ज्येष्ठ द्रमुक नेते करुणानिधी यांचं चेन्नईत निधन

द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी (94) यांचं 6 वाजून 10 मिनिटांनी निधन झालं आहे. त्यांच्यावर चेन्नई इथल्या कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते.

करुणानिधी यांच्या निधनामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकारणात असलेल्या एका दिग्गज नेत्याचं पर्व संपलं आहे. ही बातमी समजताच त्यांच्या समर्थकांसह तामिळनाडूवर शोककळा पसरली आहे.

28 जुलैपासून 94 वर्षांच्या करुणानिधींना युरिनरी इन्फेक्शनच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा नोंदवण्यात आली होती, पण गेल्या 24 तासांत परिस्थिती ढासळत गेली.

भारताच्या राजकारणात मोठं स्थान असलेले आणि तामिळनाडूचे पाच वेळचे मुख्यमंत्री असलेले करुणानिधी स्वतः एकही निडणूक हरले नव्हते. त्यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्ष 1998 ते 2014 या कालावधीत केंद्रात सहभागी होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPAच्या पहिल्या सरकारमध्ये तामिळनाडूतील 12 मंत्री होते.

द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं. याच खात्याअंतर्गत उघड झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि करुणानिधी यांची मुलगी व खासदार कनिमोळी यांना तुरुंगावास झाला होता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)