली होती. त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता.
संध्या. 7.20 - रजनी म्हणतो...
आज काळा दिवस आहे, असं अभिनेता आणि अलीकडेच राजकारणात प्रवेश केलेल्या रजनीकांत यांनी म्हटलं आहे.
संध्या. 7.15 - सिनेमांचे शो रद्द
आज संध्याकाळपासून उद्या रात्रीपर्यंतचे तामिळनाडूतले सर्व सिनेमांचे शो रद्द करण्यात आले आहेत. करुणानिधींनी तामिळ सिनेमा क्षेत्रात पटकथा लेखक म्हणून करियरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमांचे डायलॉग आणि पटकथा लिहिल्या आहेत.
संध्या. 7 - राहुल गांधी लिहितात...
भारत एका थोर सुपुत्राला मुकला आहे, असं राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिलं आहे.
संध्या. 6.50 - पंतप्रधान म्हणतात...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की गरिबांना मदत करणारा नेता आणि विचारवंत आपण गमावला आहे.
संध्या. 6.30 - निधनाची घोषणा
करुणानिधींच्या मृत्यूची घोषणा. 6 वाजून 10 मिनिटांनी मृत्यू झाल्याची केली घोषणा
संध्या. 6 वाजता - 'अत्यंत नाजूक'
द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री M करुणानिधी यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं आज डॉक्टरांनी सांगितलं आहे. काल संध्याकाळपासून त्यांची तब्येत ढासळत आहे. सर्वाधिक मेडिकल सपोर्ट देऊनही त्यांचे अवयव प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
'त्यांच्या मुख्य अवयवांचं काम सुरू ठेवणं आव्हानात्मक आहे' असं कालच कावेरी हॉस्पिटलने काढलेल्या पत्रकात म्हटलं होतं.
28 जुलैपासून 94 वर्षांच्या करुणानिधींना युरिनरी इन्फेक्शनच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा नोंदवण्यात आली होती, पण गेल्या 24 तासांत परिस्थिती ढासळत आहे.
हॉस्पिटलबाहेर हजारोंच्या संख्येने त्यांचे पाठीराखे जमायला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आधीच तामिळनाडू पोलिसांचा मोठा ताफाही तिथे तैनात करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात अनेक बड्या नेत्यांनी करुणानिधी आणि त्यांचा मुलगा MK स्टॅलिन यांची चेन्नईत भेट घेतली. यात उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अभिनेता रजनीकांत यांचा समावेश आहे.
करुणानिधी यांचं भारताच्या राजकारणात मोठं स्थान आहे. ते पाच वेळा मुख्यमंत्री आणि 60 वर्षं लोकप्रतिनिधी राहिलेले करुणानिधी स्वतः एकही निवडणूक हरलेले नाहीत.
त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्ष 1998 ते 2014 मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPAच्या पहिल्या सरकारमध्ये तामिळनाडूतील 12 मंत्री होते. द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं.
याच खात्याअंतर्गत उघड झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि करुणानिधी यांची मुलगी व खासदार कनिमोळी यांना तुरुंगावास झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)